पुणे : पुण्यातील नऱ्हे पोलीस स्टेशनच्या तपास पथकाने तत्परता दाखवत हरवलेली सोन्याचे दागिने आणि मोबाईल असलेली पर्स शोधून काढली आहे. या पर्समध्ये तब्बल ८.५ तोळे वजनाचे सोन्याचे दागिने होते. सुमारे १० लाख रुपये किमतीचे हे दागिने पोलिसांनी हस्तगत करून संबंधित महिलेला परत केले आहेत.
नऱ्हे पोलीस स्टेशनच्या हद्दीत राहणाऱ्या जस्मीन अशफाक सय्यद (वय ४७, व्यवसाय नोकरी, रा. पटेल रेसिडेन्सी, तानाजी चौक, पुणे) यांची दि. १६ नोव्हेंबर २०२६ रोजी रात्री साडेबारा वाजण्याच्या सुमारास नऱ्हे येथील विश्वास हॉटेल परिसरात प्रवासादरम्यान सोन्याचे दागिने आणि मोबाईल असलेली पर्स हरवली होती. या पर्समध्ये ८.५ तोळे वजनाचे, अंदाजे १० लाख रुपये किमतीचे सोन्याचे दागिने आणि मोबाईल होता. एवढ्या मोठ्या किमतीचा ऐवज असलेली पर्स शोधणे पोलिसांसमोर मोठे आव्हान होते.
वरिष्ठ पोलीस निरीक्षक वर्षा देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक विजयसिंह घाडगे यांच्या नेतृत्वाखाली तपास पथकाने या प्रकरणाचा तपास सुरू केला. पोलीस अंमलदार सुनील चव्हाण आणि राजू तोरे यांनी पर्स हरवलेल्या ठिकाणाच्या आजूबाजूच्या परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज बारकाईने तपासले. तसेच पोलीस हवालदार प्रफुल्ल मेत्री यांनी तांत्रिक विश्लेषण करून सुशील अंबादास धांडे (वय ३३, व्यवसाय चालक, रा. प्लॉट क्रमांक ४०२, गणपती माथा, जिजाई कॉलनी, वारजे माळवाडी, पुणे) याची माहिती निष्पन्न केली.त्यानंतर पोलिसांनी संबंधित इसमाकडे कौशल्यपूर्ण आणि सखोल तपास केला. या तपासादरम्यान हरवलेली पर्स आणि त्यामधील ८.५ तोळे सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात आले. दागिन्यांची ओळख पटवून ते तक्रारदार महिला जस्मीन अशफाक सय्यद यांना परत करण्यात आले.
ही कामगिरी पोलीस आयुक्त अमितेश कुमार, सहपोलीस आयुक्त संजय दराडे, अपर पोलीस आयुक्त राजेश बनसोडे, पोलीस उपआयुक्त डॉ. संग्राम कवडे आणि सहायक पोलीस आयुक्त विजय कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
वरिष्ठ पोलीस निरीक्षक वर्षा देशमुख, पोलीस उपनिरीक्षक विजयसिंह घाडगे, पोलीस उपनिरीक्षक प्रमोद जगताप, महिला पोलीस उपनिरीक्षक पूजा माळी, पोलीस अंमलदार प्रफुल्ल मेत्री, निलेश भोरडे, राजू तोरे, स्वप्नील सूर्यवंशी, देवा चव्हाण, सुनील चव्हाण, सुमित जगताप, नितीन बागमारे, धुळा गारळे, गोविंद कपाटे आणि कार्तिक कांडे यांनी या कारवाईत सहभाग घेतला.नऱ्हे पोलिसांच्या या तत्पर कारवाईमुळे महिलेचे लाखो रुपयांचे सोन्याचे दागिने सुरक्षितपणे परत मिळाले आहेत.