मुंबई : मुंबईतील विक्रोळी रेल्वे स्थानकात एक धक्कादायक घटना घडली आहे. आयुष्याला कंटाळून एका तरुणाने लोकल ट्रेनसमोर उभे राहत आपले जीवन संपवण्याचा प्रयत्न केल्याची माहिती समोर आली आहे. मात्र, याचवेळी एका प्रसंगावधान राखणाऱ्या प्रवाशाने स्वतःच्या जीवाची पर्वा न करता धाव घेत या तरुणाचे प्राण वाचवले. या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, संबंधित तरुण विक्रोळी रेल्वे स्थानकाजवळील रुळांवर उभा होता. कर्जतच्या दिशेने जाणाऱ्या धीम्या मार्गावरील लोकल ट्रेन त्याच्या दिशेने येत होती. ट्रेन काही मीटर अंतरावर असतानाही तरुण रुळांवरून बाजूला होण्यास तयार नव्हता. त्यामुळे स्थानकावर उपस्थित प्रवाशांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले होते.
याचवेळी एका प्रवाशाने क्षणाचाही विलंब न करता रेल्वे रुळांवर धाव घेतली आणि त्या तरुणाला जोराने बाजूला खेचले. तरुणाला रुळांवरून हटवल्यानंतर अवघ्या काही क्षणांतच लोकल ट्रेन तेथून पुढे गेली. त्यामुळे मोठा अनर्थ टळला.
मात्र, तरुणाला वाचवल्यानंतरही त्याचा पुन्हा रुळांवर जाण्याचा प्रयत्न सुरू होता. तो वारंवार प्रवाशाच्या पकडीतून सुटण्याचा प्रयत्न करत होता. एकदा तर त्याने पुन्हा ट्रेनच्या दिशेने जाण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्या धाडसी प्रवाशाने त्याला घट्ट पकडून ठेवले. या झटापटीत दोघेही खाली पडले, तरीही प्रवाशाने तरुणाला सोडले नाही. अखेर त्याने तरुणाला सुरक्षित ठेवण्यात यश मिळवले.
या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर संबंधित प्रवाशाच्या धाडसाचे सर्वत्र कौतुक होत आहे. स्वतःच्या जीवाची पर्वा न करता दुसऱ्याचे प्राण वाचवण्यासाठी दाखवलेल्या तत्परतेमुळे एका तरुणाला नवे आयुष्य मिळाले आहे.
दरम्यान, या घटनेची रेल्वे पोलिसांकडून चौकशी सुरू असल्याची माहिती आहे. व्हायरल व्हिडिओमधील घटनेचा नेमका तपशील आणि संबंधित तरुणाची परिस्थिती याबाबत अधिकृत माहिती समोर येणे बाकी आहे.