सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • मोठी बातमी! दहावी-बारावी बोर्ड परीक्षांचे अंतिम वेळापत्रक जाहीर; फेब्रुवारीपासून परीक्षांना सुरुवात,
 राज्य

मृत्यूशी झुंज देणाऱ्या ‘माया’ला वनताराचा आधार; केरळमधून विशेष विमानाने जामनगरला हलवले, तज्ज्ञ डॉक्टरांकडून उपचार सुरू

डिजिटल पुणे    07-11-2026 12:48:39

जामनगर : आई आणि हत्तींच्या कळपापासून जन्मताच दुरावलेल्या अवघ्या १८ महिन्यांच्या ‘माया’ या हत्तीच्या पिल्लाला जीवदान देण्यासाठी अनंत अंबानी यांच्या वनतारा संस्थेने पुढाकार घेतला आहे. केरळमध्ये गंभीर जखमी अवस्थेत असलेल्या मायाला विशेष हवाई रुग्णवाहिकेतून गुजरातमधील जामनगर येथे हलविण्यात आले असून, वनताराच्या अत्याधुनिक उपचार केंद्रात तिच्यावर उपचार केले जाणार आहेत.

केरळमधील मलयाट्टूर वन विभागाच्या कप्रिक्काड परिसरात १९ एप्रिल २०२५ रोजी हे हत्तीचे पिल्लू एकटे आढळले होते. नदी ओलांडून हत्तींचा कळप पुढे गेल्यानंतर माया मागे राहिली होती. जन्मानंतर आईचे दूधही न मिळाल्याने तिची प्रकृती अत्यंत नाजूक झाली होती. शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होणे आणि अशक्तपणा अशा समस्यांचा सामना करणाऱ्या या पिल्लाची जबाबदारी केरळ वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी स्वीकारली. वन विभागाचे पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. बिनॉय सी. बाबू आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी दिवस-रात्र तिची काळजी घेतली. याच काळात तिला ‘माया’ हे नाव देण्यात आले.

मात्र, जुलै २०२६ मध्ये खेळताना पाय घसरून पडल्याने मायाच्या पुढील दोन्ही पायांना गंभीर दुखापत झाली. तिच्यावर फिजिओथेरपी, स्प्लिंट्स आणि औषधोपचार करण्यात आले. तरीही तिच्या प्रकृतीत अपेक्षित सुधारणा झाली नाही. ऑक्टोबर महिन्याच्या अखेरीस दोन्ही पुढच्या पायांची हाडे फ्रॅक्चर झाल्याने तिला उभे राहणेही अशक्य झाले. याशिवाय छातीतील संसर्ग आणि दीर्घकाळ एकाच स्थितीत पडून राहिल्यामुळे शरीरावर जखमा झाल्या. त्यामुळे तिची प्रकृती अधिकच चिंताजनक बनली.

तज्ज्ञांच्या सल्ल्यानंतर वनताराकडून मदतीचा निर्णय

मायाची गंभीर अवस्था लक्षात घेऊन केरळचे मुख्य वन्यजीव संरक्षक डॉ. पी. पुगाझेंडी यांनी तिच्या उपचारांसाठी देशातील नामवंत हत्ती तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेतले. प्रख्यात हत्ती पशुवैद्यक पद्मश्री डॉ. कुशल कोन्वर सरमा यांनी तिची तपासणी केली. मायाच्या आजारामागे पॅराथायरॉइड ग्रंथीशी संबंधित विकार असण्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली. योग्य उपचार आणि वैद्यकीय देखरेख मिळाल्यास तिच्या प्रकृतीत सुधारणा होऊ शकते, असे मत त्यांनी मांडले.

यानंतर वनताराच्या एलिफंट केअर सेंटरचे प्रमुख पशुवैद्यक डॉ. यदुराज खडपेकर यांनीही या उपचार प्रक्रियेला सहमती दर्शवली. वैद्यकीय तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार मायाला अधिक प्रगत उपचार मिळावेत यासाठी तिला जामनगर येथे हलविण्याचा निर्णय घेण्यात आला. सहा नोव्हेंबर रोजी विशेष वैद्यकीय सुविधांनी सज्ज असलेल्या हवाई रुग्णवाहिकेतून तिला वनताराच्या उपचार केंद्रात आणण्यात आले.

