सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • दिवाळीच्या फटाक्यांना ब्रेक! मुंबई आणि ठाण्यात रॉकेट फटाक्यांवर बंदी, राज्य सरकारचा मोठा निर्णय, नियम मोडल्यास कारवाई
  • पुण्यात दिवाळीत आगींचा भडका! लक्ष्मीपूजनाच्या दिवशी तब्बल ९४ ठिकाणी अग्नितांडव; सहा वर्षांतील सर्वाधिक घटना
  • कुठे फटाक्यांमुळे तर कुठे शॉर्ट सर्किट... दिवाळीला राज्यात भीषण अग्नितांडव; मुंबई, ठाण्यापासून ते नागपूर चंद्रपुरपर्यंत असंख्य आगीच्या घटना, मोठी वित्तहानी
  • सतेज पाटलांच्या एका हाकेवर गोकुळसाठी हजारोंची गर्दी जमली, कोल्हापूरच्या दसरा चौकात मुंगी शिरायलाही जागा उरली नाही!
 जिल्हा

ठाण्यात इमारतीला भीषण आग! एकनाथ शिंदे हातात बॅटरी घेऊन घटनास्थळी दाखल; अग्निशमन जवानांना विचारला, 'तो पोरगा यंग आहे ना?'

डिजिटल पुणे    09-11-2026 12:36:48

ठाणे : दिवाळीच्या लक्ष्मीपूजनाच्या दिवशी ठाण्यात आगीच्या भीषण दुर्घटनेने खळबळ उडाली. वागळे इस्टेट परिसरातील रहेजा गार्डन संकुलातील १७ मजली 'कार्लाइन' इमारतीला रविवारी रात्री भीषण आग लागली. नवव्या मजल्यावरून सुरू झालेल्या आगीने काही वेळातच वरच्या मजल्यांपर्यंत पसरत १७ व्या मजल्याला गाठले. या दुर्घटनेमुळे इमारतीतील रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली.

हातात बॅटरी घेऊन एकनाथ शिंदे इमारतीत दाखल

आगीची तीव्रता लक्षात घेऊन अग्निशमन दलाने खबरदारीचा उपाय म्हणून परिसरातील वीजपुरवठा बंद केला होता. त्यामुळे घटनास्थळी पोहोचलेल्या एकनाथ शिंदे यांनी हातात मोठी बॅटरी घेत इमारतीच्या पार्किंग परिसरात प्रवेश केला. यावेळी त्यांनी बचावकार्य करणाऱ्या अग्निशमन दलाच्या जवानांशी संवाद साधत परिस्थितीची माहिती घेतली.

इमारतीच्या वरच्या मजल्यावर एक व्यक्ती अडकली असल्याचे जवानांनी त्यांना सांगितले. त्यावर शिंदे यांनी, 'तो पोरगा यंग आहे ना?' असा प्रश्न विचारला. संबंधित तरुणाला व्हीलचेअरच्या मदतीने सुरक्षितपणे खाली आणले जात असल्याचे जवानांनी सांगितले. यानंतर इमारतीत धुराचे प्रमाण किती आहे, बचाव पथक वरच्या मजल्यावर पोहोचले आहे का, याचीही त्यांनी माहिती घेतली.

सहा तासांच्या प्रयत्नांनंतर आगीवर नियंत्रण

रविवारी रात्री साडेआठच्या सुमारास आग लागल्याची माहिती मिळताच ठाणे आणि मुंबई परिसरातील अग्निशमन दलाच्या १० ते १५ गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. अग्निशमन दलाच्या जवानांनी तब्बल सहा तास शर्थीचे प्रयत्न करत आगीवर नियंत्रण मिळवले.

या बचाव मोहिमेदरम्यान इमारतीत अडकलेल्या ५० हून अधिक रहिवाशांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आले. विशेष म्हणजे रहिवाशांसोबतच इमारतीतील पाळीव प्राण्यांचीही सुखरूप सुटका करण्यात आली. या दुर्घटनेत काही जणांना दुखापत झाली असून, सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही. मात्र, आगीमुळे इमारतीतील अनेक फ्लॅटमधील घरगुती साहित्य जळून खाक झाले असून मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान झाले आहे.

फटाक्यांमुळे आग लागल्याचा संशय; रॉकेट फटाक्यांवर बंदी

या घटनेनंतर ठाणे जिल्ह्याचे जिल्हाधिकारी श्रीकृष्ण पांचाळ यांनी सुरक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. ठाणे जिल्ह्यात रॉकेट आणि हवेत उडवून आतषबाजी करणाऱ्या फटाक्यांवर बंदी घालण्यात आली आहे. तसेच इतर प्रकारचे फटाके केवळ खुल्या मैदानातच फोडण्याचे आदेश देण्यात आले आहेत.दरम्यान, इमारतीला लागलेली आग फटाक्यांमुळे लागली की शॉर्टसर्किटमुळे, याचा तपास प्रशासनाकडून सुरू आहे. आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.

ड्रोनच्या मदतीने शोधले अडकलेल्या रहिवाशांना

या बचावकार्यात ठाणे अग्निशमन दल आणि टीडीआरएफच्या जवानांनी महत्त्वाची भूमिका बजावली. अत्याधुनिक ड्रोनच्या सहाय्याने इमारतीतील कोणत्या मजल्यावर रहिवासी अडकले आहेत, याचा शोध घेणे शक्य झाले. त्यामुळे बचावकार्य अधिक वेगाने राबवता आले, अशी माहिती उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माध्यमांशी बोलताना दिली.

वेळीच मदत मिळाल्याने आणि अग्निशमन दलाच्या जवानांनी केलेल्या अथक प्रयत्नांमुळे मोठी दुर्घटना टळली. रहिवाशांनीही बचावकार्यात मदत करणाऱ्या अग्निशमन दलाच्या जवानांसह उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्या सहकाऱ्यांचे आभार मानले.


 Give Feedback



 जाहिराती