ओतूर, पुणे : महात्मा फुले यांनी सुरू केलेल्या ऐतिहासिक शाळेचा वारसा लाभलेल्या ओतूर (जि. पुणे) येथे सत्यशोधक भाऊ कोंडाजी डुंबरे पाटील प्रतिष्ठान (ओतूर) यांच्या वतीने महात्मा फुले यांच्या जन्मद्विशताब्दी वर्षानिमित्त आयोजित राज्यव्यापी विशेष सत्यशोधक अधिवेशनाचे उद्घाटन माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते ,माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात,खासदार डॉ.अमोल कोल्हे यांच्या उपस्थितीत शनिवार, दि. २१ नोव्हेंबर २०२६ रोजी उत्साहात सत्यशोधक नगरी (मार्केट यार्ड, ओतूर, ता. जुन्नर, जि. पुणे) येथे झाले.अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी महात्मा जोतीराव फुले, ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आणि सत्यशोधक भाऊ कोंडाजी पाटील डुंबरे यांच्या प्रतिमांची मिरवणूक, अर्धपुतळ्यांचे अनावरण, कष्टकरी प्रतिनिधी स्त्री व पुरुष श्रमिकांचा सत्कार, सत्यशोधक परिसंवाद सत्र, सांस्कृतिक कार्यक्रम, महानाट्य असे विविध कार्यक्रम झाले.
'महात्मा फुले यांचे अमर जीवन','शिवनेरीचे वैभव' या पुस्तकांचे प्रकाशन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते झाले.संविधानाच्या प्रास्ताविकेचे सामूहिक वाचन करण्यात आले.उदघाटन प्रसंगी डॉ.सुधीर तांबे,खा.डॉ.अमोल कोल्हे,आमदार शरद सोनवणे,प्रा.शमसुद्दीन तांबोळी,अनिल तांबे,नरेंद्र डुंबरे,सुधाकर डुंबरे,नंदूशेठ भोर,संजय नलावडे,बापूसाहेब भुजबळ,संजय काळे,दुर्गा तांबे,सत्यशील शेरकर,माजी आमदार दिलीप ढमढेरे,सर्जेराव काळे,बाळासाहेब म्हेत्रे,तुषार थोरात,शरद बाविस्कर,निशा शिवूरकर,रामदास डुंबरे,विकास लवांडे आदी मान्यवर उपस्थित होते.शाहीर स्वप्नील गायकवाड यांनी पोवाडे सादर केले.सूत्रसंचालन दत्ता बाळसराफ यांनी केले ,आभार डॉ.विशाल तांबे यांनी मानले
उदघाटनप्रसंगी बोलताना माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ म्हणाले,'महात्मा जोतिराव फुले,सावित्रीबाई फुले हा आपला इतिहास आहे,त्यांनी समाजक्रांती केली.माणसाने माणसासारखे वागले पाहिजे हा तेव्हा प्रवाहाविरुद्धचा वाटणारा विचार महात्मा फुले यांनी आणला.त्यांच्या समतेच्या मार्गाने आपल्याला जावे लागणार आहे.महात्मा फुले यांचा विरोध ब्राह्मण्यवाद आणि अंधश्रद्धेला होता.मात्र,आजही महिला वर्ग अंधश्रद्धा पूर्णपणे सोडायला तयार नाहीत'.पुण्यात अथर्वशीर्ष म्हणणाऱ्या हजारो महिला तिथेच रस्त्यापलीकडे असलेल्या भिडे वाड्यातील मुलींच्या पहिल्या शाळेत मस्तक टेकवत नाहीत,अशी खंत भुजबळ यांनी व्यक्त केली.'आपला ऐतिहासिक संघर्ष सांगणाऱ्या डॉ.आंबेडकर,महात्मा फुले यांच्यावरील मालिका न पाहता प्रेक्षक वर्ग सासू-सून मालिका का पाहतात ? असा प्रश्न त्यांनी विचारला.सत्यशोधक समाजाच्या कार्यकर्त्यांची लढाई सोपी नाही,ती आंदोलनाने लढावी लागेल.क्रांतीचे स्फुल्लिंग ओतूर मध्ये फुलले,हे सर्वांसमोर यायला हवे.समतेचे चक्र फिरविण्यासाठी ताकद लावावी लागेल.कारण,हे चक्र उलटे फिरविण्याचा प्रयत्न सुरु आहे.आजही महिलांच्या शिक्षणाकडे लक्ष द्यावे लागणार आहे.महिलांना देवीच्या रूपात न लोटता बरोबरीचे स्थान आणि जबाबदाऱ्या द्याव्या लागणार आहेत.त्याशिवाय देश पुढे जाणार नाही.स्त्री-पुरुष समानता मानणारे देशच जगात पुढे गेले आहेत,हे विसरून चालणार नाही'.
