पुणे : सिंहगड रोडवरील माणिकबाग परिसरात उड्डाणपुलाखालील रस्त्यावर चेंबर खचल्याने वाहनचालकांसाठी अपघाताचा धोका निर्माण झाला आहे. खडकवासला, धायरी आणि वडगाव परिसरातून स्वारगेटच्या दिशेने जाणाऱ्या मुख्य रस्त्यावर ही धोकादायक परिस्थिती निर्माण झाली आहे.
माणिकबाग येथील उड्डाणपुलाखाली रस्त्याच्या मध्यभागी असलेल्या चेंबरचा भाग खचला असून, त्याठिकाणी सध्या सुरक्षेच्या दृष्टीने लाल रंगाचे बॅरिकेड ठेवण्यात आले आहे. मात्र, हे बॅरिकेड तात्पुरती उपाययोजना असून चेंबरची प्रत्यक्ष दुरुस्ती होणे आवश्यक आहे.
या मार्गावरून दररोज मोठ्या प्रमाणात दुचाकी, चारचाकी तसेच पीएमपीएमएलच्या बसची वाहतूक सुरू असते. विशेष म्हणजे खडकवासला, धायरी आणि वडगावकडून स्वारगेटच्या दिशेने येणाऱ्या वाहनांचा वेग अनेकदा जास्त असतो. त्यामुळे अचानक समोर आलेले बॅरिकेड किंवा खचलेल्या चेंबरचा अंदाज न आल्यास वाहनचालकांचे नियंत्रण सुटून अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. विशेषतः दुचाकीस्वारांसाठी ही परिस्थिती अधिक धोकादायक ठरू शकते.
सिंहगड रोडवरील हा महत्त्वाचा मार्ग असल्याने या ठिकाणी एखादी गंभीर दुर्घटना घडण्यापूर्वीच संबंधित प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देणे गरजेचे आहे. केवळ बॅरिकेड लावून तात्पुरती व्यवस्था करण्याऐवजी खचलेल्या चेंबरची तातडीने पाहणी करून त्याची कायमस्वरूपी दुरुस्ती करावी, अशी मागणी वाहनचालक आणि नागरिकांकडून होत आहे.अपघात घडल्यानंतर उपाययोजना करण्यापेक्षा अपघात होण्यापूर्वीच प्रशासनाने योग्य ती खबरदारी घेऊन चेंबरची तातडीने दुरुस्ती करावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
