पुणे : कोंढवा भागात पालिकेची वीज चोरून खासगी इमारतींमध्ये वापरली जात असल्याच्या प्रकरणातील स्थानिक नगरसेवक,अधिकारी जबाबदार असून त्यांच्यावर कारवाई करावी,या मागणीसाठी सामाजिक कार्यकर्ते 'इनक्रेडिबल समाजसेवक ग्रुप' या संस्थेचे संस्थापक असलम इसाक बागवान यांनी दि.३ नोव्हेंबर २०२६ पासून बेमुदत उपोषणाला सुरुवात केली आहे.पहिल्याच दिवशी रात्री उपोषणस्थळी अज्ञात महिलांनी त्यांच्यावर हल्ला करून मोबाईल हिसकावून नेल्याची तक्रार बागवान यांनी पोलिसात दिली आहे.पुणे महानगरपालिकेच्या वानवडी क्षेत्रीय कार्यालयासमोर हे उपोषण सुरु आहे.
सार्वजनिक मालमत्तेचा कथित गैरवापर, अनधिकृत वीज वापर तसेच संबंधित प्रकरणात जबाबदार लोकप्रतिनिधी व अधिकाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्याच्या मागणीसाठी 'इनक्रेडिबल समाजसेवक ग्रुप' चे संस्थापक असलम इसाक बागवान यांनी सुरू केलेल्या शांततापूर्ण उपोषणाचा आज दुसरा दिवस आहे.
अद्याप पुणे महानगरपालिकेचे कोणतेही वरिष्ठ अधिकारी, विद्युत अभियंता, पथ विभाग, आकाशचिन्ह विभाग अथवा वानवडी क्षेत्रीय कार्यालयाचे सहाय्यक आयुक्त उपोषणस्थळी भेट देऊन आंदोलनाची दखल घेण्यासाठी आले नाहीत.
रात्रीच्या वेळी काही संशयित व्यक्ती उपोषणस्थळाच्या परिसरात घिरट्या घालत असल्याचे निदर्शनास आल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे आपल्या जीवितास धोका असल्याची भीती त्यांनी व्यक्त केली असून पोलिसांकडे आवश्यक संरक्षणाची मागणी केली आहे.या संपूर्ण प्रकरणात संबंधित नगरसेवक गफूर पठाण यांच्याविरुद्ध तसेच त्यांना कथितरीत्या पाठिशी घालणाऱ्या संबंधित अधिकाऱ्यांच्या भूमिकेबाबत निष्पक्ष चौकशी व्हावी, अशी उपोषणकर्त्यांची मागणी आहे. सार्वजनिक मालमत्तेचा वापर, कथित अनधिकृत वीजजोडणी, अनधिकृत जाहिरात फलक व महापालिकेच्या मालमत्तेच्या वापराबाबत उपलब्ध तक्रारी आणि तपासणी अहवालांची वरिष्ठ स्तरावर पडताळणी करून जबाबदार व्यक्तींवर कायद्यानुसार कारवाई करावी, असे त्यांचे म्हणणे आहे.
महापालिका आयुक्तांकडे थेट मागणी
पुणे महानगरपालिका आयुक्तांनी या प्रकरणाची तातडीने दखल घ्यावी. संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांकडून अहवाल मागवून संपूर्ण प्रकरणाची वरिष्ठ अधिकाऱ्यामार्फत निष्पक्ष चौकशी करावी. अनधिकृत वीज वापर किंवा सार्वजनिक मालमत्तेचा गैरवापर सिद्ध झाल्यास संबंधित नगरसेवकासह जबाबदार व्यक्तींवर आणि कर्तव्यात कसूर करणाऱ्या अधिकाऱ्यांवर लागू कायद्यानुसार कठोर कारवाई करावी, अशी मागणी असलम बागवान यांनी केली आहे.“सार्वजनिक मालमत्ता ही जनतेच्या पैशातून निर्माण झालेली संपत्ती आहे. तिचा गैरवापर होत असल्याच्या तक्रारींकडे प्रशासनाने दुर्लक्ष करू नये. लोकशाही मार्गाने उपोषण करणाऱ्या नागरिकाच्या सुरक्षिततेची जबाबदारीही प्रशासन आणि पोलिसांनी गांभीर्याने पार पाडली पाहिजे. माझ्या तक्रारींची निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कायदेशीर कारवाई होईपर्यंत मी संविधानिक मार्गाने माझा आवाज उठवत राहणार आहे,” अशी भूमिका असलम बागवान यांनी मांडली.प्रशासनाने तातडीने हस्तक्षेप करून उपोषणकर्त्यांच्या मागण्यांवर लेखी उत्तर द्यावे आणि त्यांच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक उपाययोजना कराव्यात, अशी मागणी 'इनक्रेडिबल समाजसेवक ग्रुप' च्या वतीने करण्यात येत आहे.