सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • MS धोनीची IPL मधून निवृत्ती? चेन्नई सुपर किंग्जने सोपवली नवी जबाबदारी; 2027 पासून मेंटॉरच्या भूमिकेत दिसणार!
  • अजितदादांच्या विमान अपघाताला रोहित पवारांच्या साखर कारखान्याचा धूर कारणीभूत? भाजपच्या नवनाथ बन यांचा गंभीर आरोप
  • अमित शाह यांचा चकाट्या पिटणारा गृहमंत्री असा उल्लेख, मणिपूर, अरुणाचल प्रदेशला जाण्याचं चॅलेंज, उद्धव ठाकरेंचा शाहांवर हल्लाबोल
  • आपण सर्वजण एकाच पिढीतील राजकारणी, प्रत्येकाच्या महत्त्वाकांक्षा असतात, पण त्यासाठी मर्यादा ओलांडायच्या नसतात; सत्यजीत तांबेंनी रोहित पवारांना सुनावलं
 जिल्हा

जबाबदारी आणि गुणवत्ता यांचा मिलाप असणारा ‘महा-पल्स एआय’ प्रकल्प राज्यातील आरोग्य क्षेत्राला दिशादर्शक ठरेल – मंत्री प्रकाश आबिटकर

डिजिटल पुणे    17-11-2026 13:15:53

कोल्हापूर : आरोग्य सेवा अधिक गतिमान आणि पारदर्शक करण्यासाठी ‘महापल्स’ या अद्ययावत प्रकल्पाची सुरुवात कोल्हापूर जिल्ह्यातून ‘पायलट प्रोजेक्ट’ (प्रायोगिक तत्त्वावर) म्हणून करण्यात आली आहे. या महत्त्वाकांक्षी प्रकल्पामुळे राज्याच्या सार्वजनिक आरोग्य क्षेत्रात अमुलाग्र आणि गुणवत्तापूर्ण बदल घडून येईल. येत्या काळात संपूर्ण राज्यात या प्रकल्पाची अंमलबजावणी करण्यात येईल, राज्याच्या सार्वजनिक आरोग्य क्षेत्रात हा प्रकल्प क्रांतिकारक आणि दिशादर्शक ठरेल, असे प्रतिपादन सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांनी केले.

महा-पल्स एआय या महत्वकांक्षी प्रकल्पाची सुरुवात कोल्हापुरात सार्वजनिक आरोग्य मंत्री तथा पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या हस्ते झाली. यावेळी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा शिल्पा खोत, जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.जॅसमिन, आरोग्य सभापती सारिका नरंदेकर, शिक्षण सभापती शितल यादव, आयआयटी मंडीचे अधिष्ठाता डॉ. सत्वशील पवार, हर्षवर्धन काळोखे, आरोग्य उपसंचालक डॉ. दिलीप माने, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सरिता थोरात, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्ध पिंपळे यांची प्रमुख उपस्थिती होती.

प्रकाश आबिटकर म्हणाले, उत्तर प्रदेश सरकारच्या ‘HOPE’ (Health Online Parameter Evaluation Center) मॉडेलपासून प्रेरणा घेऊन हा प्रकल्प राबवला जात आहे. विशेष म्हणजे, आयआयटी मंडी (IIT Mandi) चे अधिष्ठाता प्रा. पवार सर आणि हर्षवर्धन काळोखे यांच्या सहकार्याने यामध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला असून, हे मॉडेल उत्तर प्रदेशपेक्षाही अधिक प्रगत आहे. आरोग्य विभागाच्या सादरीकरणा दरम्यान राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘महापल्स’ प्रकल्पाचे विशेष कौतुक करत ‘एक्सलंट’ अशी उत्स्फूर्त प्रतिक्रिया दिली असल्याचे सांगून मुख्यमंत्री यांच्याप्रमाणेच सर्वसामान्य नागरिकही या प्रणालीला एक्सलंट अशीच प्रतिक्रिया देईल, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.

