सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • नर्तिकेवर एकापाठोपाठ एक कोऱ्या करकरीत नोटा उधळल्या, गर्दीतून 'सातबारा कोरा होईल'ची हाक, राष्ट्रवादीच्या नेत्याचा व्हिडीओ व्हायरल
 शहर

पुण्यातील भिडे पूल वाहतुकीसाठी बंद; मेट्रोच्या कामामुळे वाहनचालकांची कोंडी, जाणून घ्या पर्यायी मार्ग

डिजिटल पुणे    18-11-2026 12:40:53

पुणे : पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी आहे. मुठा नदीवरील भिडे पूल वाहनांच्या वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. डेक्कन जिमखाना मेट्रो स्थानकाला पेठ परिसराशी जोडण्यासाठी या पुलाच्या वर नवीन पादचारी पूल उभारण्यात येणार आहे. या बांधकामामुळे भिडे पुलावरील वाहतूक बंद ठेवण्याचा निर्णय महामेट्रोकडून घेण्यात आला आहे. त्यामुळे या मार्गाने प्रवास करणाऱ्या वाहनचालकांना आता पर्यायी रस्त्यांचा वापर करावा लागणार आहे.

१९ नोव्हेंबरपासून कामाला सुरुवात; वाहतूक बंदी लागू

महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशनच्या माहितीनुसार, नवीन पादचारी पुलाचे काम १९ नोव्हेंबरपासून सुरू होणार असून, ३१ डिसेंबरपर्यंत भिडे पुलावरील वाहतूक बंद ठेवण्याचे नियोजन आहे. मात्र, पुणे वाहतूक पोलिसांनी दिलेल्या सूचनेनुसार, १७ नोव्हेंबर रोजी रात्री ११ वाजल्यापासूनच या पुलावरील वाहतूक बंद करण्यात आली आहे. पुढील आदेश मिळेपर्यंत ही बंदी कायम राहणार आहे.

मेट्रो स्थानकापर्यंत पोहोचणे होणार सोपे

डेक्कन जिमखाना मेट्रो स्थानक आणि पेठ परिसर यांच्यातील प्रवास अधिक सुलभ करण्यासाठी भिडे पुलाच्या वर नवीन पादचारी पूल बांधला जाणार आहे. या सुविधेचा नारायण पेठ, शनिवार पेठ आणि लक्ष्मी रस्ता परिसरातील नागरिकांना मोठा फायदा होणार आहे. सध्या या भागातील नागरिकांना मेट्रो स्थानकापर्यंत जाण्यासाठी रस्त्यांचा आधार घ्यावा लागतो. मात्र, नवीन पूल पूर्ण झाल्यानंतर मेट्रोपर्यंत पोहोचणे अधिक सोयीचे होणार आहे.या कामादरम्यान भिडे पुलावरील वाहनांची वाहतूक बंद असली, तरी नदीपात्रातून जाणारा रस्ता सुरू ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे नागरिकांना पर्यायी मार्गांचा वापर करून प्रवास करता येणार आहे.

वाहनचालकांसाठी कोणते आहेत पर्यायी मार्ग?

भिडे पूल परिसरातून डेक्कनच्या दिशेने जाणाऱ्या वाहनचालकांसाठी वाहतूक पोलिसांनी पुढील पर्याय उपलब्ध करून दिले आहेत.

1. पहिला मार्ग : टिळक चौक – खंडोजी बाबा चौक – डेक्कन.

2. दुसरा मार्ग : नदीपथ – जयंतराव टिळक पूल – गद्रे हॉटेल चौक.

3. तिसरा मार्ग : केळकर रस्ता – ओंकारेश्वर पूल – शास्त्रीराणी चौक.

4. चौथा मार्ग : टिळक चौक – शास्त्री रस्ता – एस. एम. जोशी पूल.

डेक्कन बसस्थानकाकडून येणाऱ्या वाहनांसाठीही बदल

डेक्कन पीएमटी बसस्थानकाकडून केळकर रस्ता आणि नारायण पेठेकडे जाणाऱ्या वाहनांची वाहतूक टिळक चौक आणि खंडोजी बाबा चौक या मार्गाने वळवण्यात येणार आहे.दरम्यान, भिडे पुलावरील वाहतूक बंद असल्याने परिसरात वाहतुकीचा ताण वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे वाहनचालकांनी घराबाहेर पडण्यापूर्वी प्रवासाचे नियोजन करावे आणि वाहतूक पोलिसांनी निश्चित केलेल्या पर्यायी मार्गांचा वापर करावा, असे आवाहन महामेट्रो आणि वाहतूक पोलिसांकडून करण्यात आले आहे.

 

 


 Give Feedback



 जाहिराती