सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • MS धोनीची IPL मधून निवृत्ती? चेन्नई सुपर किंग्जने सोपवली नवी जबाबदारी; 2027 पासून मेंटॉरच्या भूमिकेत दिसणार!
  • अजितदादांच्या विमान अपघाताला रोहित पवारांच्या साखर कारखान्याचा धूर कारणीभूत? भाजपच्या नवनाथ बन यांचा गंभीर आरोप
  • अमित शाह यांचा चकाट्या पिटणारा गृहमंत्री असा उल्लेख, मणिपूर, अरुणाचल प्रदेशला जाण्याचं चॅलेंज, उद्धव ठाकरेंचा शाहांवर हल्लाबोल
  • आपण सर्वजण एकाच पिढीतील राजकारणी, प्रत्येकाच्या महत्त्वाकांक्षा असतात, पण त्यासाठी मर्यादा ओलांडायच्या नसतात; सत्यजीत तांबेंनी रोहित पवारांना सुनावलं
 क्राईम

तंत्र-मंत्राच्या भीतीने वृद्ध दाम्पत्याला 10 वर्षे लुटले; फ्लॅट, सोने, शेअर्स विकायला लावून 6.38 कोटींची फसवणूक

डिजिटल पुणे    17-11-2026 14:20:17

मुंबई : तंत्र-मंत्र, जादूटोणा आणि अघोरी पूजेच्या नावाखाली एका ज्येष्ठ दाम्पत्याची तब्बल 6 कोटी 38 लाख रुपयांची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार मुंबईतील दहिसर परिसरात उघडकीस आला आहे. डायन, श्राप आणि दुष्ट शक्तींची भीती दाखवत आरोपींनी या दाम्पत्याला तब्बल दहा वर्षे मानसिक दबावाखाली ठेवले. या काळात त्यांच्याकडून सोन्याचे दागिने, चार फ्लॅट, शेअर्स आणि बँकेतील बचत असा कोट्यवधींचा ऐवज उकळण्यात आल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी दहिसर पोलिसांनी 13 नोव्हेंबर 2026 रोजी मुख्य आरोपी उमेश देशपांडे याच्यासह दहा जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

शेजाऱ्याच्या माध्यमातून आरोपींशी ओळख

पोलिसांत दाखल तक्रारीनुसार, डिसेंबर 2016 मध्ये या फसवणुकीला सुरुवात झाली. दहिसर पूर्वेकडील गायत्री सोसायटीत राहणाऱ्या परसिस मेहता यांची शेजारी मेघना इनामदार हिच्यामार्फत पनवेल येथील रमाबाई साने आणि उमेश देशपांडे यांच्याशी ओळख झाली. त्यावेळी परसिस यांचे पती दारा मेहता यांना तीन वेळा पक्षाघाताचा झटका आला होता. या परिस्थितीचा फायदा घेत आरोपींनी घरात वास्तुदोष आणि जादूटोणा असल्याचे सांगितले. पूजा करण्याच्या बहाण्याने सुरुवातीला 40 ग्रॅम सोन्याची साखळी आणि 3 लाख 85 हजार रुपये घेतले.

108 वर्षांच्या गुरुवर्याचा बनाव करून फसवणूक

दाम्पत्याचा विश्वास संपादन करण्यासाठी आरोपींनी अनेक काल्पनिक पात्रे आणि बनावट ओळखींचा वापर केला. मुख्य आरोपी उमेश देशपांडे आवाज बदलून स्वतःला हैदराबादमधील मठाचा 108 वर्षांचा गुरुवर्य असल्याचे सांगत असे. तर अश्विनी गायकवाड ही स्नेहलता दीक्षित उर्फ बाईसाहेब आणि वृषाली गायकवाड ही रमाबाई साने असल्याचे भासवत होती. रमाबाई यांची हत्या झाली असून बाईसाहेब यांनी कामशेत येथे समाधी घेतल्याच्या खोट्या कहाण्याही दाम्पत्याला सांगण्यात आल्या. त्यामुळे आरोपी सांगतील त्या प्रत्येक गोष्टीवर दाम्पत्य विश्वास ठेवू लागले.

