पुणे : दिवाळीच्या सणाच्या पार्श्वभूमीवर मिठाई आणि खाद्यपदार्थांच्या विक्रीत होणारी संभाव्य भेसळ रोखण्यासाठी अन्न व औषध प्रशासनाने (FDA) पुणे शहर, पिंपरी-चिंचवड आणि पुणे जिल्ह्यात विशेष तपासणी मोहीम राबवली. या मोहिमेंतर्गत एकूण १० ठिकाणी छापे टाकण्यात आले. या कारवाईत तब्बल ९ लाख ३९ हजार रुपये किमतीचा खाद्यपदार्थांचा साठा जप्त करण्यात आला असून, त्यातील सुमारे दीड हजार किलो निकृष्ट दर्जाचे अन्नपदार्थ जागेवरच नष्ट करण्यात आले आहेत.नियमांचे उल्लंघन करणाऱ्या काही मिठाई विक्रेत्यांचे परवाने निलंबित करण्यात आले, तर वैध परवाना नसलेल्या व्यावसायिकांना व्यवसाय बंद करण्याच्या नोटिसा देण्यात आल्या आहेत.
कॅम्पमधील मिठाई दुकानावर मोठी कारवाई
पुण्यातील कॅम्प परिसरातील कराची स्वीट मार्ट येथे तपासणीदरम्यान ९० हजार रुपये किमतीचे १८६ किलो मोतीचूर लाडू, खवा आणि मलाई पेढा जप्त करून नष्ट करण्यात आला. मिठाई तयार करताना सिंथेटिक खाद्यरंगांचा वापर केल्याचे आढळले. मात्र, त्याच्या वापरासंदर्भातील आवश्यक नोंदी उपलब्ध नव्हत्या. याशिवाय खव्याच्या खरेदीच्या नोंदी, साठवणूक आणि तापमान नियंत्रणाच्या नियमांचेही उल्लंघन झाल्याचे समोर आले. कालबाह्य चोको स्टिक्स वापरल्याचेही निदर्शनास आल्याने दुकानाचा परवाना तातडीने निलंबित करण्यात आला.
परवान्याशिवाय व्यवसाय करणाऱ्यांना नोटिसा
वानवडी येथील पौर्णिमा स्वीट्स आणि मुंढवा येथील जनता स्वीट्स यांच्याकडे वैध अन्न व्यवसाय परवाना नसल्याचे आढळले. त्यामुळे दोन्ही आस्थापनांना व्यवसाय बंद करण्याच्या नोटिसा बजावण्यात आल्या. पौर्णिमा स्वीट्समधून ३७ हजार रुपये किमतीचा ५८ किलो कलाकंद जप्त करण्यात आला.तर शिवाजीनगर येथील न्यू क्वालिटी डेअरी फार्ममधून ३१ हजार रुपये किमतीचे १०४ किलो दही, क्रीम, गायीचे दूध, पनीर आणि तूप जप्त करण्यात आले. मोहम्मदवाडीतील बिकानेर मिठाईवाले येथून अयोग्य साठवणूक आणि हाताळणीमुळे ८८ हजार रुपये किमतीची २६८ किलो बर्फी जप्त करून नष्ट करण्यात आली.
जिल्ह्यातील मिठाई उत्पादन केंद्रांवरही छापे
मुळशी तालुक्यातील मान येथील चामुंडा माँ रबडीवाला या दुकानातून १ लाख ७५ हजार रुपये किमतीची ४८६ किलो रबडी आणि रसगुल्ले जप्त करण्यात आले. अयोग्य पद्धतीने साठवणूक आणि निकृष्ट दर्जामुळे ही कारवाई करण्यात आली.
शिक्रापूर येथील श्री गणेश लाडूवाले यांच्याकडे परवान्याशिवाय अस्वच्छ वातावरणात खाद्यपदार्थ तयार केले जात असल्याचे आढळले. येथून १ लाख २५ हजार रुपये किमतीचे ६०५ किलो लाडू आणि म्हैसूर पाक जप्त करण्यात आले.
मंचर येथील राजमिलन स्वीट्समधून ८० हजार रुपये किमतीचा २५० किलो मिठाईचा मावा जप्त करून नष्ट करण्यात आला. तसेच खेड तालुक्यातील शिरोली येथील अंबिका फूड्स या उत्पादन केंद्रावर छापा टाकून १ लाख ६२ हजार रुपये किमतीची ६४८ किलो सोनपापडी जप्त करण्यात आली. या उत्पादन केंद्राचा परवानाही निलंबित करण्यात आला आहे.
पिंपरी-चिंचवडमध्येही FDA ची धडक
पिंपळे सौदागर येथील भायल स्वीट्स आणि काळेवाडीतील पुणेरी स्वीट्स या आस्थापनांवरही अन्न व औषध प्रशासनाने कारवाई केली. या दोन्ही ठिकाणांहून अनुक्रमे ९२.५ किलो आणि ३५ किलो खाद्यपदार्थांचा साठा ताब्यात घेऊन नष्ट करण्यात आला.
दिवाळीच्या काळात मिठाई आणि इतर खाद्यपदार्थांची मागणी वाढत असल्याने नागरिकांनी खरेदी करताना काळजी घ्यावी, तसेच अन्नपदार्थांची गुणवत्ता आणि विक्रेत्यांकडे आवश्यक परवाने आहेत की नाहीत, याकडे लक्ष द्यावे.