मुंबई : क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले बालसंगोपन योजनेचा लाभ घेण्यासाठी आता अर्जदारांना महाडीबीटी पोर्टलवरून थेट ऑनलाइन अर्ज करता येणार आहे. यासाठी आवश्यक कागदपत्रांची संख्या कमी करण्यात आली असून अर्ज नोंदणीपासून ते अर्जाची सद्यस्थिती तपासण्यापर्यंतची संपूर्ण प्रक्रिया ऑनलाइन करण्यात आली आहे. या योजनेचा लाभही थेट लाभार्थ्यांच्या बँकेत जमा करण्यात माहिती महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिली.
बालसंगोपन योजना आणि फिरते पथक योजनेची आढावा बैठक मंत्रालयात झाली. यावेळी त्या बोलत होत्या. यावेळी सचिव डॉ. अनुपकुमार यादव, आयुक्त वर्षा लड्डा यांच्यासह अधिकारी उपस्थित होते. महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे म्हणाल्या की, शासनाच्या विविध योजनांच्या सुसूत्रीकरणाच्या अनुषंगाने या योजनेच्या अर्ज प्रक्रियेत सुधारणा करण्यात आली आहे. अर्ज नोंदणी, छाननी, अर्ज मंजुरी आणि लाभ मंजुरी या प्रक्रियांमध्ये सुसूत्रता आणण्यात आली आहे. तसेच आवश्यक कागदपत्रांची संख्याही कमी करण्यात आली आहे. त्यामुळे अर्ज प्रक्रियेत पारदर्शकता आणि सुलभता येण्यास मदत होणार आहे.
या योजनेअंतर्गत मिळणारा लाभ थेट लाभ हस्तांतरण पद्धतीने लाभार्थ्यांच्या खात्यात जमा करण्याचा निर्णय यापूर्वीच घेण्यात आला आहे. आता अर्ज प्रक्रिया ऑनलाइन करण्यात आल्याने योजनेच्या अंमलबजावणीत आणखी सुलभता येणार असल्याचेही त्या म्हणाल्या. अर्जदारांना https://mahadbt2.maharashtra.gov.in या पोर्टलवर जाऊन अर्ज करता येणार आहे. याशिवाय, अर्जदारांना आपल्या अर्जाची सद्यस्थितीही ऑनलाइन पाहता येणार आहे.
क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले बालसंगोपन योजना
० ते १८ वयोगटातील अनाथ, निराश्रित, बेघर तसेच अन्य प्रकारे गरजू बालकांचे संस्थाबाह्य कौटुंबिक वातावरणात संगोपन व्हावे, त्यांना मूलभूत सुविधा उपलब्ध व्हाव्यात आणि त्यांचा सर्वांगीण विकास व्हावा, या उद्देशाने ही योजना राबविण्यात येते. या योजनेअंतर्गत प्रत्येक लाभार्थ्याला प्रतिमहा २ हजार २५० रुपये, तर संस्थेला २५० रुपये असे एकूण २ हजार ५०० रुपयांचे अनुदान दिले जाते. हे अनुदान थेट लाभ हस्तांतरण पद्धतीने जमा करण्यात येते. सध्या या योजनेअंतर्गत सुमारे २ लाख ८ हजार लाभार्थी आहेत.