पुणे : कर्करोग हा केवळ एका व्यक्तीला होणारा आजार नसून त्याचे परिणाम संपूर्ण कुटुंबाला भोगावे लागतात. या आजारामुळे रुग्णांना शारीरिक वेदनांसोबतच मानसिक आणि आर्थिक संकटांचाही सामना करावा लागतो. अशा कठीण परिस्थितीत रुग्णांच्या भावना समजून घेत त्यांना निशुल्क उपचारांसोबतच मानसिक आधार, आत्मविश्वास आणि नव्याने जगण्याची उमेद देण्याचे महत्त्वपूर्ण कार्य केअर इंडिया मेडिकल सोसायटीचे विश्रांती हॉस्पिटल करीत आहे. त्यामुळे विश्रांती हॉस्पिटल हे केवळ उपचारांचे केंद्र नसून कर्करोग रुग्णांसाठी आशेचा किरण ठरत आहे, असे गौरवोद्गार सशस्त्र सेना वैद्यकीय महाविद्यालय, पुणेचे संचालक व कमांडंट सर्जन व्हाइस अॅडमिरल मनीष होनवाड (विशिष्ट सेवा पदक) यांनी काढले.
केअर इंडिया मेडिकल सोसायटी (विश्रांती हॉस्पिटल) यांच्या वतीने कर्करोगग्रस्त रुग्ण आणि त्यांच्या कुटुंबीयांसाठी ‘दिवाळी विथ अ पर्पज’ या विशेष उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते.
यावेळी पुणेचे कमांडंट मेजर जनरल सनिल मोहन, निवृत्त लेफ्टनंट जनरल एम. ए. टूटकणे, निवृत्त कर्नल एन. एस. न्यायापती आणि डॉ वत्सला स्वामी उपस्थित होते.
अॅडमिरल मनीष होनवाड म्हणाले, की कर्करोगाच्या उपचारांदरम्यान रुग्णाला धीर देणारे डॉक्टर आणि कुटुंबीय हे त्याच्या संघर्षातील महत्त्वाचे साथीदार असतात. औषधोपचारांइतकाच मानसिक आधारही महत्त्वाचा असतो. डॉक्टर आणि कुटुंबीयांच्या सहकार्यामुळेच रुग्णाला या कठीण प्रवासात खंबीरपणे उभे राहण्याची आणि पुन्हा आत्मविश्वासाने आयुष्य जगण्याची ताकद मिळते.
निवृत्त लेफ्टनंट जनरल एम. ए. टूटकणे म्हणाले, की कर्करोगग्रस्त रुग्णांना आर्थिक मदतीसोबतच मानसिक आणि शारीरिक आधार देण्यासाठी विश्रांती हॉस्पिटल सातत्याने पुढाकार घेत आहे. रुग्णांसाठी हे हॉस्पिटल केवळ उपचारांचे ठिकाण राहिले नसून एका माहेरघराप्रमाणे बनले आहे.
कमांड हॉस्पिटलचे कमांडंट मेजर जनरल सनिल मोहन यांनी सांगितले, की कर्करोगग्रस्त रुग्णांच्या वेदना आणि भावना समजून घेऊन त्यांना पुन्हा आत्मविश्वासाने उभे करण्याचे काम विश्रांती हॉस्पिटल करीत आहे. एका रुग्णाला आधार देताना त्याच्या संपूर्ण कुटुंबालाही मानसिक बळ देण्याचे काम या माध्यमातून होत आहे. अशा संवेदनशील आणि सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या आरोग्य संस्थांची आज समाजाला नितांत गरज आहे.
या कार्यक्रमात कर्करोगाशी धैर्याने लढा देत असलेल्या ग्लेंडा रॉजर, जस्मिन शेख, लता कांबळे, जुलेखा खान, शारदा जाधव, राजेश सहजवाला, ज्योती ठाकूर, शीतल बक्शी आणि संतोष दीक्षित यांच्यासह रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांनी आपले अनुभव कथन केले. विश्रांती हॉस्पिटलमध्ये उपचार घेताना मिळालेला आधार, डॉक्टरांचे सहकार्य आणि या प्रवासात अनुभवलेली माणुसकी याविषयी त्यांनी भावना व्यक्त केल्या.
कर्करोगाविरुद्धच्या लढाईत केवळ उपचार नव्हे, तर माणुसकी, सहवेदना आणि मानसिक आधारही तितकेच महत्त्वाचे आहेत, हा संदेश ‘दिवाळी विथ अ पर्पज’ या उपक्रमातून देण्यात आला.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तस्नीम शेख आणि आयेशा शेख यांनी केले.
