पंढरपूर : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पंढरपूर दौऱ्यादरम्यान परतीच्या प्रवासात अचानक अडथळा निर्माण झाला. मुंबईला जाण्यासाठी हेलिपॅडवर पोहोचलेल्या शिंदे यांच्या हेलिकॉप्टरमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने काही काळ गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली. हेलिकॉप्टर सुरू करण्याचे अनेक प्रयत्न करूनही यश न मिळाल्याने त्यांना सुमारे २० ते २५ मिनिटे हेलिपॅडवर थांबावे लागले. अखेर अधिकाऱ्यांच्या सूचनेनंतर त्यांनी हेलिकॉप्टरऐवजी रस्तेमार्गे प्रवास करण्याचा निर्णय घेतला.
१९ नोव्हेंबर रोजी एकनाथ शिंदे कार्तिकी एकादशीच्या पार्श्वभूमीवर पंढरपूर दौऱ्यावर आले होते. यावेळी त्यांनी विठ्ठल-रुक्मिणी मंदिर परिसर आणि चंद्रभागा नदी परिसरातील व्यवस्थेची पाहणी केली. कार्तिकी वारीच्या नियोजनाचा आढावा घेतल्यानंतर ते मुंबईला रवाना होण्यासाठी हेलिपॅडवर दाखल झाले. मात्र, उड्डाणापूर्वीच हेलिकॉप्टरमध्ये तांत्रिक समस्या उद्भवली.
एक इंजिन सुरू, दुसरे सुरू होईना!
हेलिकॉप्टर सुरू करण्यासाठी पायलटकडून प्रयत्न करण्यात आले. यावेळी हेलिकॉप्टरचे एक इंजिन सुरू झाले, मात्र दुसरे इंजिन सुरू होण्यात अडचण येत होती. प्राथमिक माहितीनुसार, हेलिकॉप्टरच्या बॅटरीमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने ही समस्या निर्माण झाली. बॅटरी लो झाल्यामुळे हेलिकॉप्टर सुरू होत नसल्याचे सांगण्यात आले. तांत्रिक पथकाने बॅटरी चार्ज करून हेलिकॉप्टर सुरू करण्याचा प्रयत्न केला; मात्र त्यांना यश आले नाही. त्यामुळे बॅटरी बदलण्याची तयारीही करण्यात आली.
अखेर हेलिकॉप्टरचा प्रवास रद्द; कारने पुण्याकडे रवाना
हेलिकॉप्टरमधील बिघाड दूर होत नसल्याने हेलिपॅडवर उपस्थित असलेल्या पोलीस आणि जिल्हा प्रशासनाच्या अधिकाऱ्यांची धावपळ उडाली. सुरक्षेच्या दृष्टीने कोणताही धोका न पत्करता रस्तेमार्गे प्रवास करण्याची विनंती अधिकाऱ्यांनी एकनाथ शिंदे यांना केली. त्यानंतर त्यांनी हेलिकॉप्टरने जाण्याचा निर्णय बदलला.
अखेर एकनाथ शिंदे पंढरपूरहून कारने पुण्याच्या दिशेने रवाना झाले. पुण्यातून पुढील प्रवास विमानाने करून ते मुंबईला जाणार असल्याची माहिती समोर आली आहे.दरम्यान, हेलिकॉप्टर जमिनीवर असतानाच तांत्रिक बिघाड लक्षात आल्याने संभाव्य दुर्घटना टळली. मात्र, ऐन परतीच्या प्रवासावेळी उद्भवलेल्या या समस्येमुळे पंढरपूरमध्ये काही काळ प्रशासनाची मोठी धावपळ पाहायला मिळाली.