माजी मंत्री बाळासाहेब थोरात म्हणाले,'देशाला सामर्थ्यवान करायचे असेल तर सत्यशोधक विचार आत्मसात करावा लागेल.बुद्ध,चार्वाक,वारकरी संप्रदाय यांनी विद्रोही विचार आणले.या विचारांची चळवळ केली पाहिजे.संविधान जपले पाहिजे.' खासदार डॉ.अमोल कोल्हे म्हणाले,'फुले दांपत्याचे विचार आचरणात आणण्यात महाराष्ट्र कमी पडला का हा विचार करण्याची गरज आहे.महाराष्ट्राला अजून महिला मुख्यमंत्री मिळू शकली नाही,याचाही विचार करायला हवा.कृपया,या विधानाला इतर संदर्भ जोडू नका,असेही स्पष्टीकरण त्यांनी दिले.इथून पुढे महाराष्ट्राने जातीच्या चौकटी,धर्माच्या पुष्पहारात न अडकता सत्यशोधक मार्ग पकडला पाहिजे,असे ते म्हणाले.'
पहिल्या दिवशी उद्घाटन, परिसंवाद, मिरवणूक आणि सांस्कृतिक कार्यक्रम
शनिवार दि. २१ नोव्हेंबर रोजी सकाळी ९ ते १० महात्मा जोतीराव फुले, सावित्रीबाई फुले व भाऊ कोंडाजी डुंबरे पाटील यांच्या अर्धपुतळ्यांचे अनावरण झाले. हा कार्यक्रम महात्मा फुले यांनी सुरू केलेल्या ऐतिहासिक वारसा असलेल्या जि. प. प्राथ. शाळा नं. २, ओतूर या मूळ शाळेत झाला. यानंतर सत्यशोधक महात्मा जोतीराव फुले, ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आणि सत्यशोधक भाऊ कोंडाजी पाटील डुंबरे यांच्या प्रतिमांची मिरवणूक काढण्यात आली असून सर्व मंडळी मिरवणुकीने मुख्य व्यासपीठ, सत्यशोधक नगरी मार्केट यार्ड येथे दाखल झाली. या मिरवणुकीत लेझिम पथक, पथनाट्य सादर झाले. सकाळी ११ ते १ या वेळेत सत्यशोधक अधिवेशनाचा उद्घाटन सोहळा झाला . यावेळी स्थानिक कष्टकरी प्रतिनिधी स्त्री व पुरुष श्रमिकांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ, बाळासाहेब थोरात, खासदार डॉ. अमोल कोल्हे, उत्तम पाटील, शरद सोनवणे, डॉ. किरण लहामटे, दिलीप ढमढेरे, सुधीर तांबे, सत्यशील शेरकर, बाळासाहेब जाधव, संजय काळे, शमसुद्दीन तांबोळी, , डॉ. मंगेश आमले, बापूसाहेब भुजबळ यांची प्रमुख उपस्थिती होती.
