सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • MS धोनीची IPL मधून निवृत्ती? चेन्नई सुपर किंग्जने सोपवली नवी जबाबदारी; 2027 पासून मेंटॉरच्या भूमिकेत दिसणार!
  • अजितदादांच्या विमान अपघाताला रोहित पवारांच्या साखर कारखान्याचा धूर कारणीभूत? भाजपच्या नवनाथ बन यांचा गंभीर आरोप
  • अमित शाह यांचा चकाट्या पिटणारा गृहमंत्री असा उल्लेख, मणिपूर, अरुणाचल प्रदेशला जाण्याचं चॅलेंज, उद्धव ठाकरेंचा शाहांवर हल्लाबोल
  • आपण सर्वजण एकाच पिढीतील राजकारणी, प्रत्येकाच्या महत्त्वाकांक्षा असतात, पण त्यासाठी मर्यादा ओलांडायच्या नसतात; सत्यजीत तांबेंनी रोहित पवारांना सुनावलं
 जिल्हा

‘उमेद’ अभियानाची विक्रमी झेप; दहा लाखांहून अधिक ग्रामीण महिला बचत गटांशी जोडल्या गेल्या

डिजिटल पुणे    17-11-2026 11:42:18

मुंबई : राज्यातील ग्रामीण महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी कार्यरत असलेल्या ‘उमेद’ (महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान) अभियानाने ‘सेवा संकल्प अभियान’ आणि नियमित कामकाजाच्या माध्यमातून विक्रमी कामगिरी नोंदवली आहे. या मोहिमेअंतर्गत राज्यभरात १० लाखांहून अधिक नवीन ग्रामीण महिला बचत गटांच्या चळवळीशी जोडल्या गेल्या असून, नवीन बचत गट स्थापनेत महाराष्ट्राने देशात प्रथम क्रमांक पटकावला आहे.

उद्दिष्टाच्या समीप झेप आणि डिजिटल नोंदणी

ग्रामविकास व पंचायत राज विभागांतर्गत राबविण्यात आलेल्या या मोहिमेत राज्यभरात एकूण १ लाख ३ हजार २०९ नवीन महिला बचत गटांची स्थापना करण्यात आली आहे. अभियान कालावधीत १ लाख ५ हजार ३७१ गट स्थापनेचे उद्दिष्ट ठेवण्यात आले होते, ज्याच्या अगदी जवळ पोहोचण्यात यंत्रणेला यश आले आहे. विशेष म्हणजे, या नवस्थापित गटांपैकी ७८ हजार ४५४ बचत गटांची ‘लोकोओएस’ (LokOS) या डिजिटल प्रणालीवर नोंदणी पूर्ण झाली असून, उर्वरित गटांची नोंदणी प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे. राज्यस्तरापासून ते गावपातळीपर्यंतच्या सर्व यंत्रणांनी समन्वयाने आणि जिद्दीने केलेल्या कामामुळे हे यश साध्य झाले आहे.

एक कोटी ‘लखपती दीदी’ घडविण्याचा संकल्प

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी देशभरात ६ कोटी ‘लखपती दीदी’ घडविण्याची घोषणा केली आहे. त्याच धर्तीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यात १ कोटी महिलांना ‘लखपती दीदी’ बनविण्याचा संकल्प केला आहे. ग्रामविकास व पंचायत राज मंत्री जयकुमार गोरे, राज्यमंत्री योगेश कदम आणि विभागाचे सचिव चंद्रकांत पुलकुंडवार यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम वेगाने राबविला जात आहे. नव्याने स्थापन झालेले हे बचत गट राज्यातील एक कोटी लखपती दीदी घडविण्याच्या मोहिमेचा मुख्य कणा ठरणार आहेत.

“सेवा संकल्प अभियानांतर्गत झालेल्या या व्यापक कामामुळे राज्यातील बचत गटांची चळवळ अधिक बळकट आणि समृद्ध झाली आहे. ग्रामीण महिलांना स्वावलंबी बनविण्यासाठी आणि त्यांच्या आर्थिक प्रगतीसाठी उमेद अभियान यापुढेही अशीच भरीव कामगिरी करत राहील.”असा विश्वास उमेद अभियानाचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीधर डुबे पाटील यांनी व्यक्त केला आहे.

 

 

 


 Give Feedback



 जाहिराती