छत्रपती संभाजीनगर : दुष्काळी परिस्थितीत नागरिकांना दिलासा देण्यासाठी शासन त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे. दुष्काळाच्या काळात एकाही गरजू कुटुंबाला मदतीपासून वंचित ठेवणार नाही. संभाव्य पाणीटंचाई आणि चाराटंचाईचा सामना करण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्यात येतील, अशी ग्वाही सामाजिक न्यायमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री संजय शिरसाट यांनी आज फुलंब्री येथे दिली.
फुलंब्री नगरपंचायत कार्यालयात आयोजित कार्यक्रमात पालकमंत्री शिरसाट यांच्या हस्ते शहर व तालुक्यातील गरजू कुटुंबे, विधवा महिला तसेच दिव्यांग नागरिकांना दिवाळी शिधासंचांचे वाटप करण्यात आले.
यावेळी नगराध्यक्ष राजेंद्र ठोंबरे, उपनगराध्यक्ष जमीर पठाण, जि. प. सदस्य राधाकिसन पठाडे, मुख्याधिकारी ज्ञानेश्वर ठोंबरे, तहसीलदार योगिता खटावकर, माजी महापौर त्रिंबक तुपे, नंदकुमार घोडले, अश्फाक पटेल, अजगर पटेल, रमेश पवार, चंद्रकांत जाधव यांच्यासह स्थानिक लोकप्रतिनिधी, पदाधिकारी, नगरसेवक, महिला व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पालकमंत्री शिरसाट म्हणाले की, यंदा दुष्काळामुळे सर्वसामान्य नागरिकांसह शेतकरी आणि शेतमजुरांसमोर अनेक अडचणी निर्माण झाल्या आहेत. सध्या पिण्याचे पाणी आणि जनावरांसाठी चारा उपलब्ध असला तरी आगामी फेब्रुवारी व मार्च महिन्यांत टंचाईची तीव्रता वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे संभाव्य परिस्थितीचा विचार करून आतापासूनच नियोजन करणे आवश्यक आहे. नागरिकांना आवश्यक ती मदत उपलब्ध करून देण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे.
दुष्काळग्रस्त कुटुंबांना दिवाळीच्या काळात दिलासा मिळावा, यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पुढाकारातून राज्यभरात पाच लाख दिवाळी शिधा संच उपलब्ध करून देण्यात आले आहेत. गरजू नागरिकांना मदतीचा हात देण्याचा हा उपक्रम असून आगामी काळातही आवश्यकतेनुसार मदतकार्य सुरू राहील, असे त्यांनी सांगितले.
नदीतील गाळ काढण्यासाठी ५० लाखांची मदत
फुलंब्री शहरातील नदीपात्रातील गाळ काढण्याच्या कामासाठी तातडीची मदत म्हणून ५० लाख रुपये उपलब्ध करून देण्यात येतील, अशी घोषणा पालकमंत्री शिरसाट यांनी यावेळी केली. तसेच २५ नोव्हेंबरपासून गाळ काढण्याचे काम सुरू करण्याचे निर्देश त्यांनी नगरपंचायतीच्या मुख्याधिकाऱ्यांना दिले.
नगराध्यक्ष राजेंद्र ठोंबरे यांनी नदीपात्रातील गाळ काढण्यासाठी दोन कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्याची मागणी केली. तसेच स्थानिक विकास निधीतून आवश्यक यंत्रसामग्री उपलब्ध करून देण्याची विनंती केली. नदीतील गाळ शेतकऱ्यांना विनामूल्य उपलब्ध करून देण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.
चंद्रकांत जाधव यांनी प्रास्ताविक केले. नगराध्यक्ष राजेंद्र ठोंबरे आणि रमेश पवार यांनी मनोगत व्यक्त केले. अभिजित घोडके यांनी सूत्रसंचालन व आभार मानले.