जालना : गुप्तधन मिळवून देण्याचे आमिष दाखवत अंधश्रद्धेच्या नावाखाली अघोरी पूजा केल्याचा धक्कादायक प्रकार जालना जिल्ह्यात उघडकीस आला आहे. मंठा तालुक्यातील पोखरी गावात शेतात सोन्याचे सात हांडे पुरले असल्याची बतावणी करून काही जणांनी रात्रीच्या वेळी पूजा मांडली होती. या प्रकरणाचीगुप्तधन मिळवून देण्याचे आमिष दाखवत अंधश्रद्धेच्या नावाखाली अघोरी पूजा केल्याचा धक्कादायक प्रकार जालना जिल्ह्यात उघडकीस आला आहे माहिती मिळताच ग्रामस्थांनी हस्तक्षेप करत पोलिसांना पाचारण केले. पोलिसांनी कारवाई करत एका मांत्रिकासह नऊ जणांना अटक केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पोखरी गावातील एका शेतात बुधवारी रात्री गुप्तधन मिळवण्याच्या उद्देशाने हा कथित अघोरी विधी सुरू होता. संबंधित शेतात सोन्याने भरलेले सात हांडे पुरलेले असल्याचा दावा आरोपींकडून करण्यात आला होता. या आमिषाला बळी पडून नऊ जणांनी रात्रीच्या अंधारात पूजेची तयारी केली होती. मात्र, हा प्रकार सुरू असल्याची कुणकुण ग्रामस्थांना लागली. त्यानंतर गावकऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत हा विधी थांबवला आणि पोलिसांना घटनेची माहिती दिली.
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी पोहोचून मांत्रिकासह नऊ जणांना ताब्यात घेतले. आरोपींकडून लिंबू, नारळ, बदाम, सुपारी यांसह पूजेसाठी वापरण्यात येणारे साहित्य जप्त करण्यात आले आहे. याशिवाय एक कार आणि काही संशयास्पद वस्तूही पोलिसांनी ताब्यात घेतल्या आहेत.
या प्रकरणी महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष, अनिष्ट व अघोरी प्रथा आणि जादूटोणा प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या संपूर्ण प्रकारामागे नेमका काय उद्देश होता, तसेच गुप्तधनाचे आमिष दाखवून आणखी कुणाची फसवणूक करण्यात आली आहे का, याचा पोलीस तपास करत आहेत.
दरम्यान, या कारवाईबाबत परतूरचे पोलीस उपअधीक्षक रोहित कमलदाणे यांनी माहिती दिली. अंधश्रद्धेच्या नावाखाली अशा प्रकारचे विधी करणाऱ्यांविरोधात पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.