अकोला : पैशांचा पाऊस पाडण्याचे आमिष, अघोरी पूजा आणि त्यातून तरुणाचा संशयास्पद मृत्यू... अकोल्यातून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. घरातून दोन दिवसांसाठी बाहेर पडलेल्या तरुणाचा मृतदेह थेट मध्य प्रदेशातील इंदूरमध्ये आढळल्याने खळबळ उडाली आहे. पैशांचा पाऊस पाडण्यासाठी मांत्रिकाच्या सांगण्यावरून आपल्या मुलाचा नरबळी देण्यात आल्याचा गंभीर आरोप मृत तरुणाच्या कुटुंबीयांनी केला आहे. हेमंत प्रफुल्ल सपकाळ असे मृत तरुणाचे नाव असून, या प्रकरणामुळे अंधश्रद्धा आणि भोंदूगिरीचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, हेमंत सपकाळ हा 12 नोव्हेंबर रोजी संध्याकाळी आपल्या घरातून बाहेर पडला होता. अमरावतीला जात असल्याचे त्याने कुटुंबीयांना सांगितले होते. यावेळी त्याच्यासोबत विवेक उर्फ विक्की शिंदे, अजय गायकवाड आणि आणखी एक व्यक्ती असल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. सुरुवातीला हेमंतचे कुटुंबीयांशी मोबाईलवरून नियमित बोलणे सुरू होते.
मात्र, 15 नोव्हेंबर रोजी परिस्थितीने गंभीर वळण घेतले. दुपारी कुटुंबीयांशी बोलताना हेमंतने दुसऱ्या दिवशी घरी परतणार असल्याचे सांगितले होते. परंतु, त्याच दिवशी संध्याकाळी त्याचा पुन्हा फोन आला. यावेळी त्याने आपला जीव धोक्यात असल्याचे सांगत, काहीजण आपल्याला मारण्याच्या तयारीत असल्याची भीती व्यक्त केली. आपण इंदूरमध्ये असल्याचेही त्याने कुटुंबीयांना सांगितले.
हेमंतने आपण संबंधित व्यक्तींपासून दूर असल्याचे सांगितले होते. मात्र, विवेक उर्फ विक्की त्याला पुन्हा फोन करून बोलावत असल्याचेही त्याने कळवले. कुटुंबीयांनी त्याला कुठेही जाऊ नकोस, असे सांगितले. त्यानंतर मात्र हेमंतचा मोबाईल बंद झाला. रात्री उशिरा कुटुंबीयांनी विक्कीशी संपर्क साधला असता, आपण रेल्वेमध्ये असून हेमंत मागील डब्यात असल्याचे त्याने सांगितल्याचा दावा तक्रारीत करण्यात आला आहे.
फोन सुरू केला अन् पलीकडून पोलिसांचा आवाज!
16 नोव्हेंबर रोजी सकाळी सुमारे 11 वाजता हेमंतचा मोबाईल पुन्हा सुरू झाला. कुटुंबीयांनी त्यावर संपर्क साधला असता, समोरून पोलिसांनी उत्तर दिले. हेमंतचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले आणि कुटुंबीयांना इंदूरमधील एम.जी. रोड पोलीस ठाण्यात येण्यास सांगण्यात आले. त्यानंतर कुटुंबीय इंदूरला पोहोचले. या संपूर्ण घटनाक्रमाची माहिती हेमंतच्या भावाने सिव्हिल लाईन पोलीस ठाण्यात दिलेल्या लेखी तक्रारीत नमूद केली आहे.
पैशांचा पाऊस पाडण्यासाठी नरबळी दिल्याचा आरोप
हेमंतच्या मृत्यूप्रकरणी विवेक उर्फ विक्की नामक मांत्रिकावर कुटुंबीयांनी गंभीर आरोप केले आहेत. पैशांचा पाऊस पाडण्याच्या उद्देशाने अघोरी पूजा करण्यात आली आणि त्याच पूजेदरम्यान हेमंतचा नरबळी देण्यात आल्याचा दावा कुटुंबीयांनी केला आहे. मात्र, या आरोपांची अद्याप अधिकृत पुष्टी झालेली नाही. पोलिस तपासातूनच मृत्यूमागील नेमके कारण स्पष्ट होणार आहे.
मांत्रिकाच्या अघोरी पूजेचे व्हिडिओ व्हायरल
या प्रकरणाला आणखी गंभीर वळण मिळाले आहे. विक्की नामक मांत्रिकाचे अघोरी पूजेशी संबंधित काही जुने व्हिडिओ समोर आले आहेत. या व्हिडिओंमध्ये तो पूजेदरम्यान लिंबू हवेत उडवण्याचा प्रकार करताना दिसत आहे. तसेच उपस्थित लोकांना घाबरून न जाण्याचे आवाहन करतानाही तो दिसतो. या व्हिडिओंमुळे परिसरात चर्चेला उधाण आले आहे.
अंधश्रद्धा निर्मूलन समितीकडून चौकशीची मागणी
या घटनेवर अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीने तीव्र संताप व्यक्त केला आहे. प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे. मांत्रिकांकडून लिंबू हवेत उडवणे यांसारख्या युक्त्या वापरून लोकांच्या मनात दैवी शक्ती असल्याचा भ्रम निर्माण केला जातो, असे समितीचे प्रवक्ते पुरुषोत्तम आवारे पाटील यांनी म्हटले आहे. अशा प्रकारांमागे हातचलाखी आणि तंत्रांचा वापर असण्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली.
दरम्यान, हेमंत सपकाळच्या मृत्यूमागील नेमके गूढ काय, त्याला इंदूरला नेण्यामागचा उद्देश काय होता आणि या प्रकरणात अघोरी पूजेचा काही संबंध आहे का, या सर्व प्रश्नांची उत्तरे आता पोलिस तपासातून समोर येणार आहेत. अकोला सिव्हिल लाईन पोलीस आणि इंदूर पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.
