ओतूर,पुणे : महात्मा फुले यांनी सुरू केलेल्या ऐतिहासिक शाळेचा वारसा लाभलेल्या ओतूर (जि. पुणे) येथे सत्यशोधक भाऊ कोंडाजी डुंबरे पाटील प्रतिष्ठान (ओतूर) यांच्या वतीने महात्मा फुले यांच्या जन्मद्विशताब्दी वर्षानिमित्त राज्यव्यापी विशेष सत्यशोधक अधिवेशन - २०२६ चे आयोजन करण्यात आले आहे. हे अधिवेशन शनिवार, दि.२१ व रविवार दि.२२ नोव्हेंबर २०२६ रोजी सत्यशोधक नगरी (मार्केट यार्ड, ओतूर, ता.जुन्नर, जि.पुणे) येथे होणार आहे. अधिवेशनाचे उदघाटन ज्येष्ठ नेते शरदचंद्र पवार यांच्या हस्ते होणार असून अध्यक्ष म्हणून खासदार शाहू महाराज, कोल्हापूर उपस्थित राहणार आहेत. महात्मा जोतीराव फुले, ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आणि सत्यशोधक भाऊ कोंडाजी पाटील डुंबरे यांच्या प्रतिमांची मिरवणूक, अर्धपुतळ्यांचे अनावरण, कष्टकरी प्रतिनिधी स्त्री व पुरुष श्रमिकांचा सत्कार, सत्यशोधकांच्या विद्यमान वंशजांचा विशेष सत्कार, सत्यशोधक परिसंवाद सत्र, सांस्कृतिक कार्यक्रम, महानाट्य, लघुनाटिका सादरीकरण अशा अनेक कार्यक्रमांचे आयोजन या अधिवेशनादरम्यान करण्यात आले आहे.
पहिल्या दिवशी उदघाटन, परिसंवाद, मिरवणूक आणि सांस्कृतिक कार्यक्रम
शनिवार दि. २१ नोव्हेंबर रोजी सकाळी ९ ते १० महात्मा जोतीराव फुले, सावित्रीबाई फुले व भाऊ कोंडाजी डुंबरे पाटील यांच्या अर्धपुतळ्यांचे अनावरण होणार आहे. हा कार्यक्रम महात्मा फुले यांनी सुरू केलेल्या ऐतिहासिक वारसा असलेल्या जि. प. प्राथ. शाळा नं. २, ओतूर या मूळ शाळेत होणार आहे. यानंतर सत्यशोधक महात्मा जोतीराव फुले, ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आणि सत्यशोधक भाऊ कोंडाजी पाटील डुंबरे यांच्या प्रतिमांची मिरवणूक काढण्यात येणार असून सर्व मंडळी मिरवणुकीने मुख्य व्यासपीठ, सत्यशोधक नगरी मार्केट यार्ड येथे दाखल होतील. या मिरवणुकीत लेझिम पथक, पथनाट्य सादर होतील. सकाळी ११ ते १ या वेळेत सत्यशोधक अधिवेशनाचा उद्घाटन सोहळा ज्येष्ठ नेते शरदचंद्र पवार यांच्या शुभहस्ते होणार असून अध्यक्ष म्हणून शाहू महाराज, खासदार, कोल्हापूर असणार आहेत. यावेळी स्थानिक कष्टकरी प्रतिनिधी स्त्री व पुरुष श्रमिकांचा सत्कार करण्यात येणार आहे. याप्रसंगी मंत्री महोदय छगन भुजबळ, बाळासाहेब थोरात, दिलीप वळसे -पाटील, खासदार डॉ. अमोल कोल्हे, उत्तम पाटील, शरद सोनवणे, डॉ. किरण लहामटे, दिलीप ढमढेरे, सुधीर तांबे, बाळासाहेब दांगट, अतुल बेनके, सत्यशील शेरकर, बाळासाहेब जाधव, संजय काळे, शमसुद्दीन तांबोळी, उल्हास पवार, किशोर दांगट, डॉ. मंगेश आमले, डॉ. सदानंद राऊत, बापूसाहेब भुजबळ यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. सूत्रसंचालन दत्ता बाळसराफ करणार असून आभार विशाल तांबे मानणार आहेत.
