सांगली : एका बाजूला दुष्काळाच्या झळा, दुसऱ्या बाजूला डोळ्यांसमोर वाळून गेलेली पिके, शेतीसाठी केलेला लाखोंचा खर्च वाया गेल्याने डोळ्यात पाणी… अशा स्थितीतील बळीराजाच्या वंचना जाणून घेऊन त्याच्या या दुःखावर सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर यांनी आज फुंकर घातली.शेतकऱ्यांच्या दिवाळीचा आनंद हरवू नये, यासाठी मंत्री महोदयांनी आटपाडी तालुक्यातील पिंपरी खुर्द येथे थेट शेतकऱ्याच्या बांधावर जावून त्यांच्या व्यथा जाणल्या. शेतकऱ्याच्या घरी जाऊन कुटुंबीयांसमवेत भोजन केले आणि शेतकऱ्यांसोबत दिवाळी साजरी केली. संकटाच्या या काळात शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे, असा दिलासा त्यांनी यावेळी दिला. यावेळी आमदार सुहास बाबर, तहसीलदार शीतल बंडगर यांच्यासह जिल्हा परिषद, पंचायत समितीचे पदाधिकारी, अधिकारी, कर्मचारी, शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या सूचनेनुसार राज्यातील दुष्काळग्रस्त भागांमध्ये शेतकऱ्यांसोबत दिवाळी साजरी करण्याचा उपक्रम राबविण्यात येत आहे. त्यानुसार पिंपरी खुर्द गावाची निवड करण्यात आली.यावेळी आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर म्हणाले, दुष्काळग्रस्त शेतकरी आणि त्यांच्या कुटुंबीयांसोबत दिवाळी साजरी करण्यामागे केवळ सणाचा आनंद वाटणे एवढाच उद्देश नाही, तर त्यांच्या अडचणी प्रत्यक्ष समजून घेणे आणि आगामी काळातील संभाव्य दुष्काळी परिस्थितीचा सामना करण्यासाठी आवश्यक नियोजन करणे, ही शासनाची भूमिका आहे. पुढील सहा महिन्यांतील संभाव्य दुष्काळी परिस्थिती लक्षात घेऊन शासनाने उपाययोजनांचे नियोजन केले आहे. यामध्ये शेतकऱ्यांनाही सहभागी करून घेत, त्यांच्या अडचणींची तीव्रता कमी करण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना करण्यात येतील, असे त्यांनी सांगितले.
शेतकऱ्यांच्या घरी भोजन; दिवाळी शिध्याचे वाटप
भेटीदरम्यान आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या हस्ते पिंपरी खुर्द येथील ग्रामस्थांना दिवाळी शिध्याचे वाटप करण्यात आले. आरोग्यमंत्री महोदयांसमवेत आमदार सुहास बाबर यांनी नितीन रावसाहेब पाटील यांच्या घरी भेट देऊन त्यांच्या कुटुंबीयांसमवेत भोजन केले. शेतकऱ्यांच्या घरातील सदस्यांशी संवाद साधत त्यांनी दिवाळीचा आनंद वर्धित केला. तसेच हनुमान मंदिरात शेतकऱ्यांशी संवाद साधून त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या.
टेंभू योजनेच्या सहाव्या टप्प्यातील काम अंतिम टप्प्यात
नागरिकांशी संवाद साधून दिलासा देताना आमदार सुहास बाबर म्हणाले, आटपाडी तालुक्यातील दुष्काळी परिस्थिती आणि पाणीपुरवठ्याच्या प्रश्नांवर मात करण्याच्या अनुषंगाने टेंभू उपसा सिंचन योजनेच्या सहाव्या टप्प्याला २०१९ मध्ये मान्यता मिळाल्यानंतर निधी उपलब्ध झाल्याने कामाला गती मिळाली आहे. या टप्प्यातील काम अंतिम टप्प्यात असून, योजनेपासून वंचित असलेल्या गावांनाही फेब्रुवारीअखेर पाण्याचा लाभ मिळवून देण्यासाठी प्रयत्नरत असल्याचे त्यांनी सांगितले.
दुष्काळी उपाययोजना व अग्रिम मदतीचे वितर
यावेळी तहसीलदार शीतल बंडगर यांनी प्रशासनामार्फत राबविण्यात येत असलेल्या दुष्काळी उपाययोजनांची माहिती दिली. पिण्याच्या पाण्याची उपलब्धता, टँकरद्वारे पाणीपुरवठा, जनावरांसाठी चारा, चारा डेपो सुरू करण्याची कार्यवाही, पीक नुकसानीचे पंचनामे आणि शासनाच्या विविध मदतींचे वितरण याबाबत त्यांनी माहिती दिली. पीक नुकसानीचे पंचनामे पूर्ण झाले असून, पात्र शेतकऱ्यांना पाच हजार रुपयांची अग्रिम मदत मोठ्या प्रमाणात वितरित करण्यात आली आहे. ग्रामस्थांच्या अडचणी सोडविण्यासाठी संबंधित विभागांमध्ये समन्वय ठेवण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.
शेतकऱ्याने मांडली व्यथा
प्रारंभी आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी जगन्नाथ जाधव यांच्या शेतातील दुष्काळामुळे नुकसान झालेल्या केळीच्या बागेची पाहणी केली. जाधव यांनी अडीच एकर क्षेत्रात ऑगस्ट महिन्यात केळीची बाग लावली होती. या बागेसाठी आतापर्यंत सुमारे साडेपाच लाख रुपये खर्च केला होता. मात्र, गेल्या काही महिन्यांपासून पाण्याची तीव्र कमतरता निर्माण झाल्याने काढणीच्या टप्प्यावर आलेली केळीची बाग कोलमडली. केळीचे घड सुकले आणि डोळ्यांसमोर उभे केलेले उत्पन्नाचे स्वप्न उद्ध्वस्त झाले.
जाधव यांनी आपली व्यथा मांडताना शेतीसाठी केलेला लाखो रुपयांचा खर्च वाया गेल्याचे सांगितले. दुष्काळामुळे शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती अत्यंत बिकट झाली असून, त्यांना जास्तीत जास्त नुकसानभरपाई देऊन या संकटातून सावरण्यास मदत करावी, अशी मागणी त्यांनी केली.
चारा डेपोची मागणी
पिंपरी खुर्दसह परिसरातील तीन गावांमधील सुमारे १ हजार ६०० जनावरांसाठी तातडीने चारा डेपो सुरू करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली. तसेच, विद्युत वाहिनीचे रखडलेले काम पूर्ण करण्याची मागणीही करण्यात आली. त्यावर सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर म्हणाले, पाण्याबरोबरच जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी आवश्यकतेनुसार चारा डेपो सुरू करण्याच्या अनुषंगाने कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या. त्यांनी यावेळी ग्रामस्थांशी संवाद साधून त्यांच्या विविध समस्या जाणून घेतल्या.