सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • सरकारचा मोठा निर्णय! दुष्काळग्रस्त भागातील अनावश्यक कामांना ब्रेक, टंचाईग्रस्त गावांमध्ये पाणी पुरवठ्यावर भर देण्याचे आदेश
  • पंढरपुरात एकनाथ शिंदेंच्या हेलिकॉप्टरमध्ये अचानक बिघाड; २५ मिनिटं प्रतीक्षा, अखेर प्रवासाचा प्लॅन बदलला!
  • मोठी बातमी ! महायुतीची सत्ता येताच इतिहासातील सर्वात मोठी दूध दरवाढ; गोकुळचं दूध 6 रुपयांनी महागलं
  • मोठी बातमी, पीएफ खात्यातून 90 टक्के रक्कम काढता येणार, नव्या SWP ला मान्यता, ईपीएफओच्या CBT चा मोठा निर्णय
  • अखेर शायना एनसींनी माफी मागितली, भलीमोठी पोस्ट करत म्हणाल्या, 'माझ्या कृतीचा आणि वक्तव्याचा जाणीवपूर्वक विपर्यास'
 क्राईम

इन्स्टाग्रामवरील मैत्री पडली महागात! पिस्तूल खरेदीसाठी गोव्यातून पुण्यात आले, पण पोलिसांनी चौघांना पकडलं

डिजिटल पुणे    19-11-2026 16:38:15

पुणे : सोशल मीडियावर झालेली ओळख आणि त्यातून ठरलेला पिस्तूल खरेदीचा व्यवहार पोलिसांच्या कारवाईमुळे उधळला गेला आहे. गोव्यातून दुचाकीवरून पुण्यात आलेल्या तरुणांसह चौघांना वाघोली पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून चार देशी बनावटीची पिस्तुले, चार मॅगझिन आणि १५ जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली आहेत. जप्त केलेल्या मुद्देमालाची एकूण किंमत ४ लाख १८ हजार ५०० रुपये असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आकाश उर्फ गज्या अशोक मोरे, मनीष दिलीप फर्नांडिस आणि चंद्रेश्वर माल्लेशी अशी आहेत. याशिवाय एका अल्पवयीन मुलालाही या प्रकरणात ताब्यात घेण्यात आले आहे.

वाघोली पोलिसांचे पथक केसनंद परिसरात गस्त घालत असताना पोलीस अंमलदार प्रदीप मोटे यांना जोगेश्वरी डोंगराकडे जाणाऱ्या रस्त्यावर काही जण पिस्तूल घेऊन येणार असल्याची माहिती मिळाली. या माहितीच्या आधारे पोलिसांनी तत्काळ हालचाली करत संबंधित परिसरात सापळा रचला. संशयित चौघे घटनास्थळी पोहोचताच पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. त्यांची झडती घेतली असता चार पिस्तुले, चार मॅगझिन आणि १५ जिवंत काडतुसे आढळून आली.

सोशल मीडियावरील फोटो पाहून गोव्यातील तरुण संपर्कात

या प्रकरणातील आकाश मोरे हा यापूर्वीही शस्त्रांशी संबंधित गुन्ह्यांमध्ये सहभागी असल्याची माहिती समोर आली आहे. त्याच्यावर पिस्तूल बाळगणे तसेच खरेदी-विक्रीचे गुन्हे दाखल आहेत. तो सोशल मीडियावर हातात पिस्तूल घेतलेले फोटो आणि व्हिडिओ पोस्ट करत असे. हे फोटो पाहून गोव्यातील दोन तरुण त्याच्या संपर्कात आले. त्यानंतर इन्स्टाग्रामवरून त्यांच्यात संवाद वाढला आणि पिस्तूल खरेदी करण्याबाबत चर्चा सुरू झाली.एका देशी बनावटीच्या पिस्तुलासाठी सुमारे ५० हजार रुपये देण्याचे ठरल्याची माहिती तपासात समोर आली आहे. हा व्यवहार पूर्ण करण्यासाठी गोव्यातील तरुण पुण्यात येण्याच्या तयारीला लागले.

सीमेवरील तपासणी टाळण्यासाठी दुचाकीने प्रवास

महाराष्ट्र आणि गोवा सीमेवरील तपासणी नाक्यांवर खासगी वाहने तसेच बसची तपासणी केली जात असल्याने पोलिसांचा संशय टाळण्यासाठी या तरुणांनी दुचाकीवरून पुण्याला येण्याचा मार्ग निवडला. त्यानुसार ते गोव्याहून पुण्यात दाखल झाले. केसनंद परिसरात चौघांची भेट झाली; मात्र पिस्तूल खरेदी-विक्रीचा व्यवहार पूर्ण होण्याआधीच वाघोली पोलिसांनी त्यांच्यावर कारवाई केली.

इन्स्टाग्रामवरील ओळखीच्या माध्यमातून सुरू झालेला हा शस्त्रव्यवहार पोलिसांच्या सतर्कतेमुळे उघडकीस आला. या पिस्तुलांचा पुरवठा कुठून झाला आणि या प्रकरणात आणखी कोणाचा सहभाग आहे, याचा तपास वाघोली पोलीस करत आहेत.

 

 

 


 Give Feedback



 जाहिराती