काळी बाहुली, भस्म आणि अघोरी पूजेचा वापर

घरातील संपत्तीवर डायन आणि वाईट शक्तींचा प्रभाव असल्याचे सांगून आरोपींनी दाम्पत्याला घाबरवले. घरात अघोरी पूजा करण्यात आली. काळी बाहुली ठेवण्यासोबतच नेपाळमधील साधूचे भस्म आणि सिंदूर खाण्यास दिल्याचा आरोप आहे. आरोपींनी पती आणि त्यांच्या दोन्ही मुलांच्या जीवाला धोका असल्याचे सांगून दाम्पत्यावर मानसिक दबाव निर्माण केला. कुटुंबाचे रक्षण करायचे असेल तर संपत्ती शुद्ध करावी लागेल, असे सांगत त्यांनी आर्थिक लूट सुरू ठेवली.

चार फ्लॅट विकले, शेअर्स आणि बचतही गमावली

आरोपींच्या सांगण्यावरून दाम्पत्याने दहिसर आणि बोरिवली परिसरातील चार फ्लॅट विकले. या विक्रीतून मिळालेले सुमारे 3 कोटी 2 लाख रुपये आरोपींनी हडपल्याचा आरोप आहे. याशिवाय जवळपास 1 कोटी 60 लाख रुपयांचे शेअर्स विकण्यास भाग पाडण्यात आले. बँक आणि पोस्ट ऑफिसमधील सुमारे 45 लाख रुपयेही काढून घेण्यात आले. घरातील फर्निचरदेखील आरोपींनी ताब्यात घेतल्याचे तक्रारीत नमूद आहे.

मठाच्या नावाखाली 45 लाखांचे कर्ज काढायला लावले

फसवणुकीचा प्रकार एवढ्यावरच थांबला नाही. मठाचे बांधकाम करण्यासाठी सावकाराकडून दरमहा 8 टक्के व्याजाने 45 लाख रुपयांचे कर्ज घेण्यासही दाम्पत्याला भाग पाडण्यात आले. या कर्जाची परतफेड करताना त्यांना सुमारे 90 लाख रुपये खर्च करावे लागल्याचे तक्रारीत म्हटले आहे. अशा प्रकारे दहा वर्षांच्या कालावधीत दाम्पत्याची आर्थिक परिस्थिती पूर्णपणे कोलमडली.

24 हजार रुपये उसने मागितल्याने प्रकार उघडकीस

जून 2025 मध्ये आर्थिक अडचणीत सापडलेल्या या दाम्पत्याने हैदराबादला जाण्यासाठी शेजारी रवींद्र किणी यांच्याकडे 24 हजार रुपये उसने मागितले. कोट्यवधींची संपत्ती असलेल्या दाम्पत्यावर अशी वेळ का आली, असा प्रश्न शेजाऱ्याला पडला. त्यानंतर त्यांनी चौकशी सुरू केली आणि फसवणुकीचा प्रकार समोर आला. आरोपींनी या पैशांतून गोरेगावमधील नागरी निवारा परिषद परिसरात अनेक फ्लॅट खरेदी केल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.

मुख्य आरोपी उमेश देशपांडे याला दिंडोशी पोलिसांनी यापूर्वीच अन्य एका प्रकरणात अटक केली आहे. दरम्यान, दहिसर पोलिसांकडून उर्वरित आरोपींची भूमिका, फसवणुकीतून मिळालेल्या पैशांचा व्यवहार आणि त्या पैशांतून खरेदी करण्यात आलेल्या मालमत्तांचा तपास सुरू आहे.

 

 


 Give Feedback



 जाहिराती