चेन्नई : भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार आणि चेन्नई सुपर किंग्जचा स्टार खेळाडू महेंद्रसिंह धोनी याच्या आयपीएलमधील भूमिकेत मोठा बदल होणार असल्याची माहिती समोर आली आहे. चेन्नई सुपर किंग्जने धोनीवर नवी जबाबदारी सोपवण्याचा निर्णय घेतला असून, 2027 च्या आयपीएल हंगामात तो संघाचा मेंटॉर म्हणून काम पाहणार असल्याचे वृत्त आहे. त्यामुळे मैदानावर खेळाडू म्हणून दिसणाऱ्या धोनीची आता नव्या इनिंगला सुरुवात होणार आहे.
चेन्नई सुपर किंग्जचे मालक एन. श्रीनिवासन यांनी धोनीचे संघातील महत्त्व अधोरेखित केले आहे. धोनी आणि चेन्नई सुपर किंग्ज यांचे नाते जवळपास दोन दशकांपासून कायम आहे. या प्रवासात संघाने अनेक चढ-उतार अनुभवले, मात्र धोनीचे योगदान नेहमीच महत्त्वाचे राहिले. धोनीशिवाय चेन्नई सुपर किंग्जची कल्पनाच करता येणार नाही, अशा शब्दांत श्रीनिवासन यांनी त्याचे कौतुक केले. तसेच 2008 मध्ये धोनीला संघात घेण्याचा निर्णय योग्य ठरल्याचेही त्यांनी नमूद केले.
2027 पासून मेंटॉर म्हणून नवी भूमिका
आयपीएलच्या पहिल्या हंगामापासून म्हणजेच 2008 पासून धोनी चेन्नई सुपर किंग्जचा महत्त्वाचा भाग राहिला आहे. त्याच्या नेतृत्वाखाली चेन्नईने पाच वेळा आयपीएलचे विजेतेपद पटकावले. आता संघाच्या भविष्यातील नियोजनानुसार कर्णधारपदाची जबाबदारी ऋतुराज गायकवाडकडे कायम ठेवण्यात आली आहे. तर यष्टिरक्षक म्हणून संजू सॅमसनला संघात स्थान देण्यात आले आहे. या बदलांनंतर धोनीची भूमिका बदलण्याची तयारी चेन्नईने केली आहे. आगामी हंगामात तो खेळाडूऐवजी मेंटॉर म्हणून संघाला मार्गदर्शन करणार आहे.
धोनीची आयपीएलमधील कामगिरी दमदार
महेंद्रसिंह धोनीने आपल्या आयपीएल कारकिर्दीत आतापर्यंत 278 सामने खेळले आहेत. 2008 ते 2026 या कालावधीत त्याने चेन्नई सुपर किंग्ज आणि रायझिंग पुणे सुपरजायंट्स या दोन संघांचे प्रतिनिधित्व केले. चेन्नई संघावर दोन वर्षांची बंदी असताना त्याने पुणे संघाकडून खेळण्याचा निर्णय घेतला होता.
आयपीएलमध्ये धोनीच्या नावावर 5,439 धावांची नोंद आहे. त्याची सर्वोत्तम वैयक्तिक धावसंख्या 84 असून, त्याने 24 अर्धशतके झळकावली आहेत. याशिवाय त्याने 264 षटकार आणि 375 चौकार मारले आहेत. यष्टिरक्षणातही त्याने आपली छाप सोडली असून, 158 झेल आणि 47 यष्टिचित करण्याची कामगिरी केली आहे.
धोनीच्या नेतृत्वाखाली चेन्नई पाच वेळा चॅम्पियन
धोनीच्या नेतृत्वाखाली चेन्नई सुपर किंग्जने 2010, 2011, 2018, 2021 आणि 2023 मध्ये आयपीएलचे विजेतेपद मिळवले. त्याच्या नेतृत्वात चेन्नईचा संघ तब्बल 10 वेळा अंतिम फेरीत पोहोचला होता.धोनीने 2022 मध्ये कर्णधारपदाची जबाबदारी रवींद्र जडेजाकडे सोपवली होती. त्यानंतर पुन्हा नेतृत्वाची धुरा सांभाळल्यानंतर 2024 पासून ऋतुराज गायकवाड चेन्नईचा कर्णधार झाला. आता धोनीच्या नव्या भूमिकेमुळे चेन्नई सुपर किंग्जच्या संघरचनेत आणखी एक महत्त्वाचा बदल पाहायला मिळणार आहे.
मैदानावर आपल्या नेतृत्वाने आणि रणनीतीने प्रतिस्पर्ध्यांना चकित करणारा धोनी आता मेंटॉरच्या भूमिकेतून नव्या खेळाडूंना मार्गदर्शन करताना दिसणार आहे. त्यामुळे त्याच्या या नव्या इनिंगकडे क्रिकेट चाहत्यांचे लक्ष लागले आहे.
