सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • महिला व ज्येष्ठ नागरिकांना एनसीएमसी कार्डसाठी नवीन मुदतवाढ! कार्ड अनिवार्य करण्याचा निर्णय 1 जानेवारी 2027 पर्यंत पुढे ढकलला, मंत्री प्रताप सरनाईकांची माहिती
  • खालपासून वरपर्यंत सत्तेत, तरी लोकशाही वाचवा मोर्चे काढता, मग गोकुळला सतेज पाटलांचे 13 जण निवडून आल्यावर लगेच तुमचे 5 संचालक का नेमले? मतदानाचा अधिकार देत काय सिद्ध करताय? राज ठाकरेंची फटकार
  • 61 तासांनंतर स्वाभिमानीचं चक्काजाम आंदोलन मागं; पुणे-बेंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी फुटली, वाहतूक पूर्वपदावर
 जिल्हा

महिला आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी दिलासादायक निर्णय! एसटीच्या सवलतींसाठी NCMC कार्डची सक्ती आता 1 जानेवारी 2027 पासून

डिजिटल पुणे    06-11-2026 13:17:31

मुंबई : राज्यातील महिला आणि ज्येष्ठ नागरिक एसटी प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी आहे. एसटी महामंडळाच्या प्रवास भाड्यात मिळणाऱ्या सवलतींचा लाभ घेण्यासाठी आवश्यक करण्यात आलेल्या NCMC स्मार्ट कार्डची अनिवार्यता आता नव्या वर्षापर्यंत पुढे ढकलण्यात आली आहे. हे कार्ड अनिवार्य करण्याचा निर्णय 1 जानेवारी 2027 पासून लागू होणार असल्याची माहिती परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी दिली.

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाकडून महिला, ज्येष्ठ नागरिक आणि अमृत ज्येष्ठ नागरिकांसाठी विविध प्रवास सवलती दिल्या जातात. या सवलतींचा लाभ पारदर्शक आणि सुलभ पद्धतीने मिळावा, यासाठी NCMC (नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड) स्मार्ट कार्डची नोंदणी व वितरण सुरू करण्यात आले आहे. यापूर्वी 1 ऑक्टोबर 2026 पासून सवलतींचा लाभ घेण्यासाठी हे कार्ड अनिवार्य करण्यात आले होते.

दरम्यान, राज्यात आतापर्यंत सुमारे 1 कोटी 10 लाख NCMC कार्डांची नोंदणी आणि वितरण करण्यात आले आहे. मात्र, ग्रामीण भागातील अनेक महिला लाभार्थ्यांपर्यंत या योजनेची पुरेशी माहिती पोहोचलेली नाही. त्यामुळे अनेक पात्र प्रवाशांची कार्ड नोंदणी अद्याप पूर्ण झालेली नसल्याचे समोर आले आहे. या अडचणींचा विचार करून तसेच सामाजिक संघटना, लोकप्रतिनिधी आणि विविध राजकीय पक्षांकडून करण्यात आलेल्या मागण्यांच्या पार्श्वभूमीवर एसटी महामंडळाने कार्ड अनिवार्य करण्याच्या निर्णयाला मुदतवाढ दिली आहे.

7 नोव्हेंबरपासून 31 डिसेंबरपर्यंत कार्डशिवाय मिळणार सवलत

नव्या निर्णयानुसार, 7 नोव्हेंबर 2026 ते 31 डिसेंबर 2026 या कालावधीत महिला आणि ज्येष्ठ नागरिकांना NCMC स्मार्ट कार्ड नसले तरी एसटीच्या नियमानुसार मिळणाऱ्या प्रवास सवलतींचा लाभ घेता येणार आहे. त्यामुळे अद्याप कार्ड नोंदणी न केलेल्या प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे.

ग्रामपंचायत स्तरावर विशेष नोंदणी शिबिरे

राज्यातील सर्व पात्र लाभार्थ्यांपर्यंत स्मार्ट कार्ड पोहोचवण्यासाठी एसटी महामंडळाकडून आता ग्रामपंचायत स्तरावर विशेष नोंदणी शिबिरे आयोजित केली जाणार आहेत. या मोहिमेत स्थानिक लोकप्रतिनिधी, प्रवासी संघटना आणि ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांचा सहभाग घेतला जाणार आहे. 31 डिसेंबर 2026 पर्यंत सर्व पात्र लाभार्थ्यांची 100 टक्के नोंदणी आणि कार्ड वितरण पूर्ण करण्याचे उद्दिष्ट महामंडळाने ठेवले आहे.

दरम्यान, मुदतवाढीचा लाभ घेत महिला आणि ज्येष्ठ नागरिकांनी या कालावधीत आपले NCMC स्मार्ट कार्ड नोंदणी करून घ्यावे, असे आवाहन परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी केले आहे. कोणताही पात्र लाभार्थी प्रवास सवलतीपासून वंचित राहू नये, यासाठी महामंडळाकडून विशेष प्रयत्न केले जात असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.


 Give Feedback



 जाहिराती