अत्याधुनिक उपचारांसह विशेष देखभाल

मायाच्या उपचारांसाठी वनताराकडून विशेष वैद्यकीय पथक तैनात करण्यात आले आहे. या पथकात तीन हत्ती पशुवैद्यक, पशुवैद्यकीय सहाय्यक आणि प्रशिक्षित देखभाल कर्मचारी यांचा समावेश आहे. केरळमध्ये सुरुवातीपासून तिची देखभाल करणारे डॉ. बिनॉय सी. बाबू आणि निखिल बाबू हेदेखील तिच्यासोबत जामनगरला आले आहेत. उपचार पूर्ण होईपर्यंत निखिल बाबू तिच्या सोबत राहणार आहेत.

वनताराच्या केंद्रात मायाच्या वेदना कमी करण्यावर विशेष भर दिला जाणार आहे. तिच्या हाडांची स्थिती, संसर्ग आणि एकूण आरोग्याची नियमित तपासणी केली जाईल. तिला सुरक्षितपणे उचलण्यासाठी हायड्रॉलिक यंत्रणेची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. तसेच प्रकृतीनुसार जलोपचार (हायड्रोथेरपी), आधुनिक वैद्यकीय तपासण्या आणि आवश्यक औषधोपचार केले जाणार आहेत.

उपचार पूर्ण झाल्यानंतर मायाची केरळमध्ये घरवापसी

मायाच्या उपचारांची संपूर्ण जबाबदारी वनतारा संस्थेने स्वीकारली असली, तरी तिची अधिकृत जबाबदारी केरळ वन विभागाकडेच राहणार आहे. जामनगर येथे उपचार पूर्ण झाल्यानंतर तिला पुन्हा केरळमधील अभयारण्यात पाठविण्याची व्यवस्था वनताराकडून केली जाणार आहे.

वनताराचे मुख्य कार्यकारी अधिकारी विवान करणी यांनी मायाच्या प्रकृतीबाबत भावना व्यक्त केल्या. माया आतापर्यंत प्रत्येक दिवस जगण्यासाठी संघर्ष करत आली आहे. आता तिच्या आयुष्यासाठी वनताराचे संपूर्ण पथक प्रयत्नांची पराकाष्ठा करेल. उपचारादरम्यान तिची एका क्षणासाठीही साथ सोडली जाणार नाही, असे त्यांनी सांगितले. या चिमुकल्या हत्तीच्या पिल्लासाठी सर्वांनी प्रार्थना करण्याचे आवाहनही त्यांनी केले.

वन्यजीवांच्या बचाव आणि संवर्धनासाठी वनताराचे कार्य

गुजरातमधील जामनगर येथे मुख्यालय असलेली वनतारा संस्था वन्यजीवांचे बचावकार्य, उपचार, पुनर्वसन आणि संवर्धनासाठी कार्यरत आहे. अनंत अंबानी यांनी स्थापन केलेल्या या संस्थेमध्ये आधुनिक पशुवैद्यकीय सुविधा, तज्ज्ञ डॉक्टर आणि प्राण्यांच्या देखभालीसाठी विशेष व्यवस्था उपलब्ध आहेत. जखमी व संकटग्रस्त प्राण्यांना उपचार देण्याबरोबरच त्यांच्या पुनर्वसनावर आणि योग्य परिस्थितीत नैसर्गिक अधिवासात परत पाठविण्यावरही संस्थेकडून भर दिला जातो.सध्या मायाच्या प्रकृतीकडे सर्वांचे लक्ष लागले असून, अत्याधुनिक उपचार आणि तज्ज्ञांच्या प्रयत्नांमुळे ती लवकरच बरी होऊन पुन्हा आपल्या परिचित वातावरणात परतेल, अशी आशा व्यक्त केली जात आहे.


 Give Feedback



 जाहिराती