रिअल-टाइम मॉनिटरिंग आणि एआय (AI) अलर्ट सिस्टीम

प्रकाश आबिटकर म्हणाले, या प्रणालीमुळे प्राथमिक आरोग्य केंद्रे (PHC), ग्रामीण रुग्णालये आणि जिल्हा रुग्णालयांमधील कामकाजावर थेट लक्ष ठेवता येणार आहे. रुग्णालयातील स्वच्छता, रुग्णांची संख्या, औषधांचा साठा आणि डॉक्टरांची उपस्थिती यांची माहिती एका क्लिकवर उपलब्ध होईल. यासाठी आता बायोमेट्रिक किंवा फेस रीडिंगचीही गरज राहणार नाही.

कोणत्याही रुग्णालयात त्रुटी आढळल्यास एआय प्रणालीमार्फत तात्काळ संबंधित तालुका आरोग्य अधिकारी, गटविकास अधिकारी, जिल्हा आरोग्य अधिकारी आणि जिल्हा शल्यचिकित्सक यांना थेट अलर्ट जाईल. या प्रकल्पाचा डॅशबोर्ड आरोग्य मंत्री, आरोग्य विभागाचे सचिव, आयुक्त यांच्यासह जिल्हा परिषदेचे अध्यक्ष, मुख्य कार्यकारी अधिकारी, सभापती आणि पंचायत समितीच्या चेंबरमध्ये उपलब्ध असेल. त्यामुळे सभागृहात विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांना जागेवरच अचूक उत्तरे मिळतील.

कर्मचाऱ्यांचे उत्तरदायित्व वाढणार

मंत्री आबिटकर म्हणाले, या प्रणालीमुळे यंत्रणेला सतर्क आणि सजग राहावेच लागेल. कामावर दांडी मारणे किंवा चुकीची माहिती देणे या प्रकारांना आता पूर्णपणे आळा बसेल. कोल्हापुरातील यशस्वी प्रयोगानंतर हा प्रकल्प संपूर्ण महाराष्ट्रातील सर्व शासकीय रुग्णालयांमध्ये लागू केला जाणार आहे.

जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड म्हणाले, कोल्हापूर हा पुरोगामी, महाराष्ट्राला पर्यायाने देशाला दिशा देणारा जिल्हा आहे. पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या संकल्पनेतून साकारलेला महापल्स एआय प्रकल्प सार्वजनिक आरोग्य क्षेत्रामध्ये देशाला दिशा देणारा उपक्रम ठरेल. दररोजच्या जीवनात याचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. याचा वापर करून आरोग्य सेवा अधिक गुणवत्तापूर्ण करण्यात येत आहेत. त्या दृष्टीने महापल्स उपक्रम महत्वपूर्ण ठरेल.या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रकल्प संचालक हर्षवर्धन काळोखे यांनी केले. तर आभार डॉ. सत्वशील पवार यांनी मानले.

महा-पल्स एआय उपक्रमाची ठळक वैशिष्ट्ये

कोल्हापुरात राज्यातील पहिला ‘महा-पल्स एआय’ आरोग्य प्रकल्प

• कोल्हापूर जिल्ह्यातील बारा तालुक्यातील एकूण १०४ शासकीय आरोग्य संस्था डिजिटल यंत्रणेशी जोडल्या जाणार

• कृत्रिम बुद्धिमत्तेच्या माध्यमातून आरोग्य संस्थावर राहणार रिअल-टाइम नजर

• कोल्हापूर जिल्हा नियोजन समितीच्या नाविन्यपूर्ण उपक्रमांतर्गत या प्रकल्पासाठी आर्थिक तरतूद

• सार्वजनिक आरोग्य विभागाच्या आरोग्य सेवांमध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेचा प्रत्यक्ष वापर करणारा हा राज्यातील पहिला जिल्हास्तरीय प्रकल्प

• सार्वजनिक आरोग्य विभाग आणि जिल्हाधिकारी कार्यालय, कोल्हापूर यांच्या पुढाकाराने तसेच आयआयटी मंडी (IIT Mandi) या नामांकित तंत्रशिक्षण संस्थेच्या तांत्रिक सहकार्याने या प्रकल्पाची अंमलबजावणी

