पुणे : शहरातील वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी रस्ते आणि पदपथांवरील अतिक्रमणे हटविण्याचे स्पष्ट आदेश महापालिका आयुक्त नवलकिशोर राम यांनी दिले असतानाही, लक्ष्मी रस्त्यावरील कारवाईवरून महापालिका प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. अतिक्रमणे हटविण्याऐवजी विश्रामबाग क्षेत्रीय कार्यालय आणि आकाशचिन्ह विभागाने दुकानांच्या नामफलकांवरच कारवाई केल्याचा आरोप व्यापाऱ्यांनी केला आहे. या कारवाईत सुमारे ४० ते ५० दुकानांच्या दर्शनी भागांचे नुकसान झाल्याने व्यापाऱ्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. व्यापाऱ्यांच्या विरोधानंतर प्रशासनाला कारवाई थांबवून आठ दिवसांची मुदत द्यावी लागली.
महापालिका आयुक्तांनी रस्ते, पादचारी मार्ग, फ्रंट मार्जिन, साइड मार्जिन तसेच वाहतुकीला अडथळा ठरणारी सर्व अनधिकृत बांधकामे आणि अतिक्रमणे हटविण्याचे निर्देश दिले होते. मात्र, प्रत्यक्ष कारवाईदरम्यान वाहतुकीला अडथळा नसलेल्या दुकानांच्या नामफलकांनाच लक्ष्य करण्यात आल्याने व्यापाऱ्यांनी प्रशासनाच्या भूमिकेवर आक्षेप घेतला.
या प्रकरणावर महापौर मंजूषा नागपुरे यांनीही नाराजी व्यक्त केली आहे. आयुक्तांचे आदेश अतिक्रमणे हटविण्याबाबत स्पष्ट असताना केवळ दुकानांच्या नामफलकांवर कारवाई करून व्यापाऱ्यांना त्रास देणे चुकीचे असल्याचे त्यांनी सांगितले. या चुकीच्या कारवाईची दखल आयुक्त घेतील, असेही त्यांनी स्पष्ट केले. शहरातील अतिक्रमण हटविण्याची मोहीम मात्र सुरूच राहणार असल्याचे महापौरांनी नमूद केले.
शहरातील १६ ठिकाणी महापालिकेची कारवाई
दरम्यान, शुक्रवारी महापालिकेच्या आठ क्षेत्रीय कार्यालयांच्या माध्यमातून शहरातील १६ ठिकाणी अतिक्रमण हटविण्याची मोहीम राबविण्यात आली. औंध-बाणेर, कोंढवा-उंड्री, छत्रपती शिवाजीनगर-घोले रस्ता, धनकवडी-कात्रज-आंबेगाव, बिबवेवाडी, वानवडी, वारजे-कर्वेनगर आणि हडपसर-मांजरी या भागांत ही कारवाई करण्यात आली.
वारजे-कर्वेनगर क्षेत्रीय कार्यालयाने करिश्मा सोसायटी, जी. ए. कुलकर्णी पथ, सिटी प्राइड कोथरूड, शाहू कॉलनी आणि स्पेन्सर चौक परिसरातील अनधिकृत हॉटेल, दुकाने, शेड, काउंटर, ओटे आणि कट्टे हटविले. घोले रस्ता क्षेत्रीय कार्यालयाकडून कुसाळकर चौकात कारवाई करण्यात आली. तर धनकवडी-कात्रज-आंबेगाव परिसरात रस्त्यावरील फळविक्रेत्यांच्या पथाऱ्या, नाश्त्याचे टेबल आणि शेड हटविण्यात आले. इतर क्षेत्रीय कार्यालयांनीही रस्ते, पदपथ आणि इमारतींच्या फ्रंट मार्जिनमधील अतिक्रमणांवर कारवाई केली.
लक्ष्मी रस्त्यावरील व्यापाऱ्यांना आठ दिवसांची मुदत
शनिवारवाडा ते बेलबाग चौक आणि बेलबाग चौक ते गणपती चौक या मार्गावर विश्रामबागवाडा क्षेत्रीय कार्यालय, आकाशचिन्ह विभाग आणि बांधकाम विभागाने संयुक्तपणे मोहीम राबविली. यावेळी चार शेड हटविण्यात आल्या. आकाशचिन्ह विभागाने दुकानांच्या दर्शनी भागातून तीन ते चार फूट बाहेर आलेले नामफलक काढले. तसेच बांधकाम विभागाने तळमजल्यावरील अनधिकृत बांधकामांवर कारवाई केली.
व्यापाऱ्यांच्या विरोधामुळे कारवाई थांबविण्यात आल्याचा आरोप प्रशासनाने फेटाळला आहे. दुकानांचे नामफलक स्वतःहून हटविण्यासाठी व्यापाऱ्यांनी आठ दिवसांची मुदत मागितली असून, त्यानुसार त्यांना वेळ देण्यात आल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. आकाशचिन्ह विभागाचे कर्मचारी प्रत्येक दुकानात जाऊन पाहणी करणार असून, दुकानांची आवश्यक माहिती संकलित करणार आहेत, अशी माहिती विश्रामबागवाडा क्षेत्रीय कार्यालयाचे सहाय्यक आयुक्त राजेश गुर्रम यांनी दिली.
एकीकडे शहरातील अतिक्रमणांवर कठोर कारवाईचे आदेश, तर दुसरीकडे लक्ष्मी रस्त्यावरील कारवाईवरून निर्माण झालेला वाद यामुळे महापालिकेच्या अतिक्रमण मोहिमेच्या अंमलबजावणीवर आता प्रश्न उपस्थित होत आहेत.