पुणे : रात्रीच्या वेळी रस्त्यावरून जाणाऱ्या नागरिकाला अडवून शिवीगाळ व मारहाण करत जबरी चोरी करणाऱ्या आरोपीला येरवडा पोलिसांनी अटक केली आहे. रेहान अशफाक शेख (वय १९, रा. कळवड वस्ती, लोहगाव, पुणे) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. पोलिसांनी परिसरातील तब्बल ४० सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासून आरोपीचा शोध घेतला. त्याच्याकडून चोरीस गेलेला सॅमसंग कंपनीचा २० हजार रुपये किमतीचा मोबाईल फोन हस्तगत करण्यात आला आहे.
येरवडा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पुणे-नगर रस्त्यावर विमानतळाकडे जाणाऱ्या रस्त्यावर ही घटना घडली होती. दुचाकीवरून आलेल्या तीन अनोळखी इसमांनी फिर्यादी यांना कोणतेही कारण नसताना शिवीगाळ व मारहाण केली. त्यानंतर त्यांच्याकडील सॅमसंग कंपनीचा मोबाईल फोन, दोन ग्रॅम वजनाची सोन्याची अंगठी आणि रोख २९ हजार ६०० रुपये असा एकूण ५८ हजार ६०० रुपयांचा ऐवज जबरदस्तीने चोरून नेला होता.
या प्रकरणी ९ नोव्हेंबर २०२६ रोजी येरवडा पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता २०२३ च्या कलम ३०९(६), ३०९(४), १२६(२), ३५२ आणि ३(५) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी आरोपींना तातडीने ताब्यात घेण्याच्या सूचना दिल्या होत्या.त्यानुसार पोलीस उपायुक्त चिलुमुला रजनीकांत (परिमंडळ ४) आणि सहायक पोलीस आयुक्त सुनील जैतापूरकर (येरवडा विभाग) यांनी तपासाबाबत सूचना दिल्या. वरिष्ठ पोलीस निरीक्षक उमेश गिते यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकाने आरोपींचा शोध सुरू केला.
तपास पथकातील पोलीस अंमलदार गणेश पालवे, नटराज सुतार आणि संदीप जायभाये यांनी गुन्हा दाखल झाल्यानंतर घटनास्थळावरील तसेच परिसरातील एकूण ४० सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासले. सीसीटीव्ही फुटेजचे तांत्रिक विश्लेषण आणि गुप्त बातमीदारांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे गुन्ह्यातील आरोपी कळवड वस्ती, लोहगाव परिसरात राहत असल्याचे निष्पन्न झाले.
पोलिसांनी आरोपीच्या राहत्या पत्त्यावर जाऊन त्याला ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान त्याने आपले नाव रेहान अशफाक शेख, वय १९, रा. कळवड वस्ती, लोहगाव, पुणे असे सांगितले. दाखल गुन्ह्याबाबत चौकशी केली असता त्याने गुन्हा केल्याची कबुली दिली. त्यानंतर त्याला येरवडा पोलीस ठाण्यात आणून अटक करण्यात आली. आरोपीकडून फिर्यादी यांचा चोरीस गेलेला सॅमसंग कंपनीचा २० हजार रुपये किमतीचा मोबाईल फोन हस्तगत करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक किशोर बेरड करीत आहेत.
वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांची कामगिरी
ही कामगिरी पुणे शहराचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार, पोलीस सहआयुक्त संजय दराडे, अपर पोलीस आयुक्त मनोज पाटील, पूर्व प्रादेशिक विभागाचे पोलीस उपआयुक्त चिलुमुला रजनीकांत, परिमंडळ ४ चे पोलीस उपआयुक्त सुनील जैतापूरकर आणि येरवडा पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक उमेश गिते यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
या तपासात पोलीस निरीक्षक केशव दिंडे (गुन्हे), पोलीस निरीक्षक शारदा कोकाटे (गुन्हे), पोलीस उपनिरीक्षक किशोर बेरड, पोलीस हवालदार मुकुंद कोकणे, पोलीस अंमलदार गणेश पालवे, नटराज सुतार, शैलेश वाबळे, साईनाथ म्हस्के, अनिल मनाळकर, प्रशांत कांबळे, संदीप जायभाये, सोमनाथ गायकवाड आणि संदीप घाडवड यांनी सहभाग घेतला.
