धाराशिव : दिवाळीचा सण कुटुंबीयांसोबत साजरा करण्यासाठी बाहेरगावी शिक्षण घेत असलेल्या दोन्ही मुली घरी आल्या होत्या. मात्र, त्याच रात्री त्यांच्या घराला भीषण आग लागली आणि या दुर्घटनेत एकाच कुटुंबातील सहा जणांचा गुदमरून मृत्यू झाला. या घटनेत एक जण बचावला असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या दुर्दैवी घटनेमुळे संपूर्ण येडशी गावावर शोककळा पसरली आहे.
मध्यरात्री अचानक घराला आग; काही क्षणांत आगीने घेतले रौद्र रूप
धाराशिव जिल्ह्यातील येडशी गावात 8 नोव्हेंबर रोजी मध्यरात्रीच्या सुमारास ही दुर्घटना घडली. करंडे कुटुंब किराणा दुकानाच्या वरच्या मजल्यावर वास्तव्यास होते. दिवाळीचा सण असल्याने घरात दिवे आणि पणत्या लावण्यात आल्या होत्या. प्राथमिक माहितीनुसार, घरात लावलेल्या पणत्यांमुळे आग लागली असावी, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. मात्र, आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.
मध्यरात्री अचानक घरातून धूर आणि आगीच्या ज्वाळा बाहेर येऊ लागल्या. काही वेळातच आगीने संपूर्ण घराला वेढा घातला. घराच्या आतील भागात मोठ्या प्रमाणात धूर साचल्याने घरातील सदस्यांना बाहेर पडणे कठीण झाले. या धुरामुळे गुदमरून सहा जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच गावकऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत बचावकार्य सुरू केले.
दिवाळीच्या सुट्टीसाठी दोन्ही मुली आल्या होत्या घरी
या घटनेतील सर्वात हृदयद्रावक बाब म्हणजे करंडे कुटुंबातील सिद्धी आणि गायत्री या दोन्ही मुली शिक्षणासाठी बाहेरगावी राहत होत्या. गायत्री धाराशिवमध्ये, तर सिद्धी पुण्यात शिक्षण घेत होती. दिवाळीचा सण असल्याने घरातील सर्व सदस्य एकत्र यावेत, आनंदाने सण साजरा करता यावा, या अपेक्षेने दोन्ही मुली गावी आल्या होत्या.
सणाच्या निमित्ताने घरात आनंदाचे वातावरण होते. कुटुंबातील सर्व सदस्य एकत्र आले होते. मात्र, मध्यरात्री घडलेल्या या भीषण दुर्घटनेने संपूर्ण कुटुंबाचे आयुष्य क्षणात संपवले. ज्या घरात दिवाळीचा आनंद साजरा होत होता, त्याच घरातून काही तासांत सहा जणांचे मृतदेह बाहेर काढण्याची वेळ आली. या घटनेने गावकऱ्यांसह परिसरातील नागरिकही सुन्न झाले आहेत.
तीन पिढ्यांचा किराणा व्यवसाय आगीत उद्ध्वस्त
करंडे कुटुंबाचा किराणा व्यवसाय तीन पिढ्यांपासून सुरू होता. अनेक वर्षांच्या मेहनतीने आणि कष्टाने कुटुंबाने हा व्यवसाय उभा केला होता. मात्र, मध्यरात्री लागलेल्या आगीत घरासह व्यवसायाचेही मोठे नुकसान झाले. अनेक वर्षांच्या कष्टाने उभे केलेले संसाराचे विश्व आगीच्या भक्ष्यस्थानी पडले.या दुर्घटनेमुळे केवळ सहा व्यक्तींचा जीव गेला नाही, तर एका कुटुंबाचा आधार, त्यांचा संसार आणि तीन पिढ्यांनी जपलेला व्यवसायही उद्ध्वस्त झाला आहे.
