पुणे :पुणे मेट्रोच्या नव्या मार्गाचे उद्घाटन आणि पुणे मेट्रो फेज-2 च्या भूमिपूजन कार्यक्रमानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्यासह मेट्रोतून प्रवास केला. या नव्या मार्गावरील पहिले तिकीट मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी स्वतः घेऊन मेट्रो प्रवासाचा अनुभव घेतला.
यावेळी पुणे मेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक श्रावण हर्डीकर यांनी मुख्यमंत्र्यांना मेट्रो मार्ग, स्थानके आणि प्रकल्पाच्या विविध वैशिष्ट्यांची माहिती दिली. या प्रवासात केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, राज्यमंत्री माधुरी मिसाळ, पुण्याच्या महापौर मंजुषा नागपुरे, पिंपरी-चिंचवडचे महापौर रवी लांडगे, पीएमआरडीएचे आयुक्त अभिजीत चौधरी यांच्यासह लोकप्रतिनिधी आणि वरिष्ठ अधिकारी सहभागी झाले होते.
या प्रवासाचे विशेष आकर्षण म्हणजे पिंक मेट्रोचे संचालन महिला ट्रेन पायलटकडे होते. लीड ट्रेन पायलट प्रगती बिरादार यांनी मेट्रोचे सारथ्य केले, तर ट्रेन पायलट ऐश्वर्या सूर्यपूजारी यांनीही या प्रवासात महत्त्वाची भूमिका बजावली. महिला कर्मचाऱ्यांच्या सक्षम सहभागातून आधुनिक सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेतील महिलांच्या योगदानाचे दर्शन यानिमित्ताने घडले.
पुणेकरांसह हिंजवडी आयटी पार्कमध्ये काम करणाऱ्या हजारो कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. पुणे मेट्रोच्या बहुप्रतीक्षित पिंक लाईनचे वेळापत्रक जाहीर झाले असून, येत्या ४ नोव्हेंबर २०२६ पासून या मार्गावर प्रवाशांसाठी मेट्रो सेवा सुरू होणार आहे. त्यामुळे हिंजवडी ते मध्यवर्ती पुणे हा प्रवास अधिक वेगवान आणि आरामदायी होण्याची शक्यता आहे.
पुणे मेट्रोची पिंक लाईन माण ते जिल्हा न्यायालय या मार्गावर धावणार आहे. या मार्गाची एकूण लांबी २३.३ किलोमीटर असून, संपूर्ण प्रवासासाठी अंदाजे ४५ मिनिटांचा कालावधी लागणार आहे. विशेषतः हिंजवडी आयटी पार्कमध्ये दररोज नोकरीसाठी जाणाऱ्या कर्मचाऱ्यांना या मेट्रोमुळे वाहतूक कोंडीतून मोठा दिलासा मिळू शकतो.

सकाळी ६ वाजता पहिली मेट्रो
नव्या वेळापत्रकानुसार, मेट्रोची पहिली फेरी सकाळी ६ वाजता सुरू होणार आहे. माण येथून जिल्हा न्यायालयाच्या दिशेने जाणारी शेवटची मेट्रो रात्री १०.३० वाजता सुटेल. तर जिल्हा न्यायालय येथून माणच्या दिशेने जाणारी अखेरची फेरी रात्री ११.३० वाजता उपलब्ध असेल.
गर्दीच्या वेळेत दर साडेपाच मिनिटांनी फेरी
कार्यालयीन वेळेत प्रवाशांची होणारी गर्दी लक्षात घेऊन मेट्रो प्रशासनाने विशेष नियोजन केले आहे. सकाळी ७.३० ते ९.३० आणि संध्याकाळी ५ ते रात्री ८ या गर्दीच्या कालावधीत दर ५ मिनिटे ३० सेकंदांनी मेट्रो धावणार आहे. तर इतर कमी गर्दीच्या वेळेत दर १० मिनिटांनी मेट्रोची सुविधा उपलब्ध असेल. त्यामुळे प्रवाशांचा प्रतीक्षेचा वेळ कमी होण्यास मदत होणार आहे.

हिंजवडी आयटी कर्मचाऱ्यांचा प्रवास होणार सुकर
हिंजवडी परिसरात मोठ्या संख्येने आयटी कंपन्या असल्याने या भागात दररोज वाहनांची मोठी वर्दळ असते. सकाळी आणि संध्याकाळी होणाऱ्या वाहतूक कोंडीमुळे कर्मचाऱ्यांना प्रवासासाठी बराच वेळ खर्च करावा लागतो. मात्र, पिंक लाईन सुरू झाल्यानंतर रस्त्यावरील वाहनांवरील ताण कमी होण्यासोबतच प्रवास अधिक नियोजित पद्धतीने करता येणार आहे.
महिला ट्रेन पायलटने केले मेट्रोचे सारथ्य
दरम्यान, पिंक लाईनच्या उद्घाटनानिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्यासह नव्या मेट्रोतून प्रवास केला. यावेळी मुख्यमंत्र्यांनी स्वतः पहिले तिकीट खरेदी करून प्रवासाचा अनुभव घेतला. मेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक श्रावण हर्डीकर यांनी मार्ग आणि प्रकल्पाच्या वैशिष्ट्यांची माहिती दिली.
या प्रवासाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे मेट्रोचे संचालन महिला ट्रेन पायलटने केले. लीड ट्रेन पायलट प्रगती बिरादार यांनी मेट्रोचे सारथ्य केले, तर ऐश्वर्या सूर्यपूजारी यांनीही महत्त्वाची जबाबदारी सांभाळली. त्यामुळे सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेतील महिलांच्या सहभागाचे विशेष दर्शन घडले.
३ नोव्हेंबर रोजी पिंक लाईनचा लोकार्पण सोहळा पार पडणार असून, ४ नोव्हेंबरपासून नियमित प्रवासी वाहतूक सुरू होईल. या नव्या मेट्रो मार्गामुळे पुणे आणि हिंजवडीदरम्यानच्या सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेला नवी गती मिळणार आहे.