नवी दिल्ली : राजधानी दिल्लीत इमारत कोसळण्याच्या दोन वेगवेगळ्या घटनांनी खळबळ उडाली आहे. शाहदरा येथील ज्वाला नगर परिसरात दोन मजली इमारतीचे छत कोसळून तीन वर्षांच्या चिमुकल्यासह दोघांचा मृत्यू झाला असून चार जण जखमी झाले आहेत. दुसरीकडे, जुन्या दिल्लीतील चावडी बाजार परिसरात बांधकाम सुरू असलेली तीन मजली इमारत कोसळल्याने दोघांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. दोन्ही घटनांमध्ये ढिगाऱ्याखाली आणखी काहीजण अडकल्याची शक्यता असून बचावकार्य सुरू आहे.
शाहदरा येथील ज्वाला नगरमधील गल्ली क्रमांक ६ येथे सकाळी सव्वा दहा वाजण्याच्या सुमारास इमारतीचे छत अचानक कोसळले. घटनेची माहिती मिळताच दिल्ली अग्निशमन दलाच्या चार गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. अग्निशमन दल, पोलीस आणि स्थानिक नागरिकांच्या मदतीने बचावकार्य हाती घेण्यात आले. ढिगाऱ्यातून दोन जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत.
या दुर्घटनेत बाबू नावाच्या तीन वर्षांच्या मुलासह ३५ वर्षीय पिंटू यांचा मृत्यू झाला. तर खूशबू, विकास, अमन आणि आकाश हे चौघे जखमी झाले आहेत. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून ढिगाऱ्याखाली आणखी कोणी अडकले आहे का, याचा शोध घेतला जात आहे.
दरम्यान, जुन्या दिल्लीतील चावडी बाजार परिसरातही गुरुवारी सकाळी मोठी दुर्घटना घडली. गल्ली सितारा येथे बांधकाम सुरू असलेली तीन मजली इमारत सकाळी सुमारे ९ वाजून ५० मिनिटांनी कोसळली. या घटनेत दोघांचा मृत्यू झाला असून आणखी एक जण जखमी झाल्याचे वृत्त आहे. ढिगाऱ्याखाली काही नागरिक अडकले असण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या सहा पथकांसह बचाव वाहने आणि पाण्याच्या टाक्या घटनास्थळी पाठवण्यात आल्या. राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाचे (NDRF) जवानही बचावकार्यात सहभागी झाले आहेत. परिसरातील अरुंद गल्ल्या आणि रस्त्यांवर उभी असलेली वाहने यामुळे बचाव पथकांना घटनास्थळापर्यंत पोहोचताना अडचणींचा सामना करावा लागत आहे. स्थानिक नागरिकांनी वाहने बाजूला करून रुग्णवाहिका आणि बचाव पथकांसाठी मार्ग मोकळा केला.
या दुर्घटनेनंतर प्रशासनाकडून संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात आली आहे. सहायक अभियंता मोहम्मद नदीम आणि कनिष्ठ अभियंता अमन दलाल यांना निलंबित करण्यात आले आहे.दिल्लीत एकाच दिवशी घडलेल्या या दोन इमारत दुर्घटनांमुळे बांधकामांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. सध्या दोन्ही ठिकाणी बचाव आणि शोधमोहीम सुरू असून ढिगाऱ्याखाली अडकलेल्या नागरिकांचा शोध घेतला जात आहे.