ग्रामस्थांचे शर्थीचे प्रयत्न; जेसीबीने भिंती पाडून बचावकार्य
आगीची माहिती मिळताच ग्रामस्थांनी मध्यरात्रीपासून मदतीसाठी धाव घेतली. आग विझवण्यासाठी आणि घरात अडकलेल्या व्यक्तींना बाहेर काढण्यासाठी गावकऱ्यांनी शर्थीचे प्रयत्न केले. अग्निशमन दलालाही घटनास्थळी पाचारण करण्यात आले होते.मात्र, अग्निशमन दलाची गाडी वेळेवर पोहोचली नसल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. गाडीमध्ये पुरेसे पाणी आणि डिझेल उपलब्ध नसल्याने पाणी भरणे तसेच डिझेलची व्यवस्था करण्यात वेळ गेला, असा दावा ग्रामस्थांकडून करण्यात आला आहे. या विलंबामुळे बचावकार्यात अडथळे निर्माण झाल्याची भावना स्थानिक नागरिकांनी व्यक्त केली.
दरम्यान, घराच्या आत मोठ्या प्रमाणात धूर साचल्याने बचावकार्य करणे अत्यंत कठीण झाले होते. त्यामुळे ग्रामस्थांनी जेसीबीच्या साहाय्याने घराच्या भिंती पाडण्याचा निर्णय घेतला. भिंती फोडून धूर बाहेर जाण्यासाठी मार्ग तयार करण्यासह आत अडकलेल्या व्यक्तींपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करण्यात आला. गावकऱ्यांनी शक्य ते सर्व प्रयत्न केले. मात्र, दुर्दैवाने सहा जणांचा जीव वाचवण्यात यश आले नाही. एका व्यक्तीला मात्र सुरक्षित बाहेर काढण्यात यश आले असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
या भीषण दुर्घटनेत सहा जणांचा मृत्यू
या आगीत मृत्यू झालेल्यांमध्ये एकाच कुटुंबातील ज्येष्ठ नागरिकांपासून तरुण मुलींपर्यंत सहा जणांचा समावेश आहे.
- उत्तम त्रिंबक करंडे – वय 72 वर्षे
- चंद्रकला उत्तम करंडे – वय 65 वर्षे
- गोविंद उत्तम करंडे – वय 55 वर्षे
- ज्योती गोविंद करंडे – वय 45 वर्षे
- गायत्री करंडे – वय 18 वर्षे
- सिद्धी करंडे – वय 13 वर्षे
एका रात्रीत होत्याचे नव्हते; येडशी गावावर शोककळा
दिवाळीच्या सणानिमित्त आनंदाने एकत्र आलेल्या करंडे कुटुंबावर काळाने असा घाला घातला की संपूर्ण कुटुंबच उद्ध्वस्त झाले. घरातील ज्येष्ठ सदस्य, कुटुंबाचा आधार आणि शिक्षणाची स्वप्ने पाहणाऱ्या दोन लहान मुली अशा सहा जणांचा मृत्यू झाल्याने गावकऱ्यांना मोठा धक्का बसला आहे.या घटनेने दिवाळीच्या आनंदावर विरजण पडले असून येडशी गावात शोकाकुल वातावरण आहे. आगीचे नेमके कारण काय होते, बचावकार्यात झालेल्या विलंबाबाबतच्या आरोपांमध्ये किती तथ्य आहे आणि या दुर्घटनेला जबाबदार कोण, असे अनेक प्रश्न आता उपस्थित होत आहेत. संबंधित यंत्रणांकडून या घटनेची सखोल चौकशी होऊन वस्तुस्थिती समोर येणे गरजेचे आहे.दिव्यांच्या प्रकाशाने घर उजळवणाऱ्या दिवाळीत करंडे कुटुंबाचे संपूर्ण आयुष्यच काळोखात हरवले. या हृदयद्रावक घटनेने संपूर्ण जिल्ह्यात हळहळ व्यक्त केली जात आहे.