फुलंब्री : समृद्धी महामार्गावर अपघातांची मालिका सुरूच असून, सावंगी परिसरातील चॅनेल क्रमांक ४२६ येथे खासगी बसचा भीषण अपघात झाला. सोमवारी (२३ नोव्हेंबर) पहाटे दीडच्या सुमारास घडलेल्या या दुर्घटनेत दोघांचा मृत्यू झाला, तर ३० प्रवासी जखमी झाले आहेत. जखमींपैकी चार जणांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती समोर आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ही खासगी बस जालन्याहून मुंबईच्या दिशेने जात होती. पहाटेच्या सुमारास बस चालवत असताना चालकाला डुलकी लागल्याने त्याचे वाहनावरील नियंत्रण सुटले. त्यामुळे भरधाव बस महामार्गाच्या मधोमध असलेल्या डिव्हायडरला जाऊन धडकली. धडक इतकी जोरदार होती की बसमधील अनेक प्रवासी जखमी झाले.
या दुर्घटनेत रघुनंदन दत्ता सांगळे (वय ३५, रा. भगतसिंग नगर, मुंबई) आणि उत्तम दामू जाधव (वय ३५, रा. पुसद) यांचा मृत्यू झाला. तर अन्य ३० प्रवाशांना दुखापत झाली आहे. गंभीर जखमींना तातडीने उपचारासाठी छत्रपती संभाजीनगर येथे हलविण्यात आले.
अपघाताची माहिती मिळताच फुलंब्री पोलीस ठाण्याच्या प्रभारी अधिकारी डॉ. सोनाली पाईकराव यांनी पोलीस पथकासह घटनास्थळी धाव घेतली. महामार्ग विभागाच्या अधिकाऱ्यांनीही घटनास्थळी पोहोचून परिस्थितीची पाहणी केली. जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यासाठी मदतकार्य राबविण्यात आले.
चॅनेल क्रमांक ४२६ पुन्हा चर्चेत; अपघात रोखण्यासाठी उपाययोजनांची मागणी
सावंगी परिसरातील चॅनेल क्रमांक ४२६ हा वारंवार होणाऱ्या अपघातांमुळे चर्चेत आला आहे. यापूर्वीही याच ठिकाणी झालेल्या अपघातात दोघांना प्राण गमवावे लागले होते. आता पुन्हा खासगी बसच्या अपघातात दोघांचा मृत्यू झाल्याने या ठिकाणच्या सुरक्षिततेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. भविष्यात अशा दुर्घटना टाळण्यासाठी महामार्ग प्रशासनाने या परिसरात आवश्यक सुरक्षा उपाययोजना तातडीने कराव्यात, अशी मागणी होत आहे.