पुणे : पुण्यातील प्रसिद्ध आणि खवय्यांच्या पसंतीच्या हॉटेल्समध्ये अन्नपदार्थांच्या स्वच्छतेबाबत गंभीर त्रुटी आढळल्याने अन्न व औषध प्रशासनाने (FDA) मोठी कारवाई केली आहे. शिवाजीनगरमधील फर्ग्युसन कॉलेज रोडवरील नामांकित वैशाली हॉटेल आणि रूपाली रेस्टॉरंट या दोन्ही आस्थापनांचे अन्न व्यवसाय परवाने तात्काळ प्रभावाने निलंबित करण्यात आले आहेत. तपासणीदरम्यान स्वयंपाकघरातील अस्वच्छता, अन्नपदार्थांची अयोग्य साठवणूक आणि अन्न सुरक्षा नियमांचे उल्लंघन झाल्याचे समोर आले आहे.
वैशाली हॉटेलमधील धक्कादायक प्रकार उघड
अन्न सुरक्षा अधिकारी अजिंक्य सुभाष उमाप यांनी १३ नोव्हेंबर २०२६ रोजी वैशाली हॉटेलची तपासणी केली. यावेळी स्वयंपाकघरात जागेची कमतरता आणि अस्वच्छतेमुळे अन्नपदार्थांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाल्याचे आढळले. विशेष म्हणजे, कच्चा माल साठवण्यासाठी वापरण्यात येणारे फ्रीजर महिलांच्या स्वच्छतागृहाच्या अगदी जवळ ठेवण्यात आले होते. तर डोसा आणि उत्तप्पा तयार करण्याचा तवा पुरुषांच्या स्वच्छतागृहाशेजारी ठेवण्यात आल्याचे निदर्शनास आले. धुतलेली भांडीदेखील स्वच्छतागृहासमोरील टेबलावर ठेवण्यात आली होती.
इतकेच नव्हे तर उकडलेले बटाटे, शिजवलेला भात आणि इतर तयार अन्नपदार्थ उघड्या कॉरिडॉरमध्ये ठेवण्यात आले होते. इडली आणि डोशाचे पीठ तयार करण्याची प्रक्रियाही असुरक्षित जागेत सुरू असल्याचे अधिकाऱ्यांना दिसून आले. कापलेल्या कच्च्या भाज्या तयार अन्नपदार्थांच्या वर ठेवल्याचेही तपासणीत उघड झाले.
स्वयंपाकघरात कीटकांना प्रतिबंध करणारे दरवाजे नसणे, तापमानाच्या नोंदी उपलब्ध नसणे, पिण्याच्या पाण्याचा अद्ययावत तपासणी अहवाल नसणे आणि FoSTaC प्रशिक्षित पर्यवेक्षकाची अनुपस्थिती अशा अनेक त्रुटी आढळल्या.
९८ पैकी केवळ ५८ गुण; सुधारणा न झाल्याने कारवाई
तपासणीदरम्यान वैशाली हॉटेलला ९८ पैकी अवघे ५८ गुण मिळाले. त्यामुळे अन्न सुरक्षा मानकांच्या दृष्टीने हॉटेलचा निकाल 'Non-Compliance' असा नोंदवण्यात आला. यापूर्वी जून २०२६ मध्येही तपासणी करून सुधारणा करण्याची नोटीस देण्यात आली होती. मात्र, त्यानंतरही गंभीर त्रुटी कायम असल्याचे आढळल्याने सहायक आयुक्त (अन्न) सय्यद इम्रान हाश्मी यांनी परवाना निलंबित करण्याचे आदेश दिले.
रूपाली रेस्टॉरंटमध्येही स्वच्छतेचा अभाव
दुसरीकडे, रूपाली रेस्टॉरंटच्या तपासणीतही अन्न सुरक्षेच्या नियमांचे उल्लंघन झाल्याचे समोर आले. अन्न सुरक्षा अधिकारी ए. डी. झांजुर्णे यांनी १३ नोव्हेंबर रोजी तपासणी केली. यावेळी स्वयंपाकघर उघडे आणि असुरक्षित असल्याने धूळ, घाण तसेच कीटकांचा अन्नपदार्थांपर्यंत प्रवेश होण्याची शक्यता होती.
रेस्टॉरंटच्या परिसरात पाणी साचलेले, साफसफाई अपुरी आणि कचऱ्याचे व्यवस्थापन अयोग्य असल्याचे दिसून आले. कच्चा माल, अर्धप्रक्रियायुक्त आणि तयार अन्नपदार्थ व्यवस्थित झाकून ठेवलेले नव्हते. तसेच त्यावर आवश्यक लेबलिंग आणि 'Use By' तारीखही नमूद नव्हती.
कच्चे आणि शिजवलेले अन्नपदार्थ वेगवेगळे न ठेवणे, तापमान नियंत्रणाच्या नोंदींचा अभाव, अन्न सुरक्षा व्यवस्थापन आराखडा (FSMS), SOPs आणि FoSTaC प्रशिक्षणाच्या नोंदी उपलब्ध नसणे, अशा त्रुटीही तपासणीत समोर आल्या. त्यानंतर सुनावणी घेऊन रेस्टॉरंटचा परवाना निलंबित करण्याचे आदेश देण्यात आले.
परवाना पुन्हा मिळेपर्यंत व्यवसाय बंद ठेवण्याचे आदेश
सहआयुक्त श्रीकांत आर. करकळे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. प्रशासनाच्या आदेशानुसार, दोन्ही हॉटेल्सना आढळलेल्या सर्व गंभीर त्रुटी दूर करून पुन्हा तपासणीत अन्न सुरक्षा मानकांची पूर्तता करावी लागणार आहे. तसेच विभागाकडून लेखी परवानगी मिळाल्याशिवाय अन्नपदार्थांची विक्री, पार्सल किंवा होम डिलिव्हरी यापैकी कोणताही व्यवसाय करता येणार नाही.
पुण्यातील खवय्यांमध्ये लोकप्रिय असलेल्या या दोन नामांकित हॉटेल्सवर झालेल्या कारवाईमुळे शहरातील हॉटेल व्यवसायात खळबळ उडाली असून, ग्राहकांच्या आरोग्याच्या दृष्टीने अन्नपदार्थांची स्वच्छता आणि सुरक्षितता किती महत्त्वाची आहे, हा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.
