सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • मोठी बातमी, सर्व अग्निवीरांना सैन्य दलात नोकरी मिळण्याचा मार्ग मोकळा,75 टक्के अग्निवीरांना 2 वर्षांच्या अतिरिक्त सेवेनंतर संधी मिळणार, केंद्राचा मोठा निर्णय
  • दिवाळीपूर्वीच शेतकऱ्यांना मदत; दोन दिवसांत अग्रीम निधीचे 5000 उर्वरीत शेतकऱ्यांच्या खात्यात येणार, फडणवीसांनी दिली माहिती
  • पावसामुळे भारत-न्यूझीलंड सामन्यात ट्विस्टवर ट्विस्ट, दोनदा बदललं लक्ष्य; अखेर विराट कोहलीच्या जोरावर टीम इंडियाचा विजय
  • अमेरिकेच्या मध्यावधी निवडणुकीतील सर्वात धक्कादायक निकाल, मिशिगनमधून पहिला मुस्लीम सिनेटर जिंकला, डोनाल्ड ट्रम्प यांना ज्याची भीती होती तेच घडलं
  • पंतप्रधान मोदींचा शरद पवारांना फोन, प्रकृतीची विचारपूस, काळजी घेण्याचं आवाहन, म्हणाले 'देशाकडे लक्ष देण्यासाठी सुप्रिया सुळे आहेत...'
  • डोनाल्ड ट्रम्प यांचा दारुण पराभव, डेमोक्रेटीकला बहुमत; अमेरिकेत आता काय काय बदलणार?, निवडणुकीत चक्रावणारा निकाल
 जिल्हा

दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना मोठा दिलासा! 73 लाख शेतकऱ्यांच्या खात्यांत 5 हजार रुपये जमा; उर्वरित शेतकऱ्यांना दोन दिवसांत पैसे मिळणार – मुख्यमंत्री फडणवीसांची माहिती

डिजिटल पुणे    04-11-2026 16:52:22

मुंबई : दिवाळीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी महाराष्ट्र सरकारने दिलासादायक पाऊल उचलले आहे. दुष्काळी परिस्थितीचा सामना करणाऱ्या शेतकऱ्यांना जाहीर करण्यात आलेली 5 हजार रुपयांची अग्रीम मदत थेट त्यांच्या बँक खात्यात जमा करण्याची प्रक्रिया वेगाने सुरू आहे. आतापर्यंत राज्यातील 73 लाख शेतकऱ्यांच्या खात्यांमध्ये ही रक्कम जमा झाली असून, उर्वरित पात्र शेतकऱ्यांच्या खात्यांत पुढील दोन दिवसांत पैसे जमा होतील, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

मुख्यमंत्री फडणवीस यांनी बैठकीनंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना सांगितले की, दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळावी, या उद्देशाने राज्य सरकारने केंद्राच्या मदतीची वाट न पाहता प्रत्येकी 5 हजार रुपये अग्रीम स्वरूपात देण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार बहुतांश शेतकऱ्यांपर्यंत मदत पोहोचली आहे. काही शेतकऱ्यांच्या बँक खात्यांमधील तांत्रिक अडचणींमुळे पैसे जमा होण्यास विलंब होत असून, पुढील दोन दिवसांत जवळपास 95 टक्के शेतकऱ्यांना या मदतीचा लाभ मिळेल, असे त्यांनी स्पष्ट केले.

4.86 लाख शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ; 4,764 कोटी रुपये जमा

दरम्यान, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमाफी योजनेअंतर्गत राज्य सरकारने आणखी 4 लाख 86 हजार शेतकऱ्यांच्या खात्यांमध्ये 4,764 कोटी रुपये जमा केले आहेत. यामध्ये मराठवाड्यातील शेतकऱ्यांची संख्या सर्वाधिक असून, या विभागातील जवळपास 2 लाख 76 हजार शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळाला आहे.

मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या माहितीनुसार, आतापर्यंत राज्यातील सुमारे 21 लाख शेतकऱ्यांच्या खात्यांत कर्जमाफीची रक्कम जमा करण्यात आली असून, त्यासाठी जवळपास 19 हजार कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत. पात्र लाभार्थ्यांच्या याद्यांचे प्रमाणीकरण अद्याप सुरू आहे. ही प्रक्रिया पूर्ण होत जाईल, त्यानुसार उर्वरित शेतकऱ्यांच्या खात्यांतही कर्जमाफीची रक्कम जमा केली जाईल.

शेतकऱ्यांसोबत दिवाळी साजरी करण्याचा सरकारचा प्रयत्न

शेतकऱ्यांना केवळ योजनांची घोषणा न करता प्रत्यक्ष आर्थिक मदत मिळवून देण्यावर राज्य सरकारचा भर असल्याचे फडणवीस यांनी सांगितले. महायुती सरकारमधील सर्व मंत्र्यांशी चर्चा करून दिवाळी शेतकऱ्यांसोबत साजरी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. दिवाळीनिमित्त शेतकऱ्यांच्या घरी जाऊन त्यांच्यासोबत सण साजरा करण्याचाही सरकारचा प्रयत्न राहणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

राज ठाकरेंच्या टीकेला फडणवीसांचे प्रत्युत्तर

दरम्यान, राज ठाकरे यांनी आंदोलनांबाबत केलेल्या टीकेवरही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली. सरकारचे मोर्चे हे अराजकतेविरोधात आणि भारतीय संविधानाच्या संरक्षणासाठी असल्याचे त्यांनी सांगितले. देशात व्यवस्था परिवर्तनाच्या नावाखाली संविधान बदलण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप करत, अशा प्रयत्नांना विरोध करण्यासाठी भाजपही रस्त्यावर उतरू शकतो, असे फडणवीस म्हणाले.भारतीय संविधान आणि लोकशाहीच्या समर्थनार्थ मोठ्या प्रमाणात जनसमर्थन असल्याचा दावाही त्यांनी यावेळी केला.

राजू शेट्टींच्या आंदोलनावर सरकारची मध्यस्थीची भूमिका

ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून राजू शेट्टी यांनी सुरू केलेल्या आंदोलनावरही मुख्यमंत्र्यांनी भाष्य केले. या आंदोलनामुळे सर्वाधिक नुकसान शेतकऱ्यांचेच होत असल्याचे सांगत त्यांनी आंदोलन शांततेत संपवण्याचे आवाहन केले.

ऊस उत्पादक शेतकऱ्यांना एफआरपी देणे साखर कारखान्यांसाठी बंधनकारक असून, त्यापेक्षा अधिक दर मिळावा, अशी शेतकऱ्यांची मागणी आहे. या प्रश्नावर शेतकरी आणि साखर कारखानदार यांच्यात चर्चा सुरू असून, राज्य सरकार मध्यस्थाची भूमिका बजावत असल्याचे फडणवीस यांनी स्पष्ट केले.

या चर्चेतून सकारात्मक मार्ग निघावा आणि आंदोलन शांततेने संपावे, यासाठी मंत्री हसन मुश्रीफ यांनाही मध्यस्थी करण्याच्या सूचना देण्यात आल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली.एकीकडे दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना अग्रीम आर्थिक मदत, तर दुसरीकडे कर्जमाफीच्या माध्यमातून हजारो कोटींचा दिलासा देण्याचा प्रयत्न राज्य सरकारकडून सुरू आहे. त्यामुळे दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात आणखी किती रक्कम जमा होते, याकडे आता राज्यातील शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.


 Give Feedback



 जाहिराती