सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • नर्तिकेवर एकापाठोपाठ एक कोऱ्या करकरीत नोटा उधळल्या, गर्दीतून 'सातबारा कोरा होईल'ची हाक, राष्ट्रवादीच्या नेत्याचा व्हिडीओ व्हायरल
 शहर

पुण्यात २७, २८, २९ नोव्हेंबरला ‘फुले फेस्टिवल’ ;शरद पवार करणार उद्घाटन

डिजिटल पुणे    18-11-2026 14:34:11

पुणे : महात्मा ज्योतिराव फुले यांच्या जन्मद्विशताब्दी वर्षानिमित्त राष्ट्र सेवा दलाच्या वतीने दि.२७, २८ आणि २९ नोव्हेंबर २०२६ रोजी पुण्यातील गणेश कला क्रीडा रंगमंच, स्वारगेट येथे ‘फुले फेस्टिवल’चे आयोजन करण्यात आले आहे. 

शुक्रवार, दि.२७ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ४ वाजता महोत्सवाचे उद्घाटन ज्येष्ठ नेते आणि खासदार शरद पवार यांच्या हस्ते होणार आहे. राष्ट्र सेवा दलाचे अध्यक्ष अजित शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली होणार्‍या या समारंभास डॉ. गणेश देवी,  अभिनेते अतुल कुलकर्णी, श्री बृहद भारतीय समाजाचे अध्यक्ष श्रीपाद हळबे, माजी मराठी नाट्य संमेलनाध्यक्ष फैयाज शेख, वंचित बहुजनांच्या नेत्या अंजलीताई आंबेडकर, समाजवादी नेते कपिल पाटील, समाजवादी नेते राजकुमार भाटी, जेएनयूचे प्राध्यापक शरद बावीस्कर,  माजी साहित्य संमेलनाध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख, आरोग्य सेनेचे अध्यक्ष डॉ. अभिजीत वैद्य आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

राष्ट्र सेवा दलाचे राज्य अध्यक्ष राजा कांदळकर,साहित्यिक लक्ष्मीकांत देशमुख, राष्ट्र सेवा दलाचे राष्ट्रीय अध्यक्ष  अजित शिंदे,विश्वस्त जाकीर आतार,राखी रासकर  यांनी श्रमिक पत्रकार संघ, पुणे येथे झालेल्या पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. विद्रोही साहित्यावर चर्चा, पुस्तक जत्रा, प्रकाशने,  प्रगतीशील लेखक भेटी, शिक्षक साहित्य संमेलन, अंनिस दालनात जादूचे प्रयोग,२०० लोक कलावंतांचे सादरीकरण, लयलूट खाद्य संस्कृतीची हे फेस्टिवलचे विशेष आकर्षण असेल. 

श्री बृहद भारतीय समाज, मुंबई हे सहआयोजक तर एमआयटी स्कूल ऑफ गव्हर्नमेंट हे नॉलेज पार्टनर आहेत. माणदेशी फाउंडेशन, ५० प्रकाशन संस्था, छात्र भारती, शिक्षक भारती आणि एचएमकेपी या संस्थाही सहआयोजक म्हणून सहभागी आहेत. जेन झी अन् जेन अल्फासाठी विशेष दालनं हे या फेस्टिवलचे आकर्षण असणार आहे.

