सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • महाराष्ट्रात पुन्हा पावसाचं सावट; 'मुरासू' चक्रीवादळामुळे कोकण, मराठवाडा अन् मध्य महाराष्ट्रात वादळी वाऱ्याची शक्यता, हवामान विभागाचा अलर्ट
  • दिया मिर्झाला ट्रोल करणाऱ्या वाचाळ राजकारण्यांना मुंबई हायकोर्टानं झाडलं, डिलीट केलेला व्हिडीओ पुन्हा पोस्ट करण्याचे आदेश
 क्राईम

डोंबिवलीत मित्राकडूनच मित्राची निर्घृण हत्या; २० दिवस मृतदेह लपवला, मृत मित्र स्वप्नात येऊ लागल्याने आरोपीची पोलिसांसमोर कबुली!

डिजिटल पुणे    03-11-2026 18:00:12

ठाणे : डोंबिवली पश्चिमेतील मोठागाव परिसरात मैत्रीच्या नात्याला काळिमा फासणारी धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. किरकोळ कारणावरून झालेल्या वादातून प्रभू करकडे याने आपलाच मित्र विशाल कदम याची हत्या केली. हत्येनंतर घरमालक संदीप म्हात्रे याच्या मदतीने मृतदेहाची विल्हेवाट लावण्याचा प्रयत्न करण्यात आला. तब्बल २० दिवस हा प्रकार लपवून ठेवण्यात आला. मात्र, मृत मित्र वारंवार स्वप्नात येत असल्याने अस्वस्थ झालेल्या आरोपीने अखेर स्वतःहून पोलिसांकडे धाव घेत गुन्ह्याची कबुली दिली. या घटनेमुळे डोंबिवली परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

दारू पिताना झालेला वाद टोकाला; मित्राचाच घेतला जीव

मिळालेल्या माहितीनुसार, डोंबिवली पश्चिमेतील मोठागाव परिसरात विशाल कदम आणि प्रभू करकडे हे दोघे एका घरात एकत्र बसून मद्यपान करत होते. याचदरम्यान दोघांमध्ये एका क्षुल्लक कारणावरून वादाला सुरुवात झाली. पाहता पाहता या वादाचे रूपांतर मोठ्या भांडणात झाले. संतापाच्या भरात प्रभू करकडे याने विशाल कदम याची हत्या केली. आपल्या हातून मित्राचा खून झाल्याचे लक्षात येताच प्रभू घाबरला आणि त्याने घरमालक संदीप म्हात्रे याला संपूर्ण प्रकार सांगितला.

घरमालकाच्या मदतीने मृतदेहाची विल्हेवाट

घटनेनंतर घरमालक संदीप म्हात्रे याने आरोपीला समजावण्याचा प्रयत्न केला. तुझे अद्याप लग्न झालेले नाही, हा प्रकार समोर आल्यास तुझे आयुष्य उद्ध्वस्त होईल, असे सांगत त्याने गुन्हा लपवण्याचा सल्ला दिल्याची माहिती समोर आली आहे. त्यानंतर दोघांनी मिळून विशालचा मृतदेह एका गोणीत भरला आणि खाडीकिनारी असलेल्या निर्जन ठिकाणी फेकून दिला. तसेच या घटनेची कोणालाही माहिती होऊ नये, यासाठी दोघांनीही मौन बाळगले.

२० दिवस अपराधी भावनेने अस्वस्थ; अखेर पोलिसांकडे धाव

हत्या केल्यानंतर प्रभू करकडे याला मात्र मानसिक अस्वस्थतेचा सामना करावा लागत होता. तब्बल २० दिवस त्याला नीट झोप लागत नव्हती. मृत विशाल वारंवार स्वप्नात येत असल्याने तो अधिकच अस्वस्थ झाला. अखेर या मानसिक तणावातून त्याने स्वतःहून क्राईम ब्रँच पोलिसांशी संपर्क साधला आणि घडलेला संपूर्ण प्रकार सांगितला.

दोन्ही आरोपींना अटक; पोलिसांकडून पुढील तपास

प्रभू करकडे याने दिलेल्या माहितीनंतर क्राईम ब्रँच पोलिसांनी त्याला ताब्यात घेत विष्णूनगर पोलिसांच्या स्वाधीन केले. त्यानंतर विष्णूनगर पोलिसांनी विशाल कदम हत्या प्रकरणात प्रभू करकडे आणि मृतदेहाची विल्हेवाट लावण्यास मदत केल्याच्या आरोपावरून घरमालक संदीप म्हात्रे या दोघांनाही अटक केली आहे. किरकोळ वादातून मित्रानेच मित्राची हत्या केल्याची आणि तब्बल २० दिवस हा गुन्हा लपवून ठेवल्याची घटना समोर आल्याने परिसरात संताप आणि आश्चर्य व्यक्त केले जात आहे. या प्रकरणाचा पुढील तपास विष्णूनगर पोलीस करत आहेत.


 Give Feedback



 जाहिराती