सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • मोठी बातमी! दहावी-बारावी बोर्ड परीक्षांचे अंतिम वेळापत्रक जाहीर; फेब्रुवारीपासून परीक्षांना सुरुवात,
 विश्लेषण

लॉरेन्स बिश्नोई गँगला मोठा धक्का! रोहित शेट्टीच्या घरावरील गोळीबार प्रकरणातील कथित सूत्रधार हॅरी बॉक्सरला अमेरिकेत अटक

डिजिटल पुणे    07-11-2026 13:28:23

नवी दिल्ली : कुख्यात लॉरेन्स बिश्नोई टोळीशी संबंधित गँगस्टर हॅरी बॉक्सर याला अमेरिकेत अटक करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. कॅलिफोर्निया येथे अमेरिकेच्या इमिग्रेशन अँड कस्टम्स एन्फोर्समेंट (ICE) यंत्रणेने त्याला ताब्यात घेतले. दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकाने दिलेल्या गोपनीय माहितीच्या आधारे ही कारवाई करण्यात आल्याचे सांगितले जात आहे. या अटकेमुळे भारतातील बिश्नोई टोळीच्या गुन्हेगारी नेटवर्कबाबत महत्त्वाची माहिती समोर येण्याची शक्यता आहे.

हॅरी बॉक्सरचे मूळ नाव हरिचंद जाट असल्याचे सांगितले जाते. तो लॉरेन्स बिश्नोई टोळीतील सक्रिय आणि महत्त्वाचा सदस्य मानला जातो. हत्या, खंडणी व जीवे मारण्याच्या धमक्या यांसारख्या गंभीर गुन्ह्यांमध्ये त्याचे नाव समोर आले आहे. राजस्थान, पंजाब आणि दिल्लीमध्येही त्याच्याविरोधात विविध गुन्हे दाखल असल्याची माहिती आहे.

रोहित शेट्टीच्या घराबाहेरील गोळीबाराशी संबंध

मुंबईतील जुहू परिसरातील प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक रोहित शेट्टी यांच्या निवासस्थानाबाहेर १ फेब्रुवारी २०२६ रोजी मध्यरात्री गोळीबाराची घटना घडली होती. अज्ञात हल्लेखोरांनी शेट्टी टॉवरच्या बाहेर अनेक राऊंड गोळ्या झाडल्या होत्या. या घटनेच्या वेळी रोहित शेट्टी घरात उपस्थित होते. मात्र, सुदैवाने या हल्ल्यात कोणालाही दुखापत झाली नव्हती.

या गोळीबाराची जबाबदारी हॅरी बॉक्सरने स्वीकारल्याचा दावा करण्यात आला होता. त्यानंतर सोशल मीडिया पोस्ट आणि ऑडिओ संदेशांच्या माध्यमातून त्याने चित्रपटसृष्टीतील काही कलाकारांना धमकावल्याचेही समोर आले होते. त्यामुळे त्याच्या अटकेकडे या प्रकरणाच्या तपासातील महत्त्वाची घडामोड म्हणून पाहिले जात आहे.

रणवीर सिंहकडे २० कोटींच्या खंडणीची मागणी?

अभिनेता रणवीर सिंह याच्याकडे २० कोटी रुपयांची खंडणी मागितल्याचा आरोपही हॅरी बॉक्सरवर आहे. याशिवाय अभिनेता टायगर श्रॉफसह इतर कलाकारांना मिळालेल्या धमक्यांच्या घटनांशी त्याचा काही संबंध आहे का, याचाही तपासातून उलगडा होण्याची शक्यता आहे. प्रसिद्ध कॉमेडियन कपिल शर्मा यांच्या कॅनडातील कॅफेवर झालेल्या गोळीबाराच्या प्रकरणातही हॅरी बॉक्सरचे नाव चर्चेत आले होते.

अटकेनंतर बिश्नोई गँगचे नेटवर्क उघड होणार?

हॅरी बॉक्सर अमेरिकेत राहून भारतातील टोळीच्या माध्यमातून गुन्हेगारी कारवाया चालवत असल्याचा आरोप आहे. त्याच्या चौकशीतून परदेशातून भारतात चालवले जाणारे खंडणीचे जाळे, धमक्यांचे प्रकार आणि टोळीतील इतर सदस्यांच्या हालचालींबाबत महत्त्वाचे धागेदोरे मिळू शकतात.

यापूर्वी गँगस्टर हिमांशू भाऊ आणि नीरज फरीदपूरिया यांनाही अमेरिकेत ताब्यात घेण्यात आल्याची माहिती समोर आली होती. आता हॅरी बॉक्सरच्या अटकेमुळे परदेशात बसून भारतात गुन्हेगारी कारवाया करणाऱ्या टोळ्यांवर आंतरराष्ट्रीय पातळीवर सुरू असलेल्या कारवाईला आणखी बळ मिळण्याची शक्यता आहे.दरम्यान, हॅरी बॉक्सरच्या अटकेनंतर त्याला भारतात आणण्याची प्रक्रिया आणि त्याच्या चौकशीतून कोणती माहिती समोर येते, याकडे तपास यंत्रणांसह सर्वांचे लक्ष लागले आहे.


 Give Feedback



 जाहिराती