पुणे : भारतीय विद्या भवन आणि इन्फोसिस फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित सांस्कृतिक प्रसार कार्यक्रमांतर्गत 'रूपक कलासदन, पुणे 'प्रस्तुत 'अभंग वेध' हा कार्यक्रम शनिवार, दि. २१ नोव्हेंबर २०२६ रोजी सायंकाळी ६ वाजता भारतीय विद्या भवनचे सरदार महादेव बळवंत नातू सभागृह, सेनापती बापट रस्ता, पुणे येथे होणार आहे.कार्तिकी एकादशीच्या निमित्ताने नामवंत संतांच्या अभंगांचा नव्या दृष्टीतून घेतलेला नृत्यात्मक वेध या कार्यक्रमातून सादर केला जाणार आहे. परंपरेतील नवतेचा एक नृत्यात्मक शोध असा या कार्यक्रमाचा आशय आहे. या कार्यक्रमाची संकल्पना व दिग्दर्शन मानसी वझे यांचे असून विशेष मार्गदर्शन डॉ. संजय उपाध्ये यांचे आहे.
या कार्यक्रमात सहभागी कलाकार म्हणून मानसी वझे, शाश्वती वझे, मुक्ता देशपांडे, समृद्धी जोशी, प्राजक्ता नेवासकर, वालीशा शिखरे व श्रावणी फत्तेपुरे सहभागी होणार आहेत. भारतीय विद्या भवन आणि इन्फोसिस फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित सांस्कृतिक प्रसार कार्यक्रमांतर्गत हा ३१२ वा कार्यक्रम आहे. सर्व रसिकांसाठी प्रवेश खुला आहे, अशी माहिती भारतीय विद्या भवनचे संचालक प्रा. नंदकुमार काकिर्डे यांनी दिली.'अभंग वेध' हा आजच्या पिढीतील एक प्रायोगिक प्रयत्न आहे. महाराष्ट्रातील थोर संतांनी लिहिलेल्या साहित्याचा अर्थ मनापासून समजून घेणे आणि भरतनाट्यम या माध्यमातून त्यातील समकालीन अर्थ आणि आशय शोधणे हा या प्रयत्नाचा हेतू आहे.अभंगांमध्ये मांडलेल्या विषयांचे आजच्या तरुणाईच्या प्रश्नांशी आणि विचारांशी असलेले नाते या निर्मितीतून मांडले जाणार आहे.