सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • पेपरफुटी करणाऱ्यांवर आता 10 कोटींचा दंड; 10 वर्षांपर्यंत कारावास, उच्चस्तरीय समितीच्या दुसऱ्या अहवालात महत्त्वाच्या शिफारशी, परीक्षार्थींना मोठ्या दिलासा मिळण्याची शक्यता
  • राज्यात पुन्हा 'ऑपरेशन टायगर'च्या हालचाली, ठाकरे गटाचा नेता मुंबईतील शिंदे सेनेच्या बैठकीला, चर्चांना उधाण
 शहर

रामटेकडीतील TCS iON परीक्षा केंद्रावर अस्वच्छतेचा प्रश्न ऐरणीवर; बंद स्वच्छतागृहामुळे विद्यार्थी-पालकांची गैरसोय, प्रमोद भानगिरे यांचा इशारा

डिजिटल पुणे    24-11-2026 13:37:08

पुणे : पुण्यातील रामटेकडी येथील TCS iON डिजिटल परीक्षा केंद्रावर अस्वच्छतेची समस्या गंभीर बनली असून, मूलभूत सुविधांच्या अभावामुळे परीक्षा देण्यासाठी येणाऱ्या विद्यार्थ्यांसह पालकांची मोठी गैरसोय होत आहे. या परिस्थितीवरून शिवसेनेचे पुणे शहरप्रमुख प्रमोद नाना भानगिरे यांनी परीक्षा केंद्र प्रशासन आणि पुणे महानगरपालिकेच्या कारभारावर नाराजी व्यक्त केली आहे. बंद असलेले सार्वजनिक स्वच्छतागृह तातडीने सुरू करण्याची तसेच परिसरात आणखी चार ते पाच स्वच्छतागृहांची व्यवस्था करण्याची मागणी त्यांनी केली आहे.

रामटेकडी येथील आयओएन डिजिटल झोन (TCS iON) हे पुण्यातील महत्त्वाचे डिजिटल परीक्षा केंद्र आहे. येथे जेईई, गेट, नीट, एनडीए यांसारख्या विविध प्रवेश परीक्षा, तसेच आयबीपीएस आणि एसबीआय भरतीच्या परीक्षा घेतल्या जातात. या परीक्षांसाठी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून हजारो विद्यार्थी आणि त्यांचे पालक येत असतात. मात्र, एवढ्या मोठ्या संख्येने विद्यार्थी येत असूनही केंद्र परिसरात स्वच्छता आणि स्वच्छतागृहांसारख्या मूलभूत सुविधांची पुरेशी व्यवस्था नसल्याचे समोर आले आहे.

विशेष म्हणजे, परीक्षा केंद्राच्या अगदी समोर पुणे महानगरपालिकेच्या अखत्यारीतील सार्वजनिक स्वच्छतागृह आहे. मात्र, हे स्वच्छतागृह बंद अवस्थेत असल्याने त्याचा विद्यार्थ्यांना आणि पालकांना वापर करता येत नाही. त्यामुळे परीक्षेच्या महत्त्वाच्या वेळी विद्यार्थ्यांसह पालकांना गैरसोयींचा सामना करावा लागत आहे. महापालिकेने कोणतीही सबब न देता हे स्वच्छतागृह तातडीने सुरू करावे. तसेच, विद्यार्थ्यांची मोठी संख्या लक्षात घेऊन परिसरात आणखी चार ते पाच स्वच्छतागृहांची व्यवस्था करावी, अशी मागणी प्रमोद नाना भानगिरे यांनी केली आहे.

याबाबत बोलताना भानगिरे यांनी पुणे हे विद्येचे माहेरघर असल्याचे सांगत, भविष्यातील स्वप्ने घेऊन विविध परीक्षांसाठी पुण्यात येणाऱ्या विद्यार्थ्यांना किमान स्वच्छ आणि पुरेशा मूलभूत सुविधा मिळणे आवश्यक असल्याचे स्पष्ट केले. परीक्षा केंद्र प्रशासनासह महापालिकेने या प्रश्नाकडे गांभीर्याने लक्ष देऊन तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.

दरम्यान, येत्या दोन दिवसांत बंद असलेले महापालिकेचे स्वच्छतागृह सुरू करण्यात आले नाही आणि विद्यार्थ्यांसाठी पर्यायी स्वच्छतागृहांची व्यवस्था झाली नाही, तर शिवसेना स्वतः पुढाकार घेऊन ही स्वच्छतागृहे सुरू करेल, असा स्पष्ट इशारा प्रमोद नाना भानगिरे यांनी दिला आहे. विद्यार्थ्यांच्या मूलभूत सुविधांच्या प्रश्नावर प्रशासनाच्या दिरंगाईची वाट पाहणार नसल्याची भूमिका त्यांनी घेतली आहे.

 

 

 


 Give Feedback



 जाहिराती