पुणे : दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अर्धाकृती पुतळ्याचे अनावरण केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या हस्ते पुण्यात करण्यात आले. यावेळी आयोजित कार्यक्रमात राज्यातील प्रमुख नेत्यांनी अजित पवार यांच्या आठवणींना उजाळा दिला. मात्र, अमित शाह यांनी आपल्या भाषणातून सांगितलेल्या आठवणींमुळे उपस्थितांचे मन हेलावले. अजित पवार यांच्या स्पष्टवक्तेपणाचा विशेष उल्लेख करताना शाह यांनी त्यांचा एक आवडता गुणही सांगितला. या आठवणी ऐकताना उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या डोळ्यांत अश्रू तरळले आणि व्यासपीठावरील वातावरण भावूक झाले.
पुणे जिल्हा परिषदेच्या प्रवेशद्वाराजवळ अजित पवार यांच्या अर्धाकृती पुतळ्याचे अनावरण करण्यात आले. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, कृषिमंत्री दत्ता भरणे, केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, राज्यमंत्री माधुरी मिसाळ, महापौर मंजुषा नागपुरे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनीही कार्यक्रमाला हजेरी लावली.
'होय तर होय, नाही तर नाही'; अजितदादांचा हा गुण आवडायचा
अमित शाह यांनी आपल्या भाषणात अजित पवार यांच्या स्पष्टवक्तेपणाचे कौतुक केले. अजितदादा जे मनाला पटायचे ते स्पष्टपणे मान्य करायचे आणि जे पटत नसेल त्याला थेट नकार द्यायचे. महायुतीमधील जागावाटपाच्या चर्चेदरम्यानही ते आपली भूमिका ठामपणे मांडत असत. होकार असेल तर होकार आणि नकार असेल तर नकार, अशी त्यांची कार्यपद्धती होती. त्यांचा हा स्पष्ट आणि परखड स्वभाव आपल्याला विशेष आवडायचा, असे अमित शाह यांनी सांगितले.
कार्यकर्त्यांसाठी नेत्यांशीही घ्यायचे पंगा
महायुतीमध्ये सहभागी झाल्यानंतर अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांसह तळागाळातील कार्यकर्त्यांच्या प्रश्नांसाठी सातत्याने भूमिका मांडली. कार्यकर्त्यांना न्याय मिळावा, त्यांच्या अडचणी दूर व्हाव्यात यासाठी त्यांनी अनेकदा आपल्यासह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशीही चर्चा करत ठामपणे बाजू मांडली. स्वतःच्या पक्षातील छोट्या कार्यकर्त्यांसाठी आणि नेत्यांसाठी संघर्ष करणारे नेतृत्व क्वचितच पाहायला मिळते. अजितदादांनी नेहमीच आपल्या कार्यकर्त्यांना प्राधान्य दिले, अशा शब्दांत शाह यांनी त्यांच्या नेतृत्वशैलीचे वर्णन केले.
सकाळी सात वाजताही कामासाठी फोन करायचे
अजित पवार यांच्यासोबतच्या वैयक्तिक आठवणी सांगताना अमित शाह भावूक झाले. अजितदादांचे व्यक्तिमत्त्व सकारात्मक होते. त्यांचा स्पष्टवक्तेपणा आणि कामाचा वेग वेगळाच होता. त्यांच्या निधनामुळे महाराष्ट्राचे मोठे नुकसान झाले असून, एक मित्र आणि सहकारी गमावल्याने आपलेही वैयक्तिक नुकसान झाल्याची भावना शाह यांनी व्यक्त केली.
कोरोना महामारीच्या काळातील एक प्रसंग सांगताना शाह म्हणाले की, त्या कठीण काळात महाराष्ट्रातील कामांसंदर्भात अजित पवार यांच्याशी सातत्याने संपर्क होत असे. अनेकदा सकाळी सात वाजताच लँडलाईनवरून त्यांच्याशी संवाद व्हायचा. एवढ्या पहाटेही अजितदादा कामासाठी सज्ज असायचे. सहकार विभागाशी संबंधित साखर कारखानदारांच्या प्रश्नांवरही त्यांनी सातत्याने पाठपुरावा केला होता, अशी आठवण शाह यांनी सांगितली.
अजितदादांच्या आठवणींनी कार्यक्रमस्थळी भावूक वातावरण
अजित पवार यांचा कामाचा झपाटा, ग्रामीण महाराष्ट्राशी असलेली नाळ, सहकार क्षेत्रातील अभ्यास आणि विकासकामांबाबतची तळमळ यांचा उल्लेख उपस्थित नेत्यांनी आपल्या भाषणात केला. अमित शाह यांनी सांगितलेल्या वैयक्तिक आठवणींमुळे कार्यक्रमातील वातावरण अधिकच भावूक झाले. अजित पवार यांच्या आठवणींना उजाळा देताना सुनेत्रा पवार यांच्या डोळ्यांत अश्रू तरळले. अजितदादांच्या कार्याचा आणि त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा ठसा राज्याच्या राजकारणात कायम राहील, अशा भावना या कार्यक्रमातून व्यक्त झाल्या.
