पुणे : पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळावर अंमली पदार्थांच्या तस्करीचा आणखी एक प्रकार उघडकीस आला आहे. बँकॉकहून पुण्यात आलेल्या एका भारतीय महिला प्रवाशाकडून कस्टम्स विभागाने तब्बल 1 कोटी 14 लाख रुपये किमतीचा हायड्रोपोनिक गांजा जप्त केला आहे. या कारवाईत 3 किलो 255 ग्रॅम गांजा हस्तगत करण्यात आला असून संबंधित महिलेला अटक करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, 5 नोव्हेंबर रोजी सायंकाळी एअर इंडिया एक्स्प्रेसच्या IX-291 या विमानातून ही महिला बँकॉकहून पुण्यात दाखल झाली होती. तिच्या हालचाली संशयास्पद वाटल्याने तसेच चेक-इन बॅगेच्या स्कॅनिंगदरम्यान संशय निर्माण झाल्याने कस्टम्स अधिकाऱ्यांनी तिच्या सामानाची सखोल तपासणी केली.
या तपासणीत ट्रॉली बॅगेच्या आतील अस्तराच्या दोन्ही बाजूंना खास पद्धतीने तयार केलेले गुप्त कप्पे आढळून आले. या कप्प्यांमध्ये तीन थरांच्या व्हॅक्यूम सीलबंद काळ्या प्लास्टिकमध्ये दोन आयताकृती पाकिटे लपवण्यात आली होती. अधिकाऱ्यांनी ही पाकिटे उघडून तपासली असता त्यामध्ये पिवळसर-हिरव्या रंगाचा सुकवलेला पदार्थ आढळला.
फील्ड टेस्टमध्ये हायड्रोपोनिक गांजा असल्याचे स्पष्ट
जप्त करण्यात आलेल्या पदार्थाची फील्ड टेस्टिंग किटच्या माध्यमातून तपासणी करण्यात आली. यामध्ये तो हायड्रोपोनिक गांजा असल्याचे निष्पन्न झाले. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत या गांजाची अंदाजित किंमत 1 कोटी 14 लाख रुपये असल्याची माहिती समोर आली आहे.
कस्टम्सच्या एअर इंटेलिजन्स युनिट आणि एअरपोर्ट बॅचच्या अधिकाऱ्यांनी संयुक्तरीत्या ही कारवाई केली. NDPS कायद्यानुसार संपूर्ण गांजा जप्त करण्यात आला असून महिला प्रवाशाला अटक करण्यात आली आहे.
या तस्करीमागे आणखी कोणाचा सहभाग आहे का, तसेच या प्रकरणाशी संबंधित एखादे मोठे तस्करीचे नेटवर्क कार्यरत आहे का, याचा तपास कस्टम्स विभागाकडून सुरू आहे. पुणे विमानतळावर झालेल्या या कारवाईमुळे अंमली पदार्थांच्या तस्करीचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.