सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • अमेरिकेत विमान वाहतूक सेवा कोलमडली! सर्व विमान उड्डाणे अचानक रद्द,प्रशासनाकडून देशव्यापी ग्राउंड स्टॉपचा आदेश,हजारो प्रवासी अडकले
  • सिंहगड संस्था गैरकारभार प्रकरण; मारुती नवले यांच्यासह विश्वस्तांना पुणे सोडण्यास मनाई, सीबीआय, ईडी चौकशीचे आदेश, न्यायलयाने ओढले ताशेरे
  • पुण्यातील प्रसिद्ध वैशाली आणि रुपाली हॉटेलवर FDA ची मोठी कारवाई; अन्नसुरक्षा नियमांचे उल्लंघन केल्याने परवाने निलंबित
  • वसई-विरार रेल्वे मार्गावर मृत्यूचे सत्र! अवघ्या 24 तासांत पाच जणांचा मृत्यू; प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर
  • मोठी बातमी : ना सत्तेत जाणार, ना विलिनीकरण होणार, सुप्रिया सुळेंचा शब्द, म्हणाल्या, दादा होता तोपर्यंतच चर्चा, आता फुल्ल स्टॉप!
 शहर

पुण्यातील प्रसिद्ध वैशाली आणि रुपाली हॉटेलवर FDA ची मोठी कारवाई; अन्नसुरक्षा नियमांचे उल्लंघन केल्याने परवाने निलंबित

अजिंक्य स्वामी    14-11-2026 11:15:12

स्वच्छतेच्या गंभीर त्रुटी उघड; शौचालयांजवळ अन्नपदार्थ तयार करण्याची व्यवस्था, खाद्यपदार्थांच्या साठवणुकीतही निष्काळजीपणा

पुणे  : पुणेकरांच्या खाद्यसंस्कृतीचा अविभाज्य भाग मानल्या जाणाऱ्या फर्ग्युसन रस्त्यावरील प्रसिद्ध हॉटेल वैशाली आणि रुपाली रेस्टॉरंटवर अन्न व औषध प्रशासनाने (FDA) मोठी कारवाई केली आहे. अन्नपदार्थांची स्वच्छता, साठवणूक आणि अन्नसुरक्षेच्या नियमांचे गंभीर उल्लंघन झाल्याचे तपासणीत आढळल्यानंतर दोन्ही आस्थापनांचे अन्न व्यवसाय परवाने तातडीने निलंबित करण्यात आले आहेत. १३ नोव्हेंबर रोजी करण्यात आलेल्या तपासणीनंतर ही कारवाई करण्यात आली.

राज्यभर सुरू असलेल्या ‘सेफ फूड, सेफ महाराष्ट्र’ मोहिमेअंतर्गत FDA च्या पथकाने ही तपासणी केली. या कारवाईमुळे पुण्याच्या खाद्यविश्वात मोठी चर्चा सुरू झाली असून, शहरातील नामांकित हॉटेलमधील स्वच्छतेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

वैशाली हॉटेलमध्ये स्वच्छतेच्या नियमांना हरताळ

FDA च्या तपासणीत वैशाली हॉटेलमध्ये अनेक गंभीर त्रुटी आढळून आल्या. विशेष म्हणजे, स्वयंपाकघरातील अपुऱ्या जागेमुळे कच्चा माल साठवण्यासाठी वापरण्यात येणारा फ्रीजर महिलांच्या स्वच्छतागृहाच्या अगदी जवळ ठेवण्यात आला होता. डोसा आणि उत्तप्पा तयार करण्यासाठी वापरला जाणारा तवा पुरुषांच्या स्वच्छतागृहाशेजारी असल्याचेही अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आले.

धुतलेली भांडी स्वच्छतागृहाबाहेरील टेबलावर ठेवण्यात आली होती. उकडलेले बटाटे, शिजवलेला भात आणि इतर तयार खाद्यपदार्थ उघड्या कॉरिडॉरमध्ये झाकणाशिवाय ठेवलेले आढळले. इडली आणि डोशाचे पीठ तयार करण्यासाठी वापरण्यात येणारी जागाही अन्नसुरक्षेच्या दृष्टीने योग्य नसल्याचे तपासणीत स्पष्ट झाले.

याशिवाय कच्च्या भाज्या आणि तयार खाण्यायोग्य पदार्थ यांची योग्य प्रकारे विभागणी केली जात नसल्याचे आढळले. किचनमध्ये कीटकांचा प्रवेश रोखण्यासाठी आवश्यक असलेली व्यवस्था नव्हती. खाद्यपदार्थांच्या तापमानाची नोंद, पिण्याच्या पाण्याच्या तपासणीचा अद्ययावत अहवाल आणि आवश्यक अन्नसुरक्षा प्रशिक्षणाची व्यवस्थाही अपुरी असल्याचे समोर आले.

या तपासणीत वैशाली हॉटेलला ९८ पैकी केवळ ५८ गुण मिळाले. त्यामुळे आस्थापनाचे वर्गीकरण ‘नियमांचे पालन न करणारे’ असे करण्यात आले. विशेष म्हणजे, जून २०२६ मध्येही तपासणीनंतर हॉटेलला सुधारणा करण्याची नोटीस देण्यात आली होती. मात्र, त्यानंतरही काही गंभीर त्रुटी कायम असल्याचे नव्या तपासणीत दिसून आले.

रुपाली रेस्टॉरंटमध्येही अन्नसाठवणुकीत त्रुटी

फर्ग्युसन रस्त्यावरील रुपाली रेस्टॉरंटमध्येही FDA च्या पथकाला अन्नसुरक्षेच्या नियमांचे उल्लंघन आढळले. कच्चा माल, अर्धवट प्रक्रिया केलेले खाद्यपदार्थ आणि तयार पदार्थ योग्य झाकणांमध्ये ठेवले जात नव्हते. खाद्यपदार्थांच्या डब्यांवर आवश्यक लेबलिंग आणि वापरण्याची अंतिम तारीख नमूद नसल्याचेही तपासणीत आढळले.

कच्चे आणि शिजवलेले पदार्थ स्वतंत्रपणे साठवण्याच्या नियमांचे पालन होत नव्हते. अन्नपदार्थांच्या तापमान नियंत्रणाच्या नोंदी उपलब्ध नव्हत्या. तसेच अन्नसुरक्षा व्यवस्थापन आराखडा (FSMS), प्रमाणित कार्यपद्धती (SOP) आणि कर्मचाऱ्यांच्या प्रशिक्षणासंबंधी आवश्यक नोंदीही उपलब्ध नसल्याचे अधिकाऱ्यांनी नमूद केले.

सुधारणा केल्यानंतरच पुन्हा व्यवसाय सुरू करण्याची परवानगी

दोन्ही हॉटेलचे अन्न व्यवसाय परवाने निलंबित करण्यात आले असून, परवानगी मिळेपर्यंत खाद्यपदार्थांची विक्री, पार्सल सेवा आणि घरपोच वितरण करता येणार नाही. संबंधित आस्थापनांनी सर्व त्रुटी दूर केल्यानंतर FDA कडून पुन्हा तपासणी केली जाणार आहे. नियमांचे समाधानकारक पालन झाल्याची खात्री करून प्रशासनाची लेखी परवानगी मिळाल्यानंतरच खाद्य व्यवसाय पुन्हा सुरू करता येणार आहे.

नामांकित हॉटेल्सनाही नियमांचे पालन बंधनकारक

पुण्यातील वैशाली आणि रुपाली ही केवळ हॉटेल्स नसून शहराच्या खाद्यसंस्कृतीतील लोकप्रिय ठिकाणे म्हणून ओळखली जातात. त्यामुळे या दोन्ही आस्थापनांवर झालेल्या कारवाईने ग्राहकांच्या अन्नसुरक्षेचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे.

हॉटेलची लोकप्रियता, ग्राहकांची गर्दी किंवा ब्रँडची प्रतिष्ठा यापेक्षा अन्नाची गुणवत्ता, स्वच्छता आणि सुरक्षितता अधिक महत्त्वाची असल्याचे या कारवाईतून अधोरेखित झाले आहे.

 

 


 News Feedback

Digital Pune
Harakchand Jain
 14-11-2026 13:59:19

सूधरणा केल्यावर पून्हा व्यवसायास परवानगी जागा कशी मोठी करणार आखूड जागेतच व्यवसाय करणार म्हणजे भ्रष्टाचारास प्रचंड वाव चौका चौकात खाउ गल्या कूठला ही परवाना नसताना राजरोस धंधा करत आहे नागरिकाच्या आरोग्याशी खेलत आहै त्याचे काय?

 Give Feedback



 जाहिराती