सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • महिला व ज्येष्ठ नागरिकांना एनसीएमसी कार्डसाठी नवीन मुदतवाढ! कार्ड अनिवार्य करण्याचा निर्णय 1 जानेवारी 2027 पर्यंत पुढे ढकलला, मंत्री प्रताप सरनाईकांची माहिती
  • खालपासून वरपर्यंत सत्तेत, तरी लोकशाही वाचवा मोर्चे काढता, मग गोकुळला सतेज पाटलांचे 13 जण निवडून आल्यावर लगेच तुमचे 5 संचालक का नेमले? मतदानाचा अधिकार देत काय सिद्ध करताय? राज ठाकरेंची फटकार
  • 61 तासांनंतर स्वाभिमानीचं चक्काजाम आंदोलन मागं; पुणे-बेंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी फुटली, वाहतूक पूर्वपदावर
 जिल्हा

नागपूरच्या मेयो रुग्णालयात निवासी डॉक्टरला पोलिसाकडून मारहाण; सीसीटीव्ही फुटेज समोर, डॉक्टरवरच गुन्हे दाखल झाल्याने मार्ड आक्रमक!

डिजिटल पुणे    06-11-2026 11:47:34

नागपूर : नागपूर येथील इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (मेयो) येथे निवासी डॉक्टराला पोलीस कर्मचारी आणि त्याच्या मुलाकडून मारहाण करण्यात आल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. ४ नोव्हेंबर रोजी घडलेल्या या घटनेचे सीसीटीव्ही फुटेजही समोर आले असून, या प्रकरणामुळे वैद्यकीय क्षेत्रात संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. विशेष म्हणजे, मारहाणीची तक्रार करणाऱ्या डॉक्टरवरच गुन्हे दाखल करण्यात आल्याचा आरोप महाराष्ट्र असोसिएशन ऑफ रेसिडेंट डॉक्टर्स (मार्ड) संघटनेने केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मेयो रुग्णालयाच्या अपघात विभागात एका गंभीर रुग्णावर उपचार सुरू असताना त्याला प्राधान्य देण्यात आले. यामुळे नाराज झालेल्या पोलीस कर्मचाऱ्याने आणि त्याच्या मुलाने कर्तव्यावर असलेल्या निवासी डॉक्टराशी वाद घालत त्याला मारहाण केल्याचा आरोप आहे. या घटनेनंतर संबंधित डॉक्टरांनी न्याय मिळवण्यासाठी तहसील पोलीस ठाण्यात तक्रार देण्याचा प्रयत्न केला.

मात्र, तक्रार नोंदवण्यासाठी गेलेल्या डॉक्टरांना तब्बल सहा तास पोलीस ठाण्यात बसवून ठेवण्यात आल्याचा दावा मार्ड संघटनेने केला आहे. त्यानंतर संबंधित पोलीस कर्मचाऱ्याविरोधात कारवाई करण्यासोबतच तक्रारदार डॉक्टरांवरही डांबून ठेवणे आणि जीवितास धोका निर्माण करणे यांसारख्या गंभीर आरोपांखाली गुन्हे दाखल करण्यात आल्याचे संघटनेचे म्हणणे आहे.

मार्डचा आक्रमक पवित्रा; राज्यव्यापी आंदोलनाचा इशारा

या संपूर्ण प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, संबंधित पोलीस कर्मचाऱ्याला तातडीने अटक करावी आणि त्याला सेवेतून निलंबित करावे, अशा प्रमुख मागण्या मार्ड संघटनेने केल्या आहेत.

मागण्या मान्य न झाल्यास मेयो रुग्णालयातील निवासी डॉक्टर बेमुदत काम बंद आंदोलन पुकारणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे. तसेच, या आंदोलनाला राज्यव्यापी स्वरूप देण्याचा इशारा राज्य मार्डने दिला आहे. त्यामुळे आगामी काळात या प्रकरणाचे पडसाद राज्यातील वैद्यकीय सेवांवर उमटण्याची शक्यता आहे.

दरम्यान, या प्रकरणात पोलिसांनी दोन्ही बाजूंच्या तक्रारींच्या आधारे गुन्हे दाखल केले असून, सध्या तपास सुरू आहे. चौकशीतून घटनेचे नेमके वास्तव समोर येईल. कोणत्याही एका बाजूची पाठराखण करण्यात आलेली नाही, अशी भूमिका पोलिसांनी स्पष्ट केली आहे.


 Give Feedback



 जाहिराती