रघुवीर खेडकर, सुरेखा पुणेकर, पृथ्वीराज माळी यांचा महाजलसा -

कला, साहित्य, संस्कृती, विचार, संगीत आणि सामाजिक प्रबोधन यांचा अनोखा संगम असलेल्या या तीन दिवसीय महोत्सवात विविध वैचारिक, सांस्कृतिक आणि मनोरंजनात्मक कार्यक्रमांची मेजवानी पुणेकरांना अनुभवता येणार आहे. महात्मा फुले यांच्या सत्यशोधक विचारांचा जागर करणे, नव्या पिढीपर्यंत परिवर्तनवादी विचार पोहोचवणे आणि विविध कलाप्रकारांना मंच उपलब्ध करून देणे हा या महोत्सवाचा उद्देश आहे. फेस्टिवलच्या पहिल्या दिवशी सायंकाळी ७:३० वाजता ‘महाजलसा-लोकलावंतांची संगीतबारी ’ हा लोककलावंतांच्या संगीताचा विशेष कार्यक्रम सादर होणार आहे. यामध्ये महाराष्ट्रातील लोकसंगीत आणि लोककलांचे विविध रंग अनुभवता येतील. रघुवीर खेडकर, सुरेखा पुणेकर, कडुबाई खरात, चंदन कांबळे, शीतल साठे, सचिन माळी, देवानंद माळी, पृथ्वीराज माळी, सदाशिव निकम, प्रकाश फरांदे आदी सहभागी होतील .

फुले वॉक -

शनिवार, २८ नोव्हेंबर रोजी सकाळी साडे नऊ वाजता ‘फुले वॉक’चे आयोजन करण्यात आले असून, भिडे वाडा ते फुले वाडा असा फुले वॉक काढण्यात येणार आहे. महात्मा फुले यांच्या कार्याचा आणि सामाजिक परिवर्तनाच्या इतिहासाचा परिचय करून देणारा हा उपक्रम असेल.शनिवारच्या कार्यक्रमांमध्ये विचार, साहित्य आणि कलात्मक अभिव्यक्तीला विशेष स्थान देण्यात आले आहे.

विचार संगीती -

शनिवार,२८ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ४ वाजता ‘विचार संगीती’ हा कार्यक्रम होणार असून, प्रकाश आंबेडकर, भालचंद्र कांगो, नीरज हातेकर, शमशुल इस्लाम, राजकुमार भाटी, जितेंद्र मीणा आणि लक्ष्मण यादव आदी मान्यवर सहभागी होणार आहेत. सायंकाळी ५.३० वाजता युवकांसाठी ‘यंग सोशलिस्ट संमेलन’ आयोजित करण्यात आले आहे. यामध्ये सुजाता आंबेडकर, प्रियंका भारती, अनिश गवांदे, कांचन यादव आणि मोहम्मद इरफान सहभागी होतील. रात्री ७.३० वाजता पद्मश्री प्रल्हाद तिपाणीया आणि सहकारी यांचा ‘कबीरवाणी’ हा विशेष सांगीतिक कार्यक्रम सादर होणार आहे.

साहित्य उत्सव –

रविवार, २९ नोव्हेंबर रोजी सकाळी ११ वाजता साहित्य उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. राजन गवस अध्यक्षस्थानी असणार आहेत. दामोदर मावजो, हुबनाथ पांडे, प्रतिमा परदेशी, इंदुमती जोंधळे, लक्ष्मीकांत देशमुख, भारत सासणे, प्रवीण बांदेकर, अरुण म्हात्रे, बच्चालाल ‘उन्मेष’, आशालता कांबळे सहभागी होणार असून, साहित्य आणि सामाजिक परिवर्तनाच्या परस्परसंबंधांवर चर्चा होणार आहे. रात्री ७.३० वाजता ‘द रॉक्सन सभा’ हा रॉक्सन अँड टीमचा संगीत कार्यक्रम महोत्सवाचा समारोप अधिक रंगतदार करणार आहे.

विद्रोही, प्रगतीशील आकर्षक दालने –

तीन दिवसांच्या महोत्सवात साहित्य, कला आणि सामाजिक विचारांच्या विविध प्रवाहांना एकत्र आणणारे अनेक विशेष उपक्रमही आयोजित करण्यात आले आहेत. पुस्तक महोत्सवात ५० पुस्तक दालने असणार आहेत. याशिवाय  खाद्यसंस्कृती, व्यंगचित्र संमेलन, प्रगतीशील लेखक संघ, काव्य फुले, बुक फेस्टिव्हल, विद्रोही साहित्य दालन, जेन अल्फा खेळणी आणि कलासूत्री, जेन झी चित्रपट व डॉक्युमेंटरी स्क्रीनिंग, मुक्त शब्द, एकांकिका आणि समूह नृत्य, संशोधन पेपर सादरीकरण,  Quest फाऊंडेशन, एकलव्य इंडिया फाउंडेशन अशा विविध उपक्रमांचा समावेश आहे. शिक्षक साहित्य संमेलन, नारायण मेघाजी लोखंडे कामगार संमेलन, डॉ. नरेंद्र दाभोलकर दालन, डॉ. बाबा आढाव दालन तसेच एमपीएससी आणि यूपीएससी परीक्षार्थींसाठी तज्ज्ञांचे मार्गदर्शन असेही उपक्रम महोत्सवात होणार आहेत.

शिक्षक संमेलन -

शिक्षक साहित्य संमेलनाचे अध्यक्ष दासू वैद्य असतील उदघाटक विश्वास पाटील असतील . त्यामुळे विद्यार्थी, युवक, साहित्यप्रेमी, कलाकार, संशोधक आणि सामाजिक चळवळीतील कार्यकर्त्यांसाठी हा महोत्सव विशेष पर्वणी ठरणार आहे.तिन्ही दिवस एकलव्य इंडिया तर्फे हायर एज्युकेशन, ग्लोबल ऑपोरचुनिटीज वर राजू केंद्रे, भारती चौधरी मार्गदर्शन करतील. डॉ. झहीर काझी, राहुल कराड, आबेदा इनामदार, चेतना सिन्हा, डॉ. अभिजित वैद्य, सुभाष माळगी, डॉ. सुधीर तांबे, प्रकाश बाळ जोशी, ज्ञानेश महाराव, महेश झगडे, हमीद दाभोलकर, भंवर मेघवंशी, जी.के.ऐनापुरे, संजय सोनवणी, किशोर ढमाले, सुभाष वारे, विनोद शिरसाठ, सर्फराज अहमद, सुनील सरदार, अरुण खोरे, अशोक बेलसरे, प्रकाश होळकर, शारदा वाडेकर, सायमन मार्टिन, इंद्रजित भालेराव, परिमल माया सुधाकर, सुरेंद्र जोंधळे, समर खडस, कामिल पारखे, हेरंब कुलकर्णी, श्रद्धा कुंभोजकर, एस.व्ही.फेणे हे अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत. महोत्सवाला विविध सामाजिक, शैक्षणिक आणि सांस्कृतिक संस्थांचे सहकार्य लाभले आहे. महात्मा फुले यांच्या सत्यशोधक, समतावादी आणि परिवर्तनवादी विचारांचा उत्सव साजरा करण्याबरोबरच कला, साहित्य, संगीत आणि नव्या पिढीच्या सर्जनशीलतेला एकत्र आणणारा हा महोत्सव पुण्याच्या सांस्कृतिक विश्वात एक महत्त्वपूर्ण पर्व ठरणार आहे. या महोत्सवात सर्वांनी सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.

संशोधक विद्यार्थी व प्राध्यापकांसाठी -

देशभरातील विद्यापीठातील संशोधक विद्यार्थी व प्राध्यापकांची 'फुले @ 200' ही कॉन्फरन्स MIT च्या सहयोगाने होणार आहे. जवळपास ४० रिसर्च पेपर यात सादर होणार असून डॉ. गणेश देवी, डॉ. शरद बावीस्कर हे यासाठी प्रमुख मार्गदर्शक असणार आहेत. संयोजक म्हणून MIT SOG चे संचालक डॉ. परिमल माया सुधाकर  आणि राष्ट्र सेवा दलाचे राष्ट्रीय सचिव डॉ. सागर भालेराव हे काम बघत आहेत.  

 

 


 Give Feedback



 जाहिराती