मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांना पुन्हा एकदा मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पुण्यातील रुबी हॉल क्लिनिकमधून डिस्चार्ज मिळाल्यानंतर ते मुंबईला रवाना झाले होते. मात्र, मुंबईत पोहोचल्यानंतर रात्री त्यांना पुन्हा अस्वस्थ वाटू लागल्याने रुग्णालयात दाखल करण्याचा निर्णय घेण्यात आला.
शरद पवार यांना कफ, खोकला आणि छातीतील संसर्गाचा त्रास होत असल्याची माहिती समोर आली आहे. यापूर्वी दुष्काळ पाहणी दौऱ्यावर असताना त्यांना थकवा आणि कफाचा त्रास जाणवू लागला होता. त्यामुळे त्यांना पुण्यातील रुबी हॉल रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तेथे दोन दिवस उपचार केल्यानंतर त्यांना डिस्चार्ज देण्यात आला होता.मात्र, मुंबईत आल्यानंतर पुन्हा वैद्यकीय तपासणी आणि उपचारांची आवश्यकता भासल्याने त्यांना ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले.
डॉक्टरांनी दिली प्रकृतीबाबत माहिती
ब्रीच कँडी रुग्णालयातील डॉक्टर डॉ. प्रतीत समदानी यांनी शरद पवार यांच्या प्रकृतीबाबत माहिती दिली आहे. त्यांना कफ आणि छातीतील संसर्गाचा त्रास असून, त्यांच्यावर आवश्यक उपचार सुरू आहेत. सध्या त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे डॉक्टरांनी स्पष्ट केले. वैद्यकीय तपासण्या आणि उपचार पूर्ण झाल्यानंतर त्यांना लवकरच रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात येऊ शकतो.
शरद पवारांचे सर्व नियोजित दौरे रद्द
दरम्यान, शरद पवार यांचा राज्यातील दुष्काळ पाहणी दौरा नियोजित होता. मात्र, प्रकृतीच्या कारणास्तव त्यांचे सर्व नियोजित दौरे रद्द करण्यात आल्याची माहिती आहे.याबाबत आमदार रोहित पवार यांनीही प्रतिक्रिया दिली आहे. शरद पवार यांची प्रकृती चांगली असून, नियमित वैद्यकीय तपासणीसाठी त्यांना पुण्यातील रुबी हॉल रुग्णालयात नेण्यात आले होते, असे त्यांनी सांगितले. दर चार ते पाच महिन्यांनी त्यांच्या आरोग्याची तपासणी केली जाते. बाहेर दौऱ्यावर असताना व्हायरल इन्फेक्शन झाले असण्याची शक्यता असल्याने तपासण्या करण्यात आल्या. मुंबईत आल्यानंतर पुन्हा एकदा सर्व चाचण्या करून घ्याव्यात, अशी कुटुंबीयांची इच्छा होती. त्यामुळे त्यांना ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचे रोहित पवार यांनी स्पष्ट केले.सध्या शरद पवार यांची प्रकृती स्थिर असून, डॉक्टरांचे पथक त्यांच्या प्रकृतीवर लक्ष ठेवून आहे.