सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • अमूल नंतर आता गोकुळच्या दूध दरातही वाढ होणार; नूतन अध्यक्षांचे संकेत, पहिल्याच बैठकीत प्रस्ताव येणार
 जिल्हा

अमूलनंतर आता गोकुळचे दूधही महागणार? दरवाढीचे नूतन अध्यक्षांचे संकेत; पहिल्याच बैठकीत प्रस्ताव

डिजिटल पुणे    13-11-2026 16:07:18

कोल्हापूर : सर्वसामान्यांच्या महागाईच्या संकटात आणखी भर पडण्याची शक्यता आहे. अमूल आणि मदर डेअरीनंतर आता गोकुळच्या दूध दरातही वाढ होण्याचे संकेत मिळत आहेत. गोकुळ दूध संघाचे नवनियुक्त अध्यक्ष राजेश पाटील यांनी दूध दरवाढीबाबत सकारात्मक संकेत दिले असून, नव्या कार्यकारिणीच्या पहिल्याच बैठकीत यासंदर्भातील प्रस्ताव मांडला जाण्याची शक्यता आहे.

शनिवारी गोकुळच्या नूतन कार्यकारिणीची पहिली बैठक पार पडणार आहे. या बैठकीत दूध विक्री दरात वाढ करण्याबाबत चर्चा होण्याची शक्यता आहे. अमूलने दूध दरात वाढ केल्यानंतर गोकुळकडूनही त्याच दिशेने पावले उचलली जात असल्याचे अध्यक्ष राजेश पाटील यांच्या वक्तव्यावरून स्पष्ट होत आहे.

दरम्यान, केवळ ग्राहकांकडून आकारण्यात येणाऱ्या विक्री दरात वाढ करून चालणार नाही, तर दूध उत्पादक शेतकऱ्यांनाही त्याचा लाभ मिळायला हवा, अशी भूमिका राजेश पाटील यांनी मांडली आहे. दूध विक्री दरात वाढ झाल्यास उत्पादकांना मिळणाऱ्या दरातही वाढ करण्यासाठी प्रयत्न केले जातील, असे त्यांनी सांगितले.

अमूल आणि मदर डेअरीचे दूध आधीच महागले

दूध उत्पादक कंपन्यांकडून दरवाढीचे सत्र सुरू झाले आहे. अमूलने १२ नोव्हेंबरपासून आपल्या विविध प्रकारच्या दुधाच्या किमतीत प्रतिलिटर २ ते ४ रुपयांची वाढ लागू केली आहे. यामध्ये अमूल ताजा टोन्ड दुधाच्या दरात २ रुपये, तर अमूल गोल्डच्या दरात ४ रुपयांची वाढ करण्यात आली आहे. मदर डेअरीनेही दुधाच्या किमतीत प्रतिलिटर २ ते ४ रुपयांची वाढ केली आहे.

दूध दरवाढीमागे नेमकी कारणे काय?

पशुखाद्य, हिरवा चारा आणि सुका चारा यांच्या किमतीत झालेली वाढ, तसेच पॅकेजिंग आणि वाहतूक खर्चात झालेली वाढ यामुळे दूध उत्पादन आणि वितरणाचा खर्च वाढत आहे. या वाढत्या खर्चाचा परिणाम दूध उत्पादक कंपन्यांच्या आर्थिक गणितावर होत असल्याने दरवाढीचा निर्णय घेतला जात असल्याचे सांगितले जात आहे.

आता अमूल आणि मदर डेअरीनंतर गोकुळही दूध महाग करण्याच्या तयारीत असल्याने कोल्हापूरसह राज्यातील ग्राहकांचे लक्ष शनिवारी होणाऱ्या बैठकीकडे लागले आहे. या बैठकीत दूध दरवाढीबाबत नेमका काय निर्णय होतो आणि ग्राहकांच्या खिशावर किती अतिरिक्त भार पडतो, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.


 Give Feedback



 जाहिराती