रत्नागिरी : “देशाचे माजी राष्ट्रपती भारतरत्न डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांनी देशात नवे शास्त्रज्ञ निर्माण होण्याचे स्वप्न पाहिले होते. महाराष्ट्राचा विचार करता डॉ. रघुनाथ माशेलकर, डॉ. अनिल काकोडकर आणि डॉ. विजय भटकर ही तीन दिग्गज नावे समोर येतात. या तिघांसारखा किमान एक तरी जागतिक कीर्तीचा शास्त्रज्ञ आपल्या रत्नागिरीच्या मातीतून घडावा, हीच आमची मनापासूनची इच्छा आणि संकल्प आहे,”
अशा प्रेरणादायी शब्दांत राज्याचे उद्योगमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांनी ‘नासा’ (NASA) अभ्यास दौऱ्यासाठी रवाना होणाऱ्या जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांचे कौतुक करत त्यांना उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या.
रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या माध्यमातून ‘नासा’ अभ्यास दौऱ्यासाठी निवड झालेल्या २० गुणी विद्यार्थ्यांशी पालकमंत्री डॉ. सामंत यांनी आज ऑनलाइन संवाद साधला. ग्रामीण भागातील जिल्हा परिषद शाळांमधील विद्यार्थ्यांना थेट अमेरिकेतील ‘नासा’सारख्या जागतिक दर्जाच्या अंतराळ संशोधन संस्थेत जाण्याची संधी मिळणे, ही अत्यंत अभिमानास्पद बाब असल्याचे त्यांनी यावेळी नमूद केले.
संपूर्ण महाराष्ट्रात पोहोचला ‘रत्नागिरी पॅटर्न’
गेल्या चार वर्षांपासून रत्नागिरी जिल्हा परिषदेचा हा नावीन्यपूर्ण उपक्रम अत्यंत यशस्वीपणे राबवला जात आहे. विद्यार्थ्यांमध्ये लहान वयातच वैज्ञानिक दृष्टिकोन आणि संशोधनाची आवड निर्माण करण्याचा हा ‘रत्नागिरी पॅटर्न’ आता संपूर्ण महाराष्ट्रात राबवला जात असल्याचा सार्थ अभिमान डॉ. सामंत यांनी व्यक्त केला. परदेश दौऱ्यावर जाणाऱ्या सर्व बालवैज्ञानिकांना आणि त्यांच्या मार्गदर्शक शिक्षकांना सुरक्षित, आनंददायी आणि ज्ञानवर्धक प्रवासासाठी त्यांनी मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.
यावेळी जिल्हाधिकारी कार्यालयातून पार पडलेल्या या संवादावेळी जिल्हाधिकारी मनुज जिंदल, प्रभारी निवासी उपजिल्हाधिकारी राहुल गायकवाड, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. भास्कर जगताप, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्ध आठल्ये, समाजकल्याण सभापती सुयोग कांबळे, जि.प.सदस्य बाबू म्हाप आदी उपस्थित होते. तर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वैदेही रानडे या निवड झालेल्या विद्यार्थ्यांसह दूरदृश्यप्रणालीद्वारे (VC) या कार्यक्रमात सहभागी झाल्या होत्या.
रत्नागिरीतील भावी पिढीने विज्ञानाच्या क्षेत्रात अशीच उत्तुंग भरारी घ्यावी आणि जागतिक पटलावर जिल्ह्याचे नाव उज्ज्वल करावे, असा विश्वास व्यक्त करत पालकमंत्र्यांनी विद्यार्थ्यांचा उत्साह द्विगुणित केला