अलिबाग : रायगड जिल्ह्यातील अलिबागमध्ये वाहतूककोंडीमुळे एका २० महिन्यांच्या चिमुरड्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना समोर आली आहे. खेळताना फुगा गिळल्याने बालकाचा श्वास गुदमरू लागला. त्याला तातडीने रुग्णालयात नेण्यासाठी पालकांनी रुग्णवाहिका बोलावली; मात्र बेलकडे ते अलिबाग मार्गावर सुरू असलेल्या रस्त्याच्या कामामुळे निर्माण झालेल्या प्रचंड वाहतूककोंडीत रुग्णवाहिका तब्बल दीड ते दोन तास अडकून पडली. वेळेत उपचार न मिळाल्याने अखेर या चिमुरड्याचा आई-वडिलांच्या कुशीतच मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
मृत बालकाचे नाव आरांश ठाकूर असे असून, तो अवघ्या २० महिन्यांचा होता. सोमवारी (१६ नोव्हेंबर) दुपारी साडेएकच्या सुमारास आरांश घराच्या अंगणात खेळत असताना त्याने अचानक फुगा गिळला. हा फुगा घशात अडकल्याने त्याला श्वास घेण्यास त्रास होऊ लागला. मुलाची प्रकृती बिघडत असल्याचे लक्षात येताच आई-वडिलांनी त्याला तातडीने अलिबाग जिल्हा सामान्य रुग्णालयात नेण्याचा निर्णय घेतला.
मात्र, रुग्णालयाकडे जाणाऱ्या बेलकडे-अलिबाग मार्गावर रस्त्याचे काम सुरू असल्याने वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. त्यामुळे रुग्णवाहिकेला पुढे जाण्यासाठी रस्ता मिळत नव्हता. रुग्णवाहिकेचा सायरन सतत वाजत असतानाही वाहतूककोंडीमुळे मार्ग मोकळा होऊ शकला नाही. या काळात आपल्या मुलाचा श्वास कोंडत असल्याचे पाहून आई-वडील हतबल झाले होते. 'माझ्या लेकराचा श्वास कोंडतोय, कोणीतरी रस्ता द्या,' अशी आर्त विनवणी ते करत होते.
अखेर सुमारे दोन तासांच्या प्रतीक्षेनंतर रुग्णवाहिकेला मार्ग मिळाला. दुपारी चारच्या सुमारास आरांशला रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, तोपर्यंत खूप उशीर झाला होता. तपासणीनंतर डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. वेळेत वैद्यकीय उपचार मिळाले असते, तर कदाचित त्याचे प्राण वाचले असते, अशी भावना परिसरातील नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे.
आरांशच्या मृत्यूने ठाकूर कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. त्याचे आई-वडील बामणगाव परिसरातील नाक्यावर भाजी विक्रीचा व्यवसाय करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. त्यांना दोन मुले असून आरांश हा धाकटा होता. ज्या घरात काही वेळापूर्वी चिमुरड्याच्या हसण्या-खेळण्याने आनंद पसरला होता, त्याच घरात आता शोककळा पसरली आहे.
या घटनेनंतर बेलकडे-अलिबाग मार्गावरील वाहतूक व्यवस्थेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. रस्त्याची कामे सुरू असताना पर्यायी मार्ग, वाहतुकीचे योग्य नियोजन आणि आपत्कालीन वाहनांसाठी स्वतंत्र मार्गिका उपलब्ध करून देण्याची गरज नागरिकांनी व्यक्त केली आहे. रुग्णवाहिकेलाच वेळेत रस्ता मिळत नसेल, तर सर्वसामान्य नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर असल्याची संतप्त प्रतिक्रिया उमटत आहे.