• ‘महा-पल्स एआय’च्या माध्यमातून कोल्हापूर जिल्ह्यातील १२ तालुक्यांमधील एकूण १०४ शासकीय आरोग्य संस्थांना एका जिल्हा कमांड सेंटरशी जोडण्यात येणार आहे. यामध्ये १ सामान्य रुग्णालय, ५ उपजिल्हा रुग्णालये, १५ ग्रामीण रुग्णालये आणि ८३ प्राथमिक आरोग्य केंद्रांचा समावेश

• जिल्ह्यातील शहरी तसेच दुर्गम ग्रामीण भागातील आरोग्य संस्थांच्या कामकाजावर एकाच ठिकाणाहून देखरेख ठेवणे शक्य होणार

• एआयच्या माध्यमातून रुग्णालयांच्या कामकाजावर देखरेख

• या प्रणालीद्वारे रुग्णालयांमधील डॉक्टरांची उपस्थिती, रुग्णांची गर्दी, रांग व्यवस्थापन, स्वच्छता, हाऊसकीपिंग तसेच आपत्कालीन घटनांवर कृत्रिम बुद्धिमत्तेच्या माध्यमातून लक्ष ठेवले जाणार

• एखादा रुग्ण अचानक कोसळणे, रुग्णालय परिसरात आग लागणे किंवा धूर निर्माण होणे यांसारख्या घटनांची प्रणाली तत्काळ ओळख करून संबंधित अधिकाऱ्यांना अलर्ट पाठवेल.

तसेच बाह्यरुग्ण विभागातील गर्दी, प्रतीक्षेत असलेल्या रुग्णांची संख्या आणि सरासरी प्रतीक्षा वेळ यांचेही विश्लेषण केले जाणार.

• या प्रकल्पासाठी नवीन सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याची आवश्यकता नाही. आरोग्य संस्थांमध्ये आधीपासून उपलब्ध असलेल्या सीसीटीव्ही यंत्रणेचाच वापर करून कृत्रिम बुद्धिमत्ता आणि मशीन लर्निंग तंत्रज्ञानाद्वारे फुटेजचे विश्लेषण केले जाणार.

• जिल्हा कमांड सेंटरमधून संपूर्ण आरोग्य व्यवस्थेचा आढावा

• जिल्हा कमांड सेंटरमध्ये सर्व १०४ आरोग्य संस्थांमधील माहिती, अलर्ट, महत्त्वाच्या घटनांचे अहवाल आणि त्यावर करण्यात आलेल्या कार्यवाहीचा आढावा एकाच डॅशबोर्डवर उपलब्ध होणार. यामुळे आरोग्य व प्रशासकीय अधिकाऱ्यांना रुग्णालयांमधील परिस्थितीची प्रत्यक्ष वेळेत माहिती मिळेल.

• एखाद्या ठिकाणी समस्या निर्माण झाल्यास संबंधित अधिकाऱ्यांना तत्काळ सूचना देऊन त्यावर झालेल्या कार्यवाहीचा पाठपुरावा करणे शक्य होईल.

• रुग्णांना मिळणार अधिक दर्जेदार आणि वेळेत आरोग्यसेवा

• या प्रकल्पामुळे डॉक्टरांच्या उपलब्धतेवर देखरेख, रुग्णांच्या प्रतीक्षा वेळेत कपात, रुग्णालयांमधील स्वच्छतेचे प्रभावी व्यवस्थापन आणि आपत्कालीन परिस्थितीत त्वरित प्रतिसाद देणे शक्य होणार

• रुग्ण, डॉक्टर आणि आरोग्य कर्मचाऱ्यांच्या माहितीची गोपनीयता जपण्यासाठी डिजिटल वैयक्तिक डेटा संरक्षण कायदा, २०२३ (DPDP Act) मधील तरतुदींचे पालन करण्यात येणार.

 


 Give Feedback



 जाहिराती