दुपारी २ ते ४ वाजता सत्यशोधक परिसंवाद सत्र दुसरे होणार असून विषय 'फुले आणि आजच्या शिक्षणाची दशा व दिशा' हा आहे. अध्यक्ष प्रा. डॉ. उमेश बगाडे असतील तर प्रमुख वक्ते म्हणून प्रा. डॉ. शरद बाविस्कर, प्रा. डॉ. श्रद्धा कुंभोजकर, किशोर दरक, प्रा. डॉ. सुधाकर शेलार उपस्थित राहणार आहेत. सूत्रसंचालन प्रा. भाऊसाहेब चासकर तर आभार हिरालाल पगडाल मानणार आहेत. दुपारी ४ ते ६ वाजता 'फुले आणि महिला सक्षमीकरण, समानतेचा नवा संघर्ष' या विषयावर परिसंवाद होणार आहे. या परिसंवादाचे अध्यक्ष ज्येष्ठ साहित्यिक उत्तम कांबळे असतील तर प्रमुख वक्ते म्हणून प्रगती बाणखेले, आनंद शितोळे, ॲड. निशा शिवूरकर, प्रा. धम्मसंगिनी उपस्थित राहणार आहेत. सूत्रसंचालन व आभार प्रा. डॉ. विजय भगत मानणार आहेत. संध्याकाळी ६ वाजता महानाट्य 'ज्योतीबाची सावली, सावित्री माऊली' हे सादर होणार असून निर्मिती, दिग्दर्शन, लेखन अपूर्वा सोनार यांचे आहे.
दुसऱ्या दिवशी शेतकरी प्रश्न आणि महाराष्ट्र धर्मावर मंथन
रविवार दि. २२ नोव्हेंबर रोजी सकाळी ९.३० ते ११.३० वाजता 'किर्तावनी: वारी आडवाटंच्या विठोबाची' हा संत नामदेव ते साने गुरुजी यांच्यापर्यंत अभंगातून प्रबोधनात्मक विचार मांडणारा कार्यक्रम होणार असून लेखन व दिग्दर्शन ऋचिका खोत तर संशोधन सहाय्य स्वामीराज भिसे यांचे आहे. सकाळी ११.३० ते १२ वाजता लघु नाटिका 'ओतूर अभियोग, खटला' हे सादर होणार असून निवेदन व संयोजन सुभाष वारे यांचे आहे.दुपारी १२ ते १ वाजता सत्यशोधकांच्या विद्यमान वंशजांचा विशेष सत्कार ज्येष्ठ लोकसाहित्यक मा. रा. लामखडे, निर्मलकुमार देशमुख यांच्या हस्ते होणार आहे. निवेदन व संयोजन के. ई. हरदास यांचे आहे. दुपारी २ ते ४ वाजता 'फुले आणि वर्तमानातील शेतकऱ्यांसमोरील आव्हाने' या विषयावर परिसंवाद होणार असून अध्यक्ष ज्येष्ठ शेतकरी नेते राजू शेट्टी असतील तर प्रमुख वक्ते म्हणून काॅम्रेड डॉ. अजित नवले, अविनाश पाटील, अरविंद खैरनार, विद्यार्थी संघटक विवेकानंद पाटील, कोल्हापूर हे उपस्थित राहणार आहेत. सूत्रसंचालन व आभार प्रा. डॉ. शिवाजीराव एंडाईत मानणार आहेत.
दुपारी ४ ते ६ वाजता सत्यशोधक समारोप सत्र होणार असून विषय 'महाराष्ट्रधर्म : मुक्त चिंतन' हा आहे. अध्यक्ष संजय आवटे, संपादक लोकमत, पुणे असतील तर प्रमुख वक्ते म्हणून प्रा. डॉ. दीपक पवार, मा. रा.लामखडे उपस्थित राहणार आहेत. सूत्रसंचालन व आभार राजाभाऊ आवसक मानणार आहेत. दुपारी ६ ते ६.३० वाजता समारोप माजी न्यायमूर्ती बी. जी. कोळसे -पाटील यांच्या उपस्थितीत होणार आहे. आभार प्रा. दत्ता जाधव मानणार आहेत. संध्याकाळी ७ ते ९ वाजता 'खेळ मांडियला' हे संत तुकाराम महाराज यांच्या जीवनावरील महानाटक सादर होणार असून लेखक डॉ. सोमनाथ मुटकुळे तर सादरकर्ते शांती फाउंडेशन, संगमनेर आहेत.
या अधिवेशनासाठी विदर्भ, मराठवाडा, खानदेशातून दोन्ही दिवस दीड दोन हजार सत्यशोधक उपस्थित राहणार असून त्यांची निवासाची सोय विघ्नहर देवस्थान ओझर, लेण्याद्री देवस्थान येथे करण्यात आली आहे. तसेच विविध संस्थाच्या माध्यमातून या सत्यशोधकांची भोजनाची व्यवस्था केली आहे.