सातारा : ऊसदराच्या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने पुणे-बेंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर सुरू केलेले चक्काजाम आंदोलन अखेर ६१ तासांनंतर मागे घेण्यात आले आहे. ऊस उत्पादक शेतकऱ्यांना प्रतिटन ४ हजार २०० रुपये दर देण्याच्या मागणीवर साखर कारखानदार आणि संघटनेच्या नेत्यांमध्ये सहमती झाल्यानंतर आंदोलन स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आला. संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी मध्यरात्री एक वाजण्याच्या सुमारास किणी टोलनाक्यावर आंदोलन मागे घेतल्याची घोषणा केली.
या निर्णयामुळे गेल्या तीन दिवसांपासून विस्कळीत झालेली पुणे-बेंगळुरू महामार्गावरील वाहतूक पुन्हा सुरळीत होण्यास सुरुवात झाली आहे. आंदोलनामुळे महामार्गावर वाहनांच्या तब्बल १० ते १५ किलोमीटर लांब रांगा लागल्या होत्या. दिवाळीच्या काळात प्रवाशांना आणि वाहनचालकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागले होते.
ऊसदरावर अखेर तोडगा; शेतकऱ्यांना मिळणार ४२०० रुपये प्रतिटन
ऊसदराच्या प्रश्नावर कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयात साखर कारखानदार आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या प्रतिनिधींमध्ये महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीत कारखानदारांनी सुधारित दराचा प्रस्ताव मांडला. चर्चेनंतर पहिली उचल म्हणून प्रतिटन ३ हजार ९०० रुपये, साखर हंगाम संपल्यानंतर १०० रुपये आणि पुढील हंगाम सुरू होण्यापूर्वी आणखी २०० रुपये देण्याचे निश्चित करण्यात आले. अशा प्रकारे शेतकऱ्यांना एकूण ४ हजार २०० रुपये प्रतिटन मिळणार आहेत.
सुरुवातीला कारखानदारांकडून ३ हजार ८०० रुपये आणि अतिरिक्त २०० रुपये असा प्रस्ताव देण्यात आला होता. मात्र, स्वाभिमानी शेतकरी संघटनेने ४ हजार ५०० रुपयांच्या मागणीवरून माघार घेत ४ हजार २०० रुपयांवर तोडगा काढण्याची तयारी दर्शवली. अखेर दोन्ही बाजूंमध्ये सहमती झाल्याने आंदोलन संपुष्टात आले.
साखरेचे दर वाढल्यास शेतकऱ्यांनाही अतिरिक्त रक्कम
साखरेचा प्रतिक्विंटल ४ हजार ५०० रुपये दर गृहीत धरून हा निर्णय घेण्यात आला आहे. भविष्यात साखरेच्या दरात वाढ झाल्यास त्यातून मिळणाऱ्या अतिरिक्त उत्पन्नातील ७० टक्के हिस्सा शेतकऱ्यांना, तर ३० टक्के हिस्सा कारखान्यांना देण्याचेही बैठकीत निश्चित करण्यात आले आहे. त्यामुळे ऊस उत्पादकांना साखरेच्या दरवाढीचा लाभ मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
तीन दिवसांपासून महामार्गावर आंदोलन; एसटीच्या १६६ फेऱ्या रद्द
ऊसाला प्रतिटन ४ हजार ५०० रुपये पहिली उचल मिळाल्याशिवाय महामार्ग वाहतुकीसाठी खुला करणार नाही, अशी भूमिका राजू शेट्टी यांनी घेतली होती. त्यानुसार ३ नोव्हेंबरपासून पुणे-बेंगळुरू महामार्गावरील किणी टोलनाक्यावर आंदोलन सुरू होते. सातारा जिल्ह्यातील नागठाणे येथेही संघटनेच्या कार्यकर्त्यांनी महामार्ग रोखून धरला होता.
या आंदोलनाचा मोठा फटका महामार्गावरील वाहतुकीला बसला. वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याने प्रवाशांचे हाल झाले. ऐन दिवाळीत एसटी वाहतूक व्यवस्थेवरही परिणाम झाला. कोल्हापूरहून पुणे आणि मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या तब्बल १६६ एसटी बस फेऱ्या रद्द कराव्या लागल्या होत्या.
आंदोलन मागे; कारखाने सुरू होण्याचा मार्ग मोकळा
ऊसदराचा प्रश्न मार्गी लागल्यानंतर कोल्हापूर, सांगली आणि सातारा जिल्ह्यांतील साखर कारखाने सुरू होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. तसेच या तिन्ही जिल्ह्यांसाठी एकच ऊसदर पद्धत लागू करण्यावरही सहमती झाली आहे. आंदोलन स्थगित झाल्यानंतर महामार्गावरील अडकलेली वाहने मार्गस्थ होऊ लागली असून वाहतूक पूर्वपदावर येत आहे. त्यामुळे गेल्या तीन दिवसांपासून रखडलेला प्रवास अखेर सुरळीत होण्याची चिन्हे आहेत.