नवी मुंबई : प्रेमप्रकरणातून नवी मुंबईतील उलवे परिसरात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. प्रियकरासोबत लॉजवर भेटायला गेलेल्या २३ वर्षीय तरुणीची गळा आवळून हत्या करण्यात आली. त्यानंतर संबंधित तरुणाने त्याच खोलीत गळफास घेऊन आत्महत्या केली. उलवे सेक्टर ९ मधील एका लॉजमध्ये ११ नोव्हेंबरच्या रात्री हा प्रकार घडला.
मृत तरुणीचे नाव अक्षिता सत्यवीर चौधरी (वय २३), तर तरुणाचे नाव भारत पंकज भारद्वाज ऊर्फ गौरव (वय २४) असे आहे. दोघेही ११ नोव्हेंबर रोजी उलवे येथील हॅपी रेसिडेन्सी लॉजमध्ये आले होते. लॉजमधील खोली क्रमांक ३०१ मध्ये रात्रीच्या सुमारास ही घटना घडल्याचे समोर आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अक्षिता कॅनडामधील एका रुग्णालयात नोकरी करत होती. दिवाळी सणानिमित्त ती आपल्या आई-वडिलांना भेटण्यासाठी भारतात आली होती. गुरुवारी ती पुन्हा कॅनडाला जाणार होती. दरम्यान, तिला भेटण्यासाठी भारत हा उत्तर प्रदेशातून उलवे येथे आला होता. तो अक्षिताच्या घराजवळील एका लॉजमध्ये वास्तव्यास होता.
अक्षिता प्रियकराला भेटण्यासाठी लॉजवर गेली होती. मात्र, बराच वेळ होऊनही ती घरी परतली नाही. कुटुंबीयांनी तिच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, परंतु तिचा फोन लागत नसल्याने आई-वडिलांनी पोलिसांकडे धाव घेतली. त्यानंतर पोलिसांनी तिच्या मोबाईल लोकेशनच्या आधारे शोध सुरू केला.
तपासादरम्यान अक्षिता एका तरुणासोबत लॉजमध्ये गेल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी लॉजमध्ये जाऊन संबंधित खोलीची पाहणी केली. खोलीतून कोणताही प्रतिसाद मिळत नसल्याने दरवाजा उघडण्यात आला. त्यावेळी अक्षिता खोलीत मृतावस्थेत आढळली, तर भारतने गळफास घेतल्याचे निदर्शनास आले.
प्राथमिक तपासात प्रेमसंबंधातून हा प्रकार घडल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. मात्र, अक्षिता हिच्या हत्येमागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.
