पुणे : महात्मा फुले पेठेतील विजय वल्लभ शाळा आणि अंगारशाह ताकीया परिसरातील टिंबर मार्केटमध्ये मंगळवारी (दि. १७ नोव्हेंबर) मध्यरात्री भीषण आग लागण्याची दुर्दैवी घटना घडली. या आगीत सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र, आगीमध्ये परिसरातील अनेक दुकानांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले आहे.
या घटनेची माहिती मिळताच पुण्याच्या महापौर मंजुषा नागपुरे यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. यावेळी त्यांनी आगीमुळे झालेल्या नुकसानीची माहिती घेतली तसेच बाधित व्यापारी आणि परिसरातील नागरिकांशी संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या.
अनेक वर्षांच्या मेहनतीतून आणि कष्टातून उभे केलेले व्यवसाय आगीत जळून खाक झाल्याने व्यापाऱ्यांवर मोठे आर्थिक संकट ओढवले आहे. या कठीण प्रसंगी बाधित व्यापारी आणि नागरिकांना धीर देत महापौर मंजुषा नागपुरे यांनी त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याची ग्वाही दिली.
तसेच नुकसानग्रस्तांना आवश्यक ती मदत मिळवून देण्यासाठी आणि संबंधित यंत्रणांकडून सर्वतोपरी सहकार्य उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्नशील राहणार असल्याचे त्यांनी सांगितले.या दुर्घटनेमुळे परिसरातील व्यापाऱ्यांचे मोठे नुकसान झाले असून, बाधितांना लवकरात लवकर दिलासा मिळावा, अशी अपेक्षा स्थानिक नागरिक आणि व्यापाऱ्यांकडून व्यक्त केली जात आहे.
