सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • नर्तिकेवर एकापाठोपाठ एक कोऱ्या करकरीत नोटा उधळल्या, गर्दीतून 'सातबारा कोरा होईल'ची हाक, राष्ट्रवादीच्या नेत्याचा व्हिडीओ व्हायरल
 शहर

पुण्यात टिंबर मार्केटमध्ये भीषण आग; ५० ते ६० दुकानांचे नुकसान, घरांनाही बसली झळ

डिजिटल पुणे    18-11-2026 12:30:23

पुणे : पुण्यातील प्रसिद्ध टिंबर मार्केट परिसरात मध्यरात्री भीषण आग लागल्याची घटना घडली. पहाटे दोनच्या सुमारास लागलेल्या या आगीत लाकूड, फर्निचर आणि प्लायवूडची अनेक दुकाने आगीच्या विळख्यात सापडली. प्राथमिक माहितीनुसार, सुमारे ५० ते ६० दुकानांना आगीचा फटका बसला असून, लाखो रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे. याशिवाय लगतच्या वस्तीत असलेल्या काही घरांचेही नुकसान झाले. सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी किंवा दुखापत झालेली नाही.

टिंबर मार्केटमधील विजयवल्लभ शाळेजवळील दुकानांमध्ये पहाटेच्या सुमारास अचानक धूर निघू लागला. काही क्षणांतच आगीने मोठे स्वरूप धारण केले. दुकानांमध्ये लाकूड आणि अन्य ज्वलनशील साहित्य मोठ्या प्रमाणात असल्याने आग वेगाने पसरली. परिसरातील नागरिकांनी तातडीने अग्निशमन दलाला माहिती दिली.

घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेतली. आग आटोक्यात आणण्यासाठी सुरुवातीला २५ बंब पाठवण्यात आले. त्यानंतर एकूण ३० अग्निशमन बंब आणि सुमारे १५० जवानांच्या मदतीने बचावकार्य राबवण्यात आले. आग विझवण्यासाठी जवळच्या नाल्यातील पाण्याचाही वापर करण्यात आला. याशिवाय खासगी पाण्याचे टँकरही मागवण्यात आले होते.

आगीची तीव्रता अधिक असल्याने अग्निशमन दलाला अनेक तास शर्थीचे प्रयत्न करावे लागले. अखेर जवानांनी आगीवर नियंत्रण मिळवले. मात्र, काही ठिकाणी आग धुमसत असल्याने परिस्थितीवर लक्ष ठेवण्यात येत आहे. आगीमुळे दुकानांमधील मोठ्या प्रमाणावरील साहित्य जळून खाक झाले असून, परिसरातील काही घरांचेही नुकसान झाले आहे.

आगीचे नेमके कारण अद्याप अस्पष्ट

टिंबर मार्केटमधील आग शॉर्टसर्किटमुळे लागली असावी, असा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. मात्र, दोन गटांतील युवकांमध्ये झालेल्या वादातून जाळपोळ करण्यात आली का, या शक्यतेचाही पोलीस आणि अग्निशमन दलाकडून तपास केला जात आहे. आगीचे नेमके कारण आणि नुकसानीचा अंतिम आकडा चौकशीनंतर स्पष्ट होणार आहे.

महापौरांकडून घटनास्थळाची पाहणी

या घटनेनंतर महापौर मंजुषा नागपूर यांनी महापालिकेतील पदाधिकाऱ्यांसह टिंबर मार्केट परिसराला भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली. गेल्या आठ वर्षांत टिंबर मार्केटमध्ये आगीची ही तिसरी मोठी घटना असल्याने व्यापाऱ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

आठ वर्षांत तिसऱ्यांदा आगीची घटना

पुण्यातील टिंबर मार्केट परिसर फर्निचर, लाकूड आणि प्लायवूडच्या व्यवसायासाठी प्रसिद्ध आहे. मात्र, या भागात वारंवार आगीच्या घटना घडत असल्याने व्यापारी आणि रहिवाशांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. यापूर्वीही या परिसरात आगीच्या मोठ्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे भविष्यात अशा दुर्घटना टाळण्यासाठी अग्निसुरक्षा उपाययोजना अधिक प्रभावी करण्याची गरज व्यक्त होत आहे.

 

 


 Give Feedback



 जाहिराती