गोंदिया : दिवाळीच्या सुट्टीसाठी माहेरी आलेल्या पुण्यातील एका 35 वर्षीय एअर होस्टेसची धारदार शस्त्राने वार करून हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. गोंदिया जिल्ह्यातील वैनगंगा नदीकाठावरील अर्जुनी-बोंडराणी परिसरातील जंगलात या महिलेचा मृतदेह आढळून आला. या घटनेमुळे गोंदिया जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे.
मृत महिलेचे नाव वर्षा पुरनलाल तुरकर (वय 35) असून त्या मध्य प्रदेशातील बालाघाट जिल्ह्यातील वारासिवनी तालुक्यातील किन्ही-नवेगाव येथील रहिवासी होत्या. त्या पुण्यातील धानोरी परिसरात वास्तव्यास होत्या. एका खासगी विमान कंपनीत त्या कार्यरत असल्याची माहिती समोर आली आहे.
नेमकी घटना काय?
मिळालेल्या माहितीनुसार, वर्षा या दिवाळीनिमित्त आपल्या तीन वर्षांच्या मुलीसह माहेरी आल्या होत्या. 14 नोव्हेंबर रोजी सायंकाळी सुमारे 4 वाजण्याच्या सुमारास त्यांनी मुलीला आई-वडिलांकडे ठेवले आणि नितेश नरेश अग्रवाल (वय 41, रा. गोंदिया) याच्यासोबत कारने तिरोड्याच्या दिशेने प्रवास सुरू केला.
प्रवासादरम्यान दोघे अर्जुनी-बोंडराणी येथील वैनगंगा नदीकाठावरील श्रीराम मंदिर परिसरातील जंगलात थांबले. सायंकाळी साडेपाच ते सहा वाजण्याच्या सुमारास तेथे तीन अनोळखी व्यक्ती आल्याचा दावा नितेश अग्रवाल याने केला आहे.
या तिघांनी चाकूचा धाक दाखवून लुटमार केली आणि त्यानंतर वर्षा यांच्या पोटावर धारदार चाकूने वार करून घटनास्थळावरून पळ काढल्याचे त्याने पोलिसांना सांगितले.
रुग्णालयात नेण्यापूर्वीच मृत्यू?
घटनेची माहिती मिळताच वर्षा यांचे नातेवाईक मध्य प्रदेशातील खैरलांजी येथून घटनास्थळी दाखल झाले. गंभीर जखमी अवस्थेत त्यांना तातडीने रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर त्यांना मृत घोषित केले. प्राथमिक अंदाजानुसार, त्यांचा मृत्यू घटनास्थळीच झाला असावा.
पोलिसांकडून तपास सुरू
घटनेची माहिती मिळताच दवनीवाडा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. याप्रकरणी पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला असून आरोपींचा शोध सुरू केला आहे. आरोपींचा माग काढण्यासाठी विशेष तपास पथकही नियुक्त करण्यात आले आहे.
गोंदियाचे पोलीस अधीक्षक गोरख भामरे यांनी या प्रकरणाचा तपास सुरू असल्याची माहिती दिली. दरम्यान, एका तरुण महिलेची अशा प्रकारे हत्या झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