दुपारी २ ते ४ वाजता सत्यशोधक परिसंवाद सत्र दुसरे झाले असून विषय 'फुले आणि आजच्या शिक्षणाची दशा व दिशा' हा होता. अध्यक्ष प्रा. डॉ. उमेश बगाडे होते तर प्रमुख वक्ते म्हणून प्रा. डॉ. शरद बाविस्कर, प्रा. डॉ. श्रद्धा कुंभोजकर, किशोर दरक, प्रा. डॉ. सुधाकर शेलार उपस्थित होते. सूत्रसंचालन प्रा. भाऊसाहेब चासकर यांनी केले तर आभार हिरालाल पगडाल यांनी मानले. दुपारी ४ ते ६ वाजता 'फुले आणि महिला सक्षमीकरण, समानतेचा नवा संघर्ष' या विषयावर परिसंवाद झाला. या परिसंवादाचे अध्यक्ष ज्येष्ठ साहित्यिक उत्तम कांबळे होते तर प्रमुख वक्ते म्हणून प्रगती बाणखेले, आनंद शितोळे, ॲड. निशा शिवूरकर, प्रा. धम्मसंगिनी उपस्थित होत्या. सूत्रसंचालन व आभार प्रा. डॉ. विजय भगत यांनी मानले. संध्याकाळी ६ वाजता महानाट्य 'ज्योतीबाची सावली, सावित्री माऊली' हे सादर झाले असून निर्मिती, दिग्दर्शन, लेखन अपूर्वा सोनार यांचे होते.
दुसऱ्या दिवशी शेतकरी प्रश्न आणि महाराष्ट्र धर्मावर होणार मंथन
रविवार दि. २२ नोव्हेंबर रोजी सकाळी ९.३० ते ११.३० वाजता 'किर्तावनी: वारी आडवाटंच्या विठोबाची' हा संत नामदेव ते साने गुरुजी यांच्यापर्यंत अभंगातून प्रबोधनात्मक विचार मांडणारा कार्यक्रम होणार असून लेखन व दिग्दर्शन ऋचिका खोत तर संशोधन सहाय्य स्वामीराज भिसे यांचे आहे. सकाळी ११.३० ते १२ वाजता लघु नाटिका 'ओतूर अभियोग, खटला' हे सादर होणार असून निवेदन व संयोजन सुभाष वारे यांचे आहे. दुपारी १२ ते १ वाजता सत्यशोधकांच्या विद्यमान वंशजांचा विशेष सत्कार ज्येष्ठ लोकसाहित्यक मा. रा. लामखडे, निर्मलकुमार देशमुख यांच्या हस्ते होणार आहे. निवेदन व संयोजन के. ई. हरदास यांचे आहे. दुपारी २ ते ४ वाजता 'फुले आणि वर्तमानातील शेतकऱ्यांसमोरील आव्हाने' या विषयावर परिसंवाद होणार असून अध्यक्ष ज्येष्ठ शेतकरी नेते राजू शेट्टी असतील तर प्रमुख वक्ते म्हणून काॅम्रेड डॉ. अजित नवले, अविनाश पाटील, अरविंद खैरनार, विद्यार्थी संघटक विवेकानंद पाटील, कोल्हापूर हे उपस्थित राहणार आहेत. सूत्रसंचालन व आभार प्रा. डॉ. शिवाजीराव एंडाईत मानणार आहेत.
दुपारी ४ ते ६ वाजता सत्यशोधक समारोप सत्र होणार असून विषय 'महाराष्ट्रधर्म : मुक्त चिंतन' हा आहे. अध्यक्ष संजय आवटे, संपादक लोकमत, पुणे असतील तर प्रमुख वक्ते म्हणून प्रा. डॉ. दीपक पवार, मा. रा. लामखडे उपस्थित राहणार आहेत. सूत्रसंचालन व आभार राजाभाऊ आवसक मानणार आहेत. दुपारी ६ ते ६.३० वाजता समारोप माजी न्यायमूर्ती बी. जी. कोळसे -पाटील यांच्या उपस्थितीत होणार आहे. आभार प्रा. दत्ता जाधव मानणार आहेत. संध्याकाळी ७ ते ९ वाजता 'खेळ मांडियला' हे संत तुकाराम महाराज यांच्या जीवनावरील महानाटक सादर होणार असून लेखक डॉ. सोमनाथ मुटकुळे तर सादरकर्ते शांती फाउंडेशन, संगमनेर हे आहेत.
या अधिवेशनासाठी विदर्भ, मराठवाडा, खानदेशातून दोन्ही दिवस दीड दोन हजार सत्यशोधक उपस्थित राहणार असून त्यांची निवासाची सोय विघ्नहर देवस्थान ओझर, लेण्याद्री देवस्थान येथे करण्यात आली आहे. तसेच विविध संस्थाच्या माध्यमातून या सत्यशोधकांची भोजनाची व्यवस्था केली आहे.