सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • : महाराष्ट्रात थंडी जोर धरणार; पुढच्या ५ दिवसांचा हवामान अंदाज आला समोर, अक्वान चक्रीवादळाचा परिणाम नाही
  • टीम इंडियाचा 306 धावांनी विजय, नेपाळचा संघ 26 धावांवर बाद, प्रिन्स यादव, हर्षित राणाच्या गोलंदाजीसमोर नेपाळच्या फलंदाजीचा पालापाचोळा
  • सरकार आणि शिवसेना शेतकऱ्यांसोबत, कोणतंही वेडंवाकडं पाऊल उचलू नका; एकनाथ शिंदेंचं पंढरपुरातून आवाहन
 जिल्हा

एसटी चालकाला मारहाण करणाऱ्यांवर कठोर कारवाई करा

डिजिटल पुणे    21-11-2026 12:36:26

मुंबई : किरकोळ कारणावरून कर्तव्यावर असलेल्या एसटी चालकाला मारहाण केल्याच्या घटनेची परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी गंभीर दखल घेतली आहे. या प्रकरणातील संबंधित आरोपींवर तातडीने कठोर कारवाई करावी, असे निर्देश त्यांनी पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीप गिल यांना दिले.

रस्त्यावर हॉर्न वाजविल्याच्या कारणावरून काही गुंड प्रवृत्तीच्या व्यक्तींनी एसटी चालकाला मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. या घटनेबाबत तीव्र नाराजी व्यक्त करताना मंत्री सरनाईक म्हणाले, एसटीचे चालक आणि वाहक ऊन, पाऊस तसेच दिवस-रात्र यांची तमा न बाळगता लाखो प्रवाशांच्या सेवेसाठी कर्तव्य बजावत असतात. अशा कर्मचाऱ्यांवर हात उगारणाऱ्या प्रवृत्तींची गय केली जाणार नाही. एसटी कर्मचारी एकटे नाहीत. त्यांच्या सन्मानाला आणि सुरक्षिततेला धक्का पोहोचवणाऱ्या कोणत्याही प्रकारच्या गुंडगिरीला महामंडळ खपवून घेणार नाही. महामंडळ त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.

कर्तव्य बजावत असताना अशा प्रकारच्या घटनांना सामोरे जावे लागणाऱ्या कर्मचाऱ्यांनी घाबरून न जाता अथवा कोणत्याही दबावाखाली न येता तातडीने एसटी महामंडळाच्या मुख्यालयाशी संपर्क साधावा. त्यांना महामंडळाकडून आवश्यक ते सर्व सहकार्य करण्यात येईल, अशी ग्वाहीही मंत्री सरनाईक यांनी दिली.

गणवेश परिधान करून शासकीय कर्तव्य बजावणाऱ्या कर्मचाऱ्याला मारहाण करणे ही गंभीर बाब असून, अशा घटनांमुळे कर्मचाऱ्यांचे मनोधैर्य खच्ची होते. सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सुरळीत ठेवण्यासाठी अहोरात्र कार्यरत असलेल्या चालक आणि वाहकांची सुरक्षितता सुनिश्चित करणे आवश्यक आहे, असेही त्यांनी नमूद केले.

या प्रकरणाची सखोल चौकशी करून संबंधित आरोपींविरुद्ध लागू कायदेशीर तरतुदींनुसार गुन्हे दाखल करावेत. तसेच दोषींवर कठोर कारवाई करून अशा घटनांची पुनरावृत्ती होणार नाही, याची दक्षता घ्यावी, असे निर्देशही मंत्री सरनाईक यांनी पोलीस प्रशासनाला दिले.

एसटीचे चालक आणि वाहक हे सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा महत्वाचा कणा आहेत. त्यांच्या कर्तव्यात अडथळा आणणे, त्यांना धमकावणे अथवा मारहाण करणे अशा प्रकारांना आळा बसणे आवश्यक आहे. एसटी कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेशी कोणतीही तडजोड केली जाणार नाही. प्रत्येक परिस्थितीत महामंडळ त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहील, असा ठाम निर्धार परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी व्यक्त केला.

 

 


 Give Feedback



 